वैभव चौथ्या मजल्यावरच्या खिडकीतून बाहेर बघत बसला होता. त्याच्या बिल्डींगमागे दुसर्या एका नव्या बिल्डींगचे काम चालले होते. दोन महिन्यात इमारतीचे दोन मजले चढले. अजून दोन झाले की दिवाळीच्या मुहुर्तावर लोक रहायला येतील. आपल्या स्वप्नातल्या घरात. काय लोकांची स्वप्न असतात! आपलं हक्काचं घर असावं, छान बायको असावी, एखादंच गोंडस बाळ असावं. ती पूर्ण करायला माणूस काय करत नाही? किती अॅडजस्टमेंट्स? मग शेवटी घर मिळते, यथावकाश स्वप्नवत कुटुंबही होतं. आणि आपलं?… आपल्या आयुष्यातल्या काही गोड स्वप्नांच्या चिंधडया झालेल्या. आजचा दिवस तरी आनंदात जायला हवा. एमपीएस्सीच्या एवढया खडतर प्रवासातून अपॉईंटमेंट लेटर मिळाले तरी मनाची उदासी म्हणून जात नाही. किमान आजचा आनंद शेअर करायला तरी ती आपल्याबरोबर असायला हवी होती.
पहिल्यांदा कधी बोललो आपण तिच्याशी? छे! असं आठवणं शक्य नाही. किती प्रसंग आहेत, पण अलिकडे ती आपल्याला खूपच आवडू लागली होती. खूपच! मुली मोठया झाल्या की निसर्गत:च त्यांच्यात एक तेज येतं, त्यांच्या प्रत्येक हालचालीत नजाकत येते. बोलण्यात हळुवारपणा येतो, म्हणून त्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. काहीही झालं तरी आपण तिच्यासाठी अक्षरश: वेडं झालो होतो हे मात्र मानलं पाहिजे. उठल्यापासून तीच मनात असायची. याआधी आपण तिला कितीतरीवेळा पाहिली होती, पण एवढं जबरदस्त आकर्षण कधी वाटलंच नव्हतं. किती छान चाललं होतं, आपण तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती अशी असेल. चांगल्या स्वप्नांपैकी एक स्वप्नं, ज्याने आपलं आयुष्य बदललं असतं…हो, बदललं असतं, ते बघता बघता विस्कटून गेलं.
तिच्याशी ओळख होउुन सात वर्षे उलटून गेलीत. तशी ओळख होण्याआधी ती अधूनमधून दिसायची पण खरी ओळख झाली ती कॉलेजला गेल्यावर. अकरावी ते बीएस्सी पाच वर्षे एकत्र होतो. किती अमाप वेळ होता आपल्याकडे, पण मनात ही भावना तो वेळ निघून गेल्यावरच का आली? चुंबकाच्या दोन विजातीय धु्रवांमध्ये आकर्षण असलं तरी त्या आकर्षणासाठी लागणारे कमीतकमी अंतर त्यांना पार करावंच लागतं हे बरोबरच आहे. ते अंतर मला कॉलेजमध्ये पार करता आलं नाही.
ती खरोखर वेगळी होती. प्रश्नच नाही. टिपीकल सायन्सची मुलगी म्हटलं की बायोचा गु्रप घेणार! बेडूक, उंदीर यांना फाडणार, त्यांच्या चांगल्या डायग्राम्स काढणार आणि त्याच अभ्यासात रमणार. बायोवाल्या मुलींचे असेच असते. त्यांना वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे असते की घनफळ याची आयडिया नसते. पण हिचा पहिल्यापासून मॅथ्स होता. बीएस्सीच्या शेवटच्या वर्षी आपल्या वर्गात तिला धरून एकूण तीन मुली होत्या. रम्य अशी ती एकटीच. मुले मात्र तीस!
आत्याच्या मुलाबरोबर लग्नाचं जवळजवळ पक्कं आहे असं ती दोनतीनवेळा म्हणाली होती खरं. मधून मधून तो कधीतरी दिसायचा. नेव्हीमध्ये कसला कमांडर होता. लग्नानंतर तिने नोकरी केलेलं त्याला अजिबात चालणार नव्हतं. असं का? लोक बायकोने नोकरी करावी म्हणून तिच्या मागे पडलेले असतात. व्यव्हारी विचार करणार्यालाही मुलीने नोकरी करण्यात वावगे काहीच वाटणार नाही, पण ह्याचं हे असं का असतं?
एकापाठोपाठ एक प्रसंग त्याच्या डोळयांपुढे तरंगू लागले.
आपण विनीतला घेउुन तिच्या घरी गेलो होतो. वर्षापासून खूप बोलणं कधी झालं नव्हतंच. क्लासच्या निमित्ताने तिच्याशी बोललो. उठता उठता म्हणालो, “मग कधी पाठवू ह्याला?”
“उद्यापासूनच येउु दे.”
“आणि फी नाही सांगितली?”
“आधी यायला तर लागू दे. फीचं नंतर बघू.”
आपण निघालोच होतो एवढयात काकी आल्या आणि आपल्याला विचारलं, “काय आज आमच्याकडे?”
“विनीतच्या क्लाससाठी विचारायला आलो होतो.”
“अरे त्याचा अभ्यास तू घ्यायचास! कशाला उगाच क्लास?”
“नाही काकी, मला तेवढा वेळ नाही. एमपीएस्सी चा अभ्यास करतोय मी.”
“अच्छा, मग येतोय का तो आमच्या मनिषाकडे?”
“हो. उद्यापासून येईल.”
आपण निघालो एवढयात काकीने तिला हाक मारली, “मनू , अगं चहा वगैरे तर केला होतास की नाही?”
तिनं जीभ चावलेली आपल्याला दिसली. आपल्याला आवडणार्या मुलीनं जीभ चावली की ती थोडी बावळट पण सुंदर दिसते. काकींनी थांबायला सांगितलं. चहा झाला आणि आपण निघालो. तिच्या घराचा दरवाजा बंद झाला आणि जाता जाता आपल्या कानावर काकींचा आवाज आला, “अगं आल्यावर चहा… किमान पाण्याचं तरी विचारावं माणसाला. तुझ्याच वर्गातला न गं तो? एवढं कसं कळत नाही तुला?”
दुसर्यांदा आपण घरी गेलो त्यावेळीही काकी नव्हत्या. क्लासची फी दिली आणि निघणार एवढयात तीच म्हणाली, “थांब जरा. सरबत घेउुन जा.”
“कशाला उगीच?”
“मुद्दाम नाही तुझ्यासाठी केला. पण घेउुन जा.”
तिनं ग्लास आणून दिला. आपण सरबत घेतला पण रहावलं नाही म्हणून आपण बोलून गेलो, “आय एम सॉरी.”
“कशाबद्दल?”
“माझ्यामुळं तुला त्यादिवशी काकींचं ऐकून घ्यावं लागलं.”
तिनं काहीसं हसत विचारलं, “तुला कसं माहित?”
“मी ते जाता जाता ऐकलं होतं.”
आणि सगळयात हाईट म्हणजे…
एकदिवशी दुपारी तिनं घरी भेटायला बोलवलेलं. बेल दाबली. तिनंच दरवाजा उघडला. मी आत आल्यावर बंद केला आणि काय होतंय ते आपल्याला समजण्याच्या आत केवढया आवेगानं आपलं चुंबन घेतलं. मुलींचे ओठ मधासारखे गोड असतात अशी आपली समजूत होती. पण ती फोल ठरली. असंख्य बाटल्या एकत्र केल्या तरी ती गोडी तयार करायला विधात्यालाही जमणार नाही. तिचा पहिला स्पर्श, तिच्याकडूनच पुढाकार. आपलं आणि तिचं हे पहिलं आणि शेवटचं चुंबन असेल याची कल्पणाही नव्हती.
“अरे वा, आज एकदम आक्रमक? कुठलं ड्रिंक घेतलं आहेस?” आपण मस्करीच्या सुरांत बोललेलो.
“का? जबरदस्ती फक्त तुम्हांलाच करता येते?”
“हो का?”
“मग? आता समजले ना, आम्ही मुलीदेखील काही कमी नसतो ते!”
इन्फॅक्ट काही समजून घ्यायच्या मन:स्थितीत आपण नव्हतोच. डोक्यात गोड झिणझिण्या आल्या होत्या. तशाच अवस्थेत सोडून ती घाईघाईने पर्समध्ये काहीतरी शोधायला गेली. आपल्याला पटकन एक पत्र दिलं आणि “पटकन जा, आई येईल कदाचित. आणि पत्राचे उत्तर लवकर दे, वाट पहाते.” असं म्हणाली.
केवढया आनंदात होतो आपण! ते पत्र वाचलं नसतं तर …कदाचित…मला समजलंही नसतं.
प्रिय देवेन,
तू मला नेहमी विचारतोस ना, माझं तुझ्यावर किती पे्रम आहे म्हणून? राजा, प्रेम नसतं तर एवढया सगळया गोष्टी शेअर केल्या असत्या का तुझ्याबरोबर? एक गोष्ट सांगायची होती, पण राहून गेली. हल्ली एकजण बहुतेक माझ्या पे्रमात पडला आहे. घाबरू नकोस. तो प्रेमात पडलाय, मी नाही. कॉलेजमध्ये माझ्याच वर्गात होता. बाजूच्याच बिल्डिंगमधला आहे. एवढा हुशार नाही. ग्रॅज्युएट झालाय. नोकरी करायची सोडून घरी बसून एमपीएस्सीच्या परीक्षा देतोय. कशाला तर म्हणे सरकारी नोकरी हवीय! भावाच्या क्लासचे निमित्त काढून घरी वगैरे येतो. बोलायला बघतो. आता त्याला खडसावून सांगेन म्हणजे सुधारेल. तू जास्त टेन्शन नकोस घेउु.
स्वत:ची काळजी घेत जा. तू कधी येणार आहेस ते सांग. वाट पहाते आहे. आणि लवकर लवकर लवकर ये. तुझ्या आवडीची थालीपीठं करायला मी आणि आईने सगळया वस्तू जमा केल्या आहेत. होणारा जावई ना तू? मग लाडक्या जावयाचे लाड नकोत का करायला? हो ना?
तुझीच,
मनूडी.
ते पत्र वाचून आपल्याला काय होतंय ते कळेना. जे काही वाचलं ते खरं आहे यावर विश्वास बसेना. वर्षभर माणूस एवढा खोटा वागू शकतो? तिच्या मनात आपल्याबद्दल असे विचार होते? एवढा मोठा विश्वासघात आणि आपल्याला त्याची पुसटशी कल्पनाही नाही या विचारांनी थरथरत होतो. त्याच दिवशी ठरवलं तिचा नाद सोडायचा. ती दिसली तरी तिच्याकडे बघणंही बंद झालं. आता फक्त एमपीएस्सीचा अभ्यास! कुणी हेटाळणी करावी एवढे आपण अॅव्हरेज नाही ही भावना मनात उफाळून आलेली. हिच्या नादाला लागलो, परीक्षेच्या काळात आजारी होतो, दोन्हीचा परिणाम म्हणून फेल झालो. त्याचं सांत्वन करायचे सोडून ही अशी लिहीते. तेही कुणाला तर तिच्या होणार्या नवर्याला? छे! माणूस ओळखण्यात केवढी मोठी चूक झाली आपली! खरोखर पोरी अनाकलनीय असतात ते खरं आहे. एकाच दिवशी सगळयात मोठा आनंद आणि सगळयात मोठं दु:ख कुणी दिलं तर तिनेच.
क्रमश:
©विजय माने, ठाणे.