मंग्या उर्फ मंगेश पाटील याच्या लग्नाचा उमेदवारीचा काळ कधीच लोटून गेला होता पण लग्न काही जमत नव्हते. मुलीकडचे लोक पहायला येउुन बंगला वगैरे बघून खुश होउुन जायचे पण नंतर मध्येच काहीतरी निघायचे आणि जमत आलेले फिसकटायचे. त्याला दोन कारणे होती. एक म्हणजे मंग्याची कुंडली आणि दुसरी त्याला मिळत नसलेली नोकरी. मंगळ, राहू, केतू वगैरे मंडळींनी मंग्याच्या कुंडलीत नुसता धुमाकुळ घालून ठेवला होता. बर्याच मंडळीना नवराही पसंत असायचा पण कुंडली पाहिली की लोक चक्क नकार द्यायचे. या उभ्या आडव्या रेषांच्या कुंडलीत माझ्याबद्दल असे काय लिहीले आहे, याचे मंग्याला नेहमी आश्चर्य वाटायचे.
वास्तविक नोकरी करायची मंग्याला गरज नव्हती. गावात बंगला होता, जमीनजुमला बक्कळ होता पण नोकरीशिवाय छोकरी देत नाहीत हे सत्य होते. शेवटी बर्याच खटाटोपाने कशीतरी का होईना, पुण्यात एक खाजगी नोकरी मिळवण्यात मंग्याला यश आले आणि ती हातातून जायच्या आत पोराचे लग्न करून टाका, अशी पाटलांकडे एका भटजीने पुडी सोडली.
मंग्याच्या लग्नकाळजीने त्यांना बरीच वर्षे जेरीस आणले होते. आता योग जुळून आलाय म्हटल्यावर त्यांनी खबरे सोडून सर्व पाहुण्यांना संदेशच धाडले. त्यातले बरेचजण आधी येउुन गेले असल्याने पुन्हा येण्याच्या भानगडीत पडले नाहीत. चार दिवसाची वाट पाहून झाल्यावर एक पाहूणा आला आणि त्यांना पाहून पाटील आनंदले. चहापाणी घेता घेता नवरदेवाच्या नोकरीची चौकशी झाली. सुदैवाने ती नुकतीच मिळाली होती. दुधात साखर म्हणजे पाहुण्यांचा कुंडलीवर अजिबात विश्वास नव्हता.
एवढी वर्षे हे पाहुणे कुठे होते याचे सर्वांना कोडे पडले. याआधी अशा देवमाणसांना का बोलवले नाही याचा खुद्द पाटलांबरोबर सर्वांनाच पश्चाताप झाला. मंगेशरावांना लग्न आटपून लगेच नोकरीवर हजर रहायचे आहे हे ऐकल्यावर मुलीकडच्यानीही लागलीच लग्न करून टाकूया या प्रस्तावाला लगेच मान्यता दिली व जास्त उशिर न करता लवकरात लवकर लग्नाचा मुहुर्त काढण्याचे ठरले.
व्यव्हारात पारदर्शकता असावी या हेतूने “तुम्हीही मुलगी पहायला या.” म्हणून पाहुणे जाता जाता सांगून गेले पण मंग्याने त्याच्या कुंडलीचा एवढा धसका घेतला होता की पोरीला न बघताच “काही गरज नाही. मुहुर्ताचे तेवढे लवकर सांगा.” म्हणून होकारावर शिक्कामोर्तब केले. मुलगी पहाण्यासाठी पुन्हा सगळी व्यवस्था, पोहयांचा कार्यक्रम आणि अजून त्यात काही संकटे टपकायला नकोत म्हणून त्याने फेसबुकवरचे फोटो बघून मुलगी पहाण्याचे समाधान पदरात पाडून घेतले.
नवीन नोकरी असतानाही लग्नासाठी मंग्याने पंधरा दिवस सुट्टी काढली. लग्नाच्या याद्या तयार होउुन खरेदीला सुरवात झाली. पाटलांच्या घरचे लग्न म्हटल्यावर ते धुमधडाक्यात होणार यात शंकाच नव्हती. गावातला ट्रॅक्टरवरचा डीजे आणि नवरदेवाला घेउुन नाचणारा पवारांचा घोडा हे लागलीच बुक झाले. एरव्ही पुण्यात असणारा मंग्या पवारांच्या घोडयाची थोडीफार कीर्ती ऐकून होता. पण कशाला त्याचा आणि आपला संबंध येतोय म्हणून त्याला विसर पडला होता.
पण लग्नादिवशी सकाळसकाळी घोडा दरवाजात आल्यावर मंग्या हादरलाच. घोडा एवढा तगडा आणि उंच होता की त्यावर शिडी लावूनच चढावे लागले असते. तो हो नाही करत होता पण लोकांनी त्याचे ऐकलेच नाही. सुट, बुट आणि डोक्यावरच्या फेटयासह त्यांनी मंग्याला घोडयावर ढकलला. वाजंत्री वाटच बघत होते. जसा मंगेशराव घोडयावर बसला तसे ते सुरूच झाले. अंगात आल्यासारखे ते आपापली वाद्ये बडवू लागले आणि त्या सरावलेल्या आवाजाने पवारांचा ‘म्युझिकल घोडा’ नाचू लागला.
अर्धा तास हा कार्यक्रम चालू होता. घोडयाच्या नाचाने वरखाली होउुन एव्हाना मंग्याच्या पोटात दुखायला लागले होते. वर्हाड येण्याची वेळ झाली होती आणि ते आल्यावर त्यांच्यावर इंप्रेशन मारायला वाजंत्र्याबरोबर लोकांनी डीजेही तयार ठेवला होता. तो व्यवस्थित चालतोय की नाही हे पहायला त्यांनी डीजे चालू केला तसा आवाजाचा धमाका झाला.
त्या झटक्यात मंग्या हवेत उडून नशीबाने घोडयावरच पडला. पडता पडता घोडयाखाली जाउु या भीतीने त्याने जीवाच्या आकांताने लगाम ओढला आणि हिसक्यासरशी घोडा चौखूर उधळला. घोडयाचा मालक एका लाथेत हातातल्या काठीसह गायब झाला. हा हा म्हणता घोडा सगळयांसमोरून मंग्याला घेउुन पसार झाला. त्याच्या मागे लोकांनी गाडया सोडल्या. त्यांच्या भीतीने की काय, घोडा अजूनच गांगरला आणि अंगात वारे शिरल्यासारखा तो गावाबाहेर धावत सुटला.
नवरदेवासह घोडा पळाल्यावर मंडपाची कळाच बदलली. लोकांना हसावे की रडावे ते कळेना. घोडा ज्या आवेशात मंग्याला घेउुन पळाला होता यावरून तो परत येईल याची कुणाला शाश्वती वाटत नव्हती. बायका “आता काय?” म्हणून तोंडाला हात लावून बसल्या. तेवढयात एक कारटं “घोडा स्टॅन्डवर जाउुन यष्टीला धडकला आणि नवरदेव यष्टीखाली गेला.” ही बातमी घेउुन आलं. लोक कावरेबावरे झाले. चर्चेला एकदम उत आला आणि पुन्हा मंग्याची कंुडली चव्हाटयावर आली.
घोडयावरचा मंग्या मात्र अवघडला होता. पोटात दुखत होते त्याचे काही वाटत नव्हते पण घोडयाला कसा थांबयावचा हा प्रश्न होता. कुठल्या मुहुर्तावर लोकांना या घोडयाची अवदसा सुचली असे त्याला वाटू लागले. गाडीच्या लाईट, ब्रेकला वगैरे करतात तसे घोडयाला पोटावर, मानेवर दाबून झाले पण तो लेकाचा थांबायला तयार नव्हता. लग्नाचा विचार बाजुलाच राहिला आणि जीव मुठीत धरून बसलेल्या मंग्याला आयुष्याचा शेवट दिसू लागला. आपण बिनघोडयाचे साधे लग्न केले असते तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले. तशा परिस्थितीतही इतिहासकालीन मावळेलोक कसे घुडसवारी करत असतील असाही मजेशीर प्रश्न त्याच्या मेंदूला चाटून गेला.
तेवढयात त्याला समोरून येणारे वर्हाड दिसले आणि नवरदेवाचा तोरा सोडून मंग्या ओरडला, “ओ पाव्हणं, घोडा अडवा घोडा.” मंग्याला अजून बरेच काही बोलायचे होते पण तोंडातून आवाजच निघत नव्हता.
पाहूण्यांना मजा वाटली. आपल्या स्वागताला वेशीपर्यंत घोडयावरून साक्षात जावईबापूच आले म्हणून ते भलतेच खुश झाले. लगेच ते घोडयाच्या आडवे गेले. अचानक सगळेच लोक आडवे आल्यामुळे घोडयाला एकदाचा ब्रेक लागला आणि ती संधी साधून मंग्याने सुटाबुटाची पर्वा न करता थेट खाली उडी मारली.
वर्हाड आले पण नवरदेव गायब होता. आता काय करायचे म्हणून सगळे चिंतेत होते. तेवढयात नवरीच्या गाडीतून अंगाचा थरकाप झालेले मंगेशराव ऐटीत उतरले आणि त्याला सुखरुप पाहून मंडपात जल्लोष झाला. लोकांनी पुन्हा डीजे चालू केला. लग्न बाजुलाच राहिले आणि लोक डीजेवर नाचू लागले. वर्हाडालाही काय भानगड आहे ते कळेना. तेही डीजेत सामील झाले आणि तेवढयात कोणतरी ओरडले, “ये, जा रे त्या पवाराच्यात. वरातीला घोडा तेवढा घेउुन या…”
©विजय माने, ठाणे.