“फाळणी ही भारत आणि पाकिस्तानची शोकांतिका आहे.”
“…”
“गांधीहत्या ही अखंड हिंदुस्तानची शोकांतिका आहे.”
“…”
“बॅरिस्टर जीनांवरचे आरोप ही अखंड पाकिस्तानची शोकांतिका आहे.”
तो एकटाच बोलत होता आणि मी ऐकत होतो. खरं म्हणजे मी एकटाच त्याच्या तावडीत सापडलो होतो ही माझी शोकांतिका होती. स्टेशनवरच्या उडप्याच्या हॉटेलमध्ये पाण्याने भरलेले ग्लास टेबलावर ठेवलेले असतानादेखील हा जोरजोराने मूठ आपटत होता आणि ग्लास पालथे होउु नयेत याची मी काळजी घेत होतो.
वास्तविक गांधी गेल्यानंतर तीस बत्तीस वर्षानंतर आम्ही जन्माला आलो होतो त्यातदेखील आमची चूक नव्हती. बॅरिस्टर जीनाच काय, कुठलेही मुस्लिम नाव उच्चारताना मला उगीचच पोटात धस्स होते. यामुळे त्यांच्या नेत्यांवर वगैरे आरोप वगैरे भानगडच नाही. फक्त साहेब नसल्यामुळे आॅफिसमधून लवकर निघायला मिळाले म्हणून खुशीत होतो तेवढयात त्याला दिसलो.
तसे म्हणाल तर हा माझा खास मित्र नव्हे. मित्राचा मित्र. शिवाय हा कवी आहे हे समजल्यापासून त्याच्यापासून चार हात लांबच रहायचो. नाहीतर ओळखीचा (गैर) फायदा घेउुन हा कुठेही कविता वाचून दाखवायचा. त्यात देवाने त्याला अतिशय निष्पाप चेहर्याची देणगी देउुन घोडचूक केलेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी हा माणूस एवढा भयंकर असेल याची अजिबात कल्पना येत नाही.
पण जसजसा परिचय वाढत गेला तसा माझा अनुभवही वाढला. मी बर्याचदा त्याला पाहूनदेखील न पाहिल्यासारखे करतो. न पाहिल्यासारखे करतो म्हणजे लवकरात लवकरची लोकल पकडतो. एकदा तर पडता पडता वाचलो पण लोकल सोडली नाही. मागच्यावेळी त्याने मला आदिवासी पाडयावरचा एकलव्य ही कविता उडप्याच्या हॉटेलमध्ये वाचून दाखवली होती. आठदहा ओळींची कविता होती. म्हटलं, दहा पंधरा मिनिटांत संपेल. म्हणून मी चहादेखील मागवला. त्या आठ दहा ओळींनी तीन तास कुरतडले. शाळा आणि कॉलेजचा कुठलाही आख्खा पेपर आम्ही तीन तासात दोनवेळा सोडवायचो. त्यात अशा कुठल्यातरी कवितेच्या आठ ओळी सहा मार्कासाठी असायच्या.
एकलव्य एकलव्य एकलव्य
द्रोणाचार्याचा एकलव्य
द्रोणाचार्याचा की,
द्रोणाचार्याच्या पुतळयाचा?
अशा त्या पहिल्या चार ओळी होत्या. वास्तविक पूर्वी मला एकलव्य आवडायचा. आणि कपटाने गुरूदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागणार्या द्रोणाचार्याचा राग यायचा. पण त्याची ‘एकलव्य’ ही कविता ऐकल्यापासून मला एकलव्य आणि द्रोणाचार्य या दोघांचाही राग यायला लागला आहे. नको असलेल्या आठ ओळी ऐकण्यासाठी आठ चहाचे पैसे दयावे लागले. हा माणूस जेवतो बिवतो की नाही कुणास ठाउुक? नुसता चहा पित असतो.
एका ठरलेल्या उडप्याच्या हॉटेलमध्ये टेबलावरच्या मळक्या फडक्याप्रमाणे हा तिथे पडलेला असतो. हल्लीचे उडपीदेखील फारच सहनशील झाले आहेत. त्यांची मला अत्यंत सहानुभूती वाटते. हा माणूस स्वत:च्या पैशांनी चहा पित नाही. सगळया मित्रांना बोलवतो. मित्रांनी चहा मागवल्यावर बिल आले की कविता ऐकवायला काढतो. मित्र बिल नको पण कविता आवर म्हणून उडप्याने दिलेली चिल्लर मूठीत धरून पळ काढतात. मला हे चांगले ठाउुक आहे, म्हणून या उडप्याच्या हॉटेलात मी चुकूनदेखील जात नाही. पण ग्रहांची वक्रदृष्टी माझ्यावर पडली की मी त्याच्या दृष्टीस पडतो.
चरित्रनायकाचे शिक्षण म्हणाल तर फक्त दहावी पास आहे. दहावी पास झाल्यावर हा इसम कॉलेजला न जाता समाजसुधारणेच्या भानगडीत पडला. त्याच्या दृष्टीने समाजसुधारणा करणे ही गोष्ट बारावीच्या परीक्षेत पास होण्यापेक्षा अत्यंत सोपी होती. त्यात हा कुठल्यातरी कवीच्या नादी लागला आणि त्याच्याप्रमाणे त्याच्याही गळयात शबनम बॅग पडली. या बॅगेत दोनचार वर्षापासून पहात आलोय तीच डायरी, त्यात घडया करून ठेवलेले अगणित पेपर आणि तत्सम कागदांचा बराच संग्रह आहे. एक चहा पिउुन झाल्यावर हा त्याची पहिली कविता ऐकवायला काढतो.
“ही बघ परवाच लिहीली.”
मी तर दोन दोन महिन्याच्या अंतराने एकच कविता “परवाच लिहीली ” या सदराखाली तीनवेळा ऐकली आहे. हा एकच कविता पुन्हा पुन्हा का लिहीतो ते मला कळत नाही. अक्षर सुधारावे म्हणून लिहीत असेल म्हणावे तर प्रत्येकवेळची सिच्युएशन वेगळी असते. पहिल्या सिच्युएशनमध्ये त्याला एक स्वप्न पडते, दचकून हा जागा होतो आणि रात्री दोनला हा कविता लिहायला बसतो (आपल्याला एखादा प्रसंग आठवला की वेळ, काळ याचे काही भान नसते आणि एकदा गेली की त्या प्रसंगाची ग्रीप पुन्हा येत नाही असे त्याचे मत आहे). दुसर्यांदा बारमध्ये बसल्या बसल्या ही कविता लिहीली असे हा उघडपणे सांगतो. आणि तिसर्यांदा एक उघडा भिकारी बघितल्यावर हयाला सत्याचा साक्षात्कार होतो आणि त्यावेळी ती कविता जन्माला येते. त्याची प्रत्येक कविता केवळ फडतुस असते. तरीदेखील मी प्रत्येकवेळी ती जणू काय बालकवींचीच कविता आहे या उत्साहात वाचतो आणि शेवटी निराश होतो.
“झालास ना निराश? असं नैराश्य आणण्याची पॉवर कवितेत पाहिजे.” त्याचा चेहरा एकदम खुलायला लागतो. मला मध्यंतरी जास्तच नैराश्य यायला लागलं आहे म्हणून एका डॉक्टराकडे गेलो तर तिथे औषधाऐवजी “कुठल्या फडतुस कविता वाचत असाल तर ताबडतोब बंद करा.” असा सल्ला मिळाला. मी भूत पाहिल्यासारखे डॉक्टरकडे पाहिले. एवढे अचूक निदान त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा केले होते. त्या डॉक्टरकडे स्वत:च्याच कविता वाचून नैराश्याने गळफास घेतलेल्या एका कवीची केस आली होती हे मला मागाहून कळले. डॉक्टरांच्या त्या सल्ल्यापासून मी या कवीमित्राला कटाक्षाने टाळतो.
क्रमश:
©विजय माने, ठाणे.