बर्याच दिवसानंतर मला या माणसाची दुसरी बाजू समजली. मला रोज गाठणारा हा माणूस माझ्याकडून दोन महिन्याच्या रेशनला पुरतील एवढे पैसे घेउुन जो गायब झाला ते चार महिने तो दिसलाच नाही. फोन केला तर उचलायचाच नाही. आणि उचलला तर “एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये आहे. भेटल्यावरच सांगतो.” असे सांगायचा. या लोकांचे कसले महत्वाचे प्रोजेक्ट असतात काही कळत नाही. त्याच्यापासून पिच्छा सोडवून घ्यायचा असेल तर त्याला आपणहून उसने पैसे देण्याचा शोध मला फार उशिरा लागला.
सुरवासुरवातीला मी खूष होतो पण हा माणूस भेटण्याची काहीच चिन्हे दिसेनात तेव्हा आपले पैसे घेउुन हा परदेशात वगैरे पळून जातोय का काय, याची मला काळजी वाटू लागली. मी स्टेशनवर आलो की त्या हॉटेलमध्ये डोकावून जायचो पण हा तिथे नसायचा. एक दिवशी असाच हताश होउुन स्टेशनवर परतत होतो एवढयात हा फलाटावर दिसला. खिन्न झालेले मन एका क्षणात टवटवीत झाले. महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने पन्नास रुपयाच्या नोटेखेरीज खिशात फक्त रेल्वेचा पास होता. अशा आणीबाणीच्या काळात या गुरुमित्राचे दर्शन झाल्यावर मला हलकं हलकं वाटलं. तो मात्र मला पाहिल्यावर पळायच्या बेतात होता. माझ्याकडे पाहिल्याबरोबर त्याने एका धावत्या लोकलच्या दरवाजाकडे धावही घेतली होती पण मी चित्त्याच्या चपळाईने त्याला पकडला.
मनातला चार महिन्याचा संताप केवळ क्षीण हास्य मुखावर आणून गिळला.
“अरे काय बाबा, इतके दिवस होतास कुठे?”
“अरे एका प्रोजेक्टमध्ये अडकलो होतो.” हे त्याचं नेहमीचंच उत्तर आहे. सगळयांना हेच उत्तर सांगण्याचा त्याचा अनोखा प्रोजेक्ट आहे.
“अरे कल्याणमध्ये दोन शिक्षकांवर अन्याय झाला. त्याला वाचा फोडायची होती. त्याचाच सर्व्हे चालू होता.”
“कोण वाचा फोडतंय याचा?”
“नाही रे. ही बघ आज ही बातमी छापून आली आहे.” असे म्हणून तयाने ती बॅग शोधायला सुरवात केली.
या मनुष्याने माझे पैसे घेउुन चार महिने भूमिगत होउुन माझ्यावर जो अन्याय केला होता, ते त्याला सांगायलादेखील माझी वाचा फुटत नव्हती.
“चल चहा घेउु या.” तोच म्हणाला. मी त्याच्याकडून काहीतरी पैसे परत मिळतील म्हणून निमूटपणे त्याच्या मागून गेलो.
आपल्या बातम्या आणि कविता ऐकायलाच ईश्वराने मला बनवले आहे अशी त्याची ठाम समजूत आहे. मग त्याच्या काही नव्या बातम्या आणि जुन्या कविता ऐकल्या. हा प्राणी मला सगळया जगाची उलाढाल सांगत होता. कुठल्या नाटककाराला भेटलो, अमके नाटक पाहिले, तमका पिक्चर बघितला ही माहिती काहीही ऐकायला तयार नसलेल्या कानांवर पडत होती. हवा असलेला परत द्यायच्या पैशाचा विषय हा इसम काढत नव्हता. नंतर नंतर हा आपले काही देणे लागतो हे विसरला की काय, असा एक जीवघेणा विचारही माझ्या डोक्यात येउुन गेला.
“पैशाची थोडीफार मदत होईल काय?” खरंच पैशाची ज्यावेळी निकड असते त्यावेळी ही साली कळकळ की काय आपोआपच तोंडावर येते.
“सोमवारी नक्की काम होईल.” त्याने आश्वासन दिले.
कुठल्या सोमवारी याचा पत्ता नाही. लाज, लज्जा, शरम नावाच्या वस्तूंचे गाठोडे घरातल्या खुंटीवर अडकवूनच हा माणूस घराबाहेर पडतो. मला माहित आहे, त्याचा हा सोमवार कधीही उजाडणार नाही. भरपूर सोमवार येतील आणि असेच कोरडे जातील. मी त्याला भेटल्यावर माझ्या पैशाऐवजी तो मला चहा देईल. पण त्यावेळी तो त्याच्या बातम्या आणि कविता ऐकवायला विसरणार नाही. हयाला पैसे देण्याआधी मी माझ्या एका परममित्राचा सल्ला घेतला होता. त्यानेही “दिलेले पैसे बुडीत आहेत समजून द्यायचे तितके दे.” असे सांगितले होते. चूक माझीच होती. कधीकधी आपल्या हातून अशा चूका होताना समजतात पण स्वभावाला औषध नसते.
बरेच महिने उलटून गेले. मध्यंतरी मित्राकडून तो एका पेपरचा उपसंपादक झाला आहे हे समजले. पगार वगैरे चांगला होता म्हणजे बिनधास्त भेटायला हरकत नव्हती. पण भेटीचा योग काही येत नव्हता. एकदिवशी उडप्याच्या हॉटेल समोरुन चाललो होतो आणि अचानक कानावर हाक आली. वळून पाहिले तर उपसंपादकसाहेब मला बोलवत होते. बसल्या बसल्या माझ्यासाठी कॉफी मागवण्यात आली. त्यादिवशी त्याची शबनम बॅग विसरली होती. त्या खुशीत मी बिलाचे पैसे काढले. मला अडवत बिलही चक्क त्याने दिले.
“बाकी कसं चाललंय?” पाहुणचाराने कृतकृत्य होत मी विचारले.
“आपल्या आशिर्वादाने एकदम झकास!” म्हणत त्याने मलाच क्रेडिट दिले.
“मस्त जॉब आहे. चांगली सॅलरी आहे. पहिल्या सॅलरीतच सगळयांची देणी फेडून टाकली.”
या नवीनच माहितीने मी चाट पडलो.
“तुझं कसं काय?”
“अॅज युजूअल. खूप आउुटडोअर्स आहेत. परवाच चेन्नईवरून आलो. आठवडाभर पकलो च्यायला!”
“अच्छा.” त्याला विषेश काही देणंघेणं नव्हतं पण मी आपला खरं खरं सांगत होतो.
“बरं, काय कथा बिथा असतील तर तयार ठेव. आपल्या दिवाळी अंकात छापून टाकू.” म्हणून त्याने बाजूला बसलेल्या इसमाला “आपला मित्र आहे, जाम भारी लिहीतो.” असं सांगितलं आणि “चल यार, एकदिवशी तू, मी, दिग्या बसून मजा करूया.” म्हणत निरोप घेतला. त्याला नक्की घाई असावी, नाहीतर एवढया गडबडीत तो गेलाच नसता
…
©विजय माने, ठाणे.
Khup chan
LikeLike