आमच्या शिक्षणाचा श्रीगणेशा!

आयुष्यातील माझी शाळा चालू झाली ती चुकवण्यापासूनच. आमच्यावेळी आताप्रमाणे शाळेचे नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी वगैरे चोचले नव्हते. पहिलीत जाण्याआधी बालवाडीत एक वर्ष काढायला हवे ही माफक अपेक्षा गुरुजनांची असायची आणि गुरुजी म्हणतात ते फायनल असा घरी दंडक असायचा. आमच्यावेळी फी वगैरे तर अजिबातच नसायची. उलट शाळेत हजर होणार्‍यास रोज नवनवीन खाउु मिळायचा (हा खाउु मात्र आमच्या नशीबी कधी आला नाही. जसजसे आम्ही पुढल्या वर्गात जाउु तसा मागल्या वर्गाला खाउु सुरू झाला. खाउु ठराविक वर्गाला व इंजेक्शन मात्र सर्वांना असा अन्याय आमच्यावर पहिल्यापासूनच होत आलेला आहे. इंजेक्शन दिल्यावर मुलांना खुश करण्यासाठी हरभर्‍याच्या डाळीसारख्या लाल गोळया “रोज एक खा.” म्हणून दिल्या जायच्या. जीभ लाल होण्याखेरीज त्या गोळ्यांनी काय व्हायचं हे त्या गोळ्या बनविणार्‍या आयुर्वेदाचार्यच जाणे!)
शाळेत गेल्यावर दंगामस्ती न करता एकाच ठिकाणी बसायला लागायचे. खूप कंटाळा यायचा (हे सगळं मला बाजुला रहाणारा एक मित्र सांगायचा. मला घरी येउुन राष्ट्रगीत, बाराखडी आणि अंकांची ओळख करून देणार्‍या या माझ्या गुरुमित्राला बेंडबत्ताशासारख्या पेन्सिली खायची विलक्षण आवड होती. पेन्सिली खाल्ल्यावर तो आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू खेळताना काहीतरी लावून तोंड पांढरे करतात, तसे दिसायचा.) म्हणून मला शाळेत जायला आवडायचं नाही. बाई गोष्टी सांगत असल्या म्हणून काय झाले? काही उचापती न करता एकाच ठिकाणी बसणे म्हणजे माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट होती. बालवाडीत जाण्याआधी शाळेला बुट्टी कशी मारता येईल या विचारात मी गढलो. मला एक युक्ती सुचली आणि मी ती आजमवायची ठरवली.
थोडयाच दिवसांत मी शाळेला म्हणून घरातून निघतो आणि शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतातल्या एका आजोबांशी दिवसभर गप्पा मारत बसतो ही माहिती कुठल्यातरी बालवाडीतल्या गुप्तहेराने माझ्या भावाला दिली. मला सगळया गोष्टी देउुनसुध्दा (सगळया म्हणजे एक पाटी, एक पेन्सिलीचा तुकडा आणि या दोन गोष्टी ठेवायला एक नायलॉनच्या वायरची पिशवी) मी शाळेला जात नाही हे ऐकल्यावर एकदिवशी भाउु जाम वैतागला आणि मी व माझी शाळा या विषयाचा आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच हे ठरवून माझी शोधाशोध सुरू झाली. घरातून मी कधीच शाळेला म्हणून निघालो होतो. ज्या आजोबांकडे गप्पा मारत बसायचो त्यानीही कधी नव्हे ते चिक्की खा म्हणून चार आणे दिलेले. शत्रुपक्षाचा डोळा चुकवून भूमिगत क्रांतिकारकासारखा लपतछपत चिक्की आणायला एकुलत्या एका वाण्याच्या दुकानावर गेलो आणि नेमका भावाच्या तावडीत सापडलो.
मग काय त्याने सरळ झोडपतच मला शाळेकडे घेतले. माझे दफ्तर परस्परच आजोबांच्या शेतातून शाळेत कुठल्यातरी चोंबडयाने पोहोचवले होते. जीवाच्या आकांताने मी सोड म्हणून ओरडत होतो पण भाउु काही मला सोडत नव्हता. एखाद्या मिरवणुकीमागून जावी तशी शाळेतली सगळी कारटी मजा घेत आमच्यामागे येत होती.
शेवटी बळाचा विजय झाला. गणपतीबाप्पाला पाण्यात टाकतात तसे मला भावाने शाळेत नेउुन आदळले आणि “आता जर परत घराकडे आलास किंवा त्या आजोबाकडे गेलास तर बघ.” असे धमकावून तो निघून गेला. जाताना बाईंनाही “दिवसभर ह्याला अजिबात सोडू नका.” म्हणून सांगायलाही तो विसरला नाही. त्यांना काय? त्या लगेच हो म्हणाल्या! लेकाचा स्वत: मात्र शिकला नाही आणि शिक्षणाच्या नावाने चिमुकल्या जीवावर जुलूम करत होता.
कुणाच्याही आयुष्यात नसेल असा माझ्या आयुष्यातला हा शाळेचा पहिला दिवस होता. त्याच्या माराने घरी परत जायची एवढी धास्ती घेतली होती की शाळा सुटली तरी मी शाळेतच बसून होतो. घरी गेलो तर हा बाबा पुन्हा मारत आणून शाळेत बसवेल ही भीती होती. माझ्या मित्राने मला ध्रुवबाळाची गोष्ट सांगितली होती. “हे देवा मला जिथून कुणीही खेचू शकणार नाही अशा ठिकाणी जागा दे.” असे म्हणणारा ध्रुवबाळ त्यादिवशी दिवसभर डोळयांतल्या पाण्यात तरंगत होता. त्यादिवशी जर मला देव भेटला असता तर “देवा, ज्या ठिकाणी एकही शाळा नाही त्याठिकाणी मला घेउुन चल.” असे मी सांगितले असते.
खूप दिवसांपासून ठरवलेली चिक्की खाणार होतो, अगदी समोर आलेली चिक्की थोडक्यात हुकली. तिच्याऐवजी खरपूस चोप मिळाला. शाळा सुटल्यावर सगळी मुलं घरी गेली. संध्याकाळ व्हायला आली. घरी जावे की नको हा विचार चिमुकल्या बालमनाला पडला होता. भावाच्या माराशिवाय सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते. पोटात भुकेने कावळे ओरडत होते. पिशवीत पेन्सिल होती पण मला ती खाण्याची आवड नव्हती.
शेवटी हात जोडून देवाचा धावा केला आणि डोळे उघडले तर समोर मला घरी न्यायला आलेली आई दिसली. सगळा दिवस विसरून आनंदाच्या भरात दफ्तर तिथेच टाकले आणि धावत जाउुन मी तिला मिठी मारली.
पण तेव्हापासून जी शाळा मागे लागली ती कधीही न सुटण्यासाठीच!

©विजय माने : हसरी उठाठेव
पुढील विनोदी लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फेसबुकवरील ‘हसरी उठाठेव’ हे पेज लाईक करा.

हसरी उठाठेव : विजय माने

About Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). ४. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s