किती वर्षे मी त्याला पहात आले आहे, हा मुलगा इतर मुलांच्यासारखा नव्हता. धाडस आणि ह्याचे नाते तसे कमीच. मुलींसारखा लाजरा बुजरा. आपण होउुन कुठल्या मुलींशी बोलणार नाही. कधीकधी मुलींची चर्चा चालायची आणि ह्याच्याबद्दल विषय निघायचा. हा असाच आहे, कुणाकडे पहात नाही, कुणाला भाव देत नाही, खूप आखडू आहे असे बोलायच्या. पण मला तो कधी तसा वाटला नाही. कॉलेजमध्येही तो हुशार होता पण मिरवण्याची भानगड नाही. माझे कॉलेज मिस झाले की मी त्याच्या वह्या घ्यायचे. कधी नाही म्हणाला नाही. मुलगी म्हणून मलाच देतोय, तर तसेही नाही. कधी कधी वह्या आहेत पण अभ्यास करायचा आहे असे स्पष्ट सांगायचा.
कॉलेज संपल्यावर बोलणंही कमी होत गेलं. एकदा विनीतसाठी क्लासबद्दल विचारायला आला. तो आल्यावर मी त्याला पाणीही विचारले नाही म्हणून आईने मला झापलं होतं. नंतर विनीतच्या क्लासची फी द्यायला आल्यावर तो त्याबद्दल सॉरी बोलला. पुढे फी द्यायला तोच येत राहिला आणि एकदिवशी त्याच्यात नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे जाणवले. आला तेव्हा घाबरलेला दिसत होता. जास्त काही बोललाच नाही. एवढेच काय, दरवाजाच्या आतही आला नाही. हातावर पैसे टेकवले आणि लगेच परत फिरला. नशीब मला पैसे मोजण्याची बुद्धी झाली आणि मी अक्षरश: वाचले. त्यात घडी करून ठेवलेली एक कविता होती.
तू समोर नसताना तुझ्यासाठी झुरावं
आयुष्याचं स्वप्न आहे तुझ्या कुशीत मरावं
इतके दिवस झालं नाही तुला कधी सांगणं
पण शक्य नाही अजून मला स्वत:शीच भांडणं
अंधारातल्या दिव्यासारखा आतल्या आत झुरतो आहे
सोबतीला एका पणतीची वाट मी पहातो आहे
होकार किंवा नकार असो खरं मला उमजू दे
माझ्या हाकेचा प्रतिसाद एकदातरी समजू दे
उत्तराची वाट पहातोय. जोपर्यंत उत्तर देणार नाहीस तोपर्यंत तुला दिसणार नाही.
काय उत्तर द्यावे मला कळेना. आवडत होता पण कुणाजवळ बोलायची सोय नव्हती. मी आणि मोठया आत्याच्या देवेनबद्दल सगळयांना माहिती होती. कॉलेज संपता संपता मीही त्याला दोनतीनवेळा बोलले होतेच पण त्यावेळी मनात असे काही नव्हते. नंतर चार दिवस कुठेच दिसला नाही. मग क्लास सुटल्यावर मीच विनीतला विचारले, “दादा दिसला नाही चार दिवस?”
“तो आजारी आहे.”
“काय झालंय?”
“माहित नाही, पण जेवत नाही. मम्मी ओरडत असते त्याच्यावर.”
“अच्छा.”
मी काहीच करू शकले नाही. चार दिवसांनी तो भेटला पण एका खच्चून भरलेल्या बसमध्ये. त्याक्षणी त्याचा केवढा आधार वाटला होता. तो नसता तर काय झाले असते माहित नाही. लोक गर्दीत हे चालायचेच म्हणून विसरून गेले असते. एका निर्लज्ज मुलाने धक्का दिला. काही बोलणार एवढयात सॉरीचे अत्तर शिंपडले गेले. त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर बघत उभा राहिले तरी ह्याचे चालूच. किती घाबरले होते! मुली कितीही शिकलेल्या किंवा पुढारलेल्या असल्या तरी कुठल्याही परपुरुषाने वाईट हेतूने स्पर्श केल्यावर त्या घाबरतातच. इथल्या इथे बस सोडावी असे मनात आले होते. पुढच्या स्टॉपवर उतरूया म्हणून मनाची तयारी केलेली, तेवढयात त्याच्या मुस्काडीत बसली. धक्का देणारा गर्दीतून वाट काढून पळून गेला. त्या मवाल्याच्या कानाखाली देणारा हाच तो लाजाळू वैभव का, हा मला प्रश्न पडला. बसमधले सगळे माझ्याकडे आणि त्याच्याकडे पहायला लागले. तो काहीच बोलला नाही. त्याला थँक्यू म्हणायचेही विसरलेे.
नंतर मी दिसावी म्हणून तो नाक्यावर उभा राहू लागला. खरं तर नाक्यावर उभा रहाणारा तो नव्हताच. नेहमीचं ते परिचित हसणं नाही, नजरेत एक प्रकारची खिन्नता असायची. आता उत्तर देणे भाग होते म्हणून दिले. एका सुंदर कवितेखाली दोनच ओळी लिहीलेल्या…
“मलाच पहायचे आहे ना, घरी येउुन बघ. नाक्यावर त्या मवाली मुलांबरोबर उभा राहिलेले मला आवडत नाही.”
पुन्हा तो तिथे दिसला नाही. एवढी ताकद असते प्रेमात? कोण कुणाचं एवढं ऐकतं? आपला देवेन… एकदा ड्रिंक करून आलेला आणि आपला हात पकडलेला. आपण का घाबरलो होतो तेव्हा? आपलं त्याच्याशीच लग्न होणार आहे ना? मग ती भीती कसली होती? त्याला ड्रिंक सोड म्हणून मी तीनवेळा सांगितलंय. तीनही वेळा तो हो म्हणाला पण बदल झाला का? हा आपला होणारा भावी पती! लग्न व्हायच्या आधीच आपल्यावर हक्क दाखवायला लागलाय.
लग्नानंतर मी नोकरी करायची नाही असे तो ठामपणे सांगतो. कारण स्त्रियांनी नोकरी केलेली त्याला आवडत नाही. तो आल्यावर सगळी कामे सोडून हसून त्याचं स्वागत केलं नाही तरी त्याला आवडत नाही. आणि ड्रिंक घेउुन आपण आपल्या होणार्या पत्नीशी कसे वागतोय हा विचार करण्याची त्याला गरज वाटत नाही.
बीएस्सी झाल्यावर कॉलेज बंद झालेच होते. मग माझ्या आतापर्यंत झालेल्या शिक्षणाचा उपयोग काय? म्हणून अकरावी बारावी मॅथ्सचे क्लासेस सुरु केले. छान विरंगुळा झाला. मुलंही यायला लागली. हक्काची नोकरी नाही म्हणून देवेन खुश! खरं म्हणजे माझे चुकलेच. आपले लग्न जवळजवळ निश्चित झालेले असताना कोणता विचार करून वैभवच्या पहिल्या कवितेला आपण त्याच्या घरी जाउुन उत्तर दिले होते? हाही माझा मुर्खपणाच की!
पण दरम्यान बर्याच गोष्टी घडून गेल्या. तो एमपीएस्सीच करायची आहे म्हणून झपाटून गेलेला. वेळ दोघांकडेही होताच. आम्ही गुपचूप बोलत होतो, पत्रे लिहीत होतो. एक वर्षाच्या या काळात आम्ही एकत्र चार नाटके पाहिली. दोन पिक्चर. पण हा विश्वामित्र. काहीही वावगे वागला नाही. पण दुसर्यांना पटायला हवे ना! आम्ही एकत्र फिरताना कदाचित कुणीतरी पाहिले असेल. शिवाय बायकांना हेरगिरी करायचा वेगळा कोर्स करावा लागत नाहीच. आमच्या या गोष्टी त्याच्या आईच्या कानावर गेल्याचे मला समजले.
मग एकदिवशी मीच त्याला घरी बोलवले. मलाही ज्या गोष्टीचे एवढी वर्षे कुतुहल होते ते मी केले. माझ्या फाजील धाडसाने तो हैराण झालेला. कुठलं डिं्रक घेतलंस म्हणून विचारत होता पण जबरदस्ती काय तुम्हांलाच करता येते काय असे विचारून मीच त्याला गप्प केला. त्याला काय माहित मीही किती घाबरले होते, पण मनापासून प्रेम करतो त्याचे एक चुंबन घेण्यात काय गैर आहे? निदान त्याक्षणी तरी मला काही चुकीचे वाटले नाही. आई येईल म्हणून गडबडीत पर्समधले पत्र काढून त्याला दिले आणि व्हायचे तेच झाले. वास्तविक ते पत्र माझ्या हातून जायला नको होते. वाचून त्याला काय वाटले असेल? आपल्याबद्दल तो काय विचार करत असेल याची महिनाभर मनाला चुटपुट लागून राहिली होती. त्यानंतर कितीतरीवेळा तो मला दिसला पण माझ्याकडे साधे बघितलेही नाही. ती अपेक्षा करणेही चुकीचे होते कारण मी त्याची खूप मोठी गुन्हेगार होते. सॉरी म्हणायला मला वावच नव्हता. मी तसं लिहायला नको होतं, पण आता त्याचा विचार करून उपयोग नाही. शब्दांनी त्यांचे काम केले होते. ते शरीराला जखमा करत नाहीत, ज्यांच्यासाठी असतात त्यांची मने मात्र घायाळ होतात.
सकाळीच काकी पेढे घेउुन मनूकडे आल्या. वैभवला अपॉईंटमेंट लेटर मिळाल्याचे तिला समजले. तिने हसत हसत पेढा घेतला. काकी आनंदाने परत गेल्या. मनू मागे वळली. डोळयांतले मोती गालांवर ओघळले. टेबलावर पडलेल्या पत्रावर तिची नजर गेली आणि सकाळपासून पन्नासवेळा वाचलेल्या पत्रातील त्या ओळीने या जगात आपल्यावर खरे प्रेम करणारे कुणीच नाही याची पुन्हा जाणीव करून दिली. ती टेबलाजवळ गेली. उघडया पत्रातली तीच ओळ पहिल्यांदा दिसली …
“मला तुझ्या आणि वैभवबद्दल सगळं काही समजलं आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू. माझी वाट पहाणं सोडून दे …देवेन.”
तिच्या डोळयांसमोर वैभवची आई आली. वर्षापूर्वी तो फेल झाल्यावर अगतिकतेने डोळयांत पाणी आणून त्याला फक्त तूच सुधरवू शकतेस असं सांगणारी आणि केलेल्या उपकाराची कृतज्ञता व्यक्त करायला पेढे देऊन हे सगळं केवळ तुझ्यामुळं होऊ शकलं, असं म्हणत भरलेले डोळे सांडणारी…
©विजय माने, ठाणे.
Nice story
LikeLike