भरधाव धावणार्या एसटीला कचकन बे्रक लागला आणि एसटी जाग्यावरच बंद पडली. डुलक्या घेणार्यांच्या डोक्याला टेंगळं आली. मधल्या मोकळया जागेत अवघडून उभा राहिलेले प्रवाशी इकडे तिकडे धरायला काही न मिळाल्याने एसटीच्या पुढच्या दरवाजाकडे जमा झाले. ज्यांच्या हातात बाजाराची ओझी होती त्यांनी त्यांच्या बोचक्यांसहित समोर येईल त्याच्यावर आक्रमण केले. काय झालंय हे कळायच्या आत कुणीतरी एसटीचा दरवाजा उघडला आणि केव्हापासून दरवाजात कडमडत असलेला कंडक्टर त्याच्या तिकीटपेटीसह बाहेर सांडला. एका बेसावध म्हातारीची कवळी तोंडातून खाली पडली. ती शोधता शोधता तसल्या दंग्यात म्हातारी किंचाळली, “बाबा ब्रेक मारतूयास का आमचं दात पाडतूयास?”
एका आगाउु पॅसेंजरने मध्येच तोंड घातले, “आज्जीबाई कवळी हाय नव्हं ती?”
“ती बी पाडली की बाबानं.”
“लावा की मग पुन्ना.”
त्याच्या नादाला न लागता म्हातारीने कवळी शोधून पिशवीत ठेवली आणि चष्मा वाचलाय का ते बघू लागली. सगळे ठीकठाक झाल्यावर नेमके काय झाले याची चौकशी सुरू झाली. अचानक गाडीच्या आडवे काय आले ते कुणालाही कळेना. बसमधून पडलेला कंडक्टर कसनुसे तोंड करत आणि कपडे झाडत वर आला. त्याला दरवाजाची कडी कुुणी काढली याची चौकशी करायची होती. एवढयात ड्रायव्हरचा आवाज कानावर आला, “ओ पाव्हणं, काय राव गाडी चालवताय, आला असता की एसटीखाली.”
एसटीपुढे एक मोटारसायकल थांबली होती. मोटारसायकलवरून एक माणूस खाली उतरला आणि त्याने ड्रायव्हरला एसटी बाजूला घ्यायला सांगितली. सांगणारा माणूस किरकोळ असता तर ड्रायव्हरने ऐकले नसते पण माणूस चांगलाच जाडजूड होता. त्याचे ऐकून पळून जाता येणार नव्हते म्हणून ड्रायव्हरने पुन्हा एसटी सुरू केली आणि रस्त्याच्या बाजूला घेउुन उभी केली. नुसती गाडी बाजूला घ्या म्हणून तो थांबला नाही तर त्याने “मी सांगितल्याशिवाय गाडी हलवायची नाही.” असा थेट हुकुमच सोडला.
उगाच काही लफडे नको म्हणून ड्रायव्हरने गुपचूप गाडी बंद केली. तो माणूस एसटीच्या पुढच्या दरवाजातून आत घुसला तसा झालेला प्रकार लोकांच्या लक्षात आला. त्याच्या स्टार्च केलेल्या स्वच्छ पांढर्या झब्ब्यावर डाव्या खांद्यापासून कमरेच्या उजव्या भागापर्यंत तलवारीचा वार झाल्यासारखा दिसत होता. एसटीत बसलेला कुठलातरी महाभाग पान खाउुन पचाक्कन बाहेर थुंकला होता आणि त्याचा नकाशा त्याच्या झब्ब्यावर उमटला होता.
लाल पिचकारीत न्हाउुन निघालेला माणूस भयंकर चिडला होता. आधीच गोेरा असणारा त्याचा वर्ण लाल झाला होता. स्वच्छ कपडयांबरोबर त्याच्या गळयात जाडजूड सोन्याची चेन आणि हातात सोन्याचे ब्रेसलेट होते. एकूण राहणीमानावरून तो माणूस आमदार खासदाराच्या कंपूतला वाटत होता. त्या घटकेला त्याच्या तावडीत कोण सापडला असता तर त्याचे काही खरे नव्हते. एसटीत घुसल्या घुसल्या त्याने उजव्या बाजूच्या पहिल्या सीटपासून “कोण हरामखोर आत्ता खिडकीतून बाहेर थुंकला?” अशी चौकशी करायला सुरवात केल्यावर पान आणि तंबाखू खाल्लेले लोक हादरले.
पिचकारी उजव्या बाजूच्या खिडकीतून बाहेर आली असे खुद्द फिर्यादीचेच म्हणणे पडल्यावर डाव्या बाजूच्या सीटवर बसलेल्या लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आणि पुढचा तमाशा बघायला ते तयार झाले. होय म्हणायला कोण तयारच होईना. अशावेळी हरिश्चंद्र होउुन कोण मार खाईल? जो कोण “मी…” म्हणेल त्याचा निकाल पक्का होता त्यामुळे ती रिस्क घ्यायला कुणीही तयार नव्हता. मग त्यानेच प्रत्येकाकडे बोट दाखवून विचारायला सुरवात केली, “तू थंुकलास ना बाहेर?”
“नाही हो पावणं. बसल्यापासून ढकलतोय पण खिडकीच उघडत नाही.”
त्याच्याशी अजून बोलण्यात अर्थ नव्हता हे जाणून झब्बा मागच्या सीटकडे वळला, “तू थुंकलास ना बाहेर?”
“नाही. आपून आजपातूर सुपारीच्या खांडालाही तोंड लावलं नाही.”
त्याच्या तोंडाला लागण्यात अर्थ नव्हता म्हणून तो घायाळ माणूस मागच्या सीटकडे वळला.
“तंबाखू खाउुन बाहेर थुंकलास काय रे तू?”
“नाही हो. हे बघा. अॅऽऽऽ” म्हणून त्याने जीभच बाहेर काढून दाखवली.
त्याने सगळी उजवी बाजू तपासली पण काही उपयोग झाला नाही. सगळयांनी आपापली तोंडे त्याला दाखवली तरीही कोण भेटला नाही म्हणून तो अजूनच चिडला. मग त्याचे लक्ष मोकळया असलेल्या शेवटच्या बाकाकडे गेले. बाकडयावर कोण नव्हते पण वर सामान ठेवतात त्याठिकाणी एक पिशवी होती. त्याने त्या पिशवीला हात घातला आणि विचारले, “ही पिशवी कुणाची आहे?”
अनेकवेळा विचारूनही काहीही उत्तर आले नाही. म्हणून त्याने पिशवी तपासली. आत एक टॉवेल आणि तंबाखूची पुडी दिसली. पिशवीची मालकी सांगायला कुणीही पुढे येत नाही असे दिसल्यावर त्याने आपला मोर्चा कंडक्टरकडे वळवला, “मास्तर कोण बसला होता इथं?”
कंडक्टरने सगळया प्रवाशांवर नजर फिरवली आणि म्हणाला, “एक काळी टोपी घातलेला माणूस होता.”
“कुठं गेला मग?”
“काय माहित? कुणीतरी दरवाजा उघडल्यावर मी पडलो त्या गडबडीत काही कळलंच नाही. बहुतेक त्याला तुम्ही चांगलाच चोप देणार असा डाउुट आला असेल म्हणून पिशवी टाकून पळाला वाटतं!”
त्या अनोळखी काळया टोपीवाल्याला शिव्या देत तो माणूस खाली उतरला आणि गाडीवर बसून निघून गेला. ड्रायव्हरने कंडक्टरला हाक देत बस सुरू केली, “ये निकमा, पाण्याची बाटली घे लेका. पान आण म्हटल्यावर तंबाखू टाकून आणलंस होय? लेका गिळावं लागलं की.”
“मग कुणी सांगितलं हुतं गिळायला?”
“कुणी सांगितलं नव्हतं, पण घावलो असतो तर पावण्यानं दणकून मला पैलवानच केला असता. च्यायला, गाडी चालवत पान खायची काय सोयच राहिली नाही आता.”
©विजय माने, ठाणे.
khup chan ……
LikeLike