‘टवाळा आवडे विनोद’ या सुप्रसिद्ध म्हणीचे ओरिजिनल लेखक दुसरे तिसरे कोणी नसून श्री. नारायण ठोसर आहेत. भटजीने “शुभमंगल सावधान…” असे म्हणताच मंडपातून धुम पळालेले नारायण ठोसर म्हणजेच समर्थ रामदास एक शिवकालीन संत होते. त्यांच्या समकालीन संतांचा समाजातील लोक खूप छळ करायचे. ते काही लिखाण वगैरे करत असतील तर त्यांच्या वहया नदीत बुडवायचे. त्यांना त्रास दयायचे, त्यांच्या दुकानातून सामान पळवायचे. पण समर्थ रामदास नेहमी जिममध्ये जात असल्याने त्यांच्या नादी कोण लागत नव्हते. त्यांचे “मनाचे श्लोक” हे पुस्तक जाम गाजलेले आहे. पण हे हलके फुलके पुस्तक लिहीणार्या समर्थांना विनोद का आवडत नव्हता हे एक कोडेच आहे.
दंड, बैठका, सुर्यनमस्कारांनी तयार झालेले शरीर आणि हातातली कुबडी पाहून त्यांना “तुम्हांला विनोद का आवडत नाही?” किंवा “तुम्ही विनोद करणार्यांवर खार खाउुन का असता?” असे विचारण्याचे धाडस करणारा मुर्खच ठरला असता. त्यांच्या ‘दासबोध’ या अजून एका गाजलेल्या ग्रंथात त्यांनी मुर्खांची लक्षणे नमूद केली आहेत. थोडक्यात म्हणजे फिदीफिदी हसणार्यांवर त्यांची करडी नजर होती.
आज समर्थ असते तर आमची काही खैर नव्हती. आम्हांला विनोद आवडतो म्हणजे आम्ही टवाळ इथपर्यंत ठीक आहे. पण आम्ही टवाळखोरी करताना त्यांनी आम्हांला खचितच सोडले नसते. जय जय रघुवीर समर्थ!
©विजय माने, ठाणे.