आजकालचे शिक्षण म्हणजे भलतीच सुधारीत आवृत्ती आहे. आताचे दुसरी तिसरीतले बाळ ज्या सफाईने इंग्लिश बोलते किंवा त्याच्या अभ्यासातल्या शंका विचारते, तशा प्रकारचे इंग्रजी आम्हांला इंटरव्युव्हला जाताना यायला लागले. आताची पिढी खूपच चुणचूणीत आहे यात वादच नाही. बर्याचदा त्यांनी विचारलेली शंका काय आहे हेच कळत नाही. पण आता मला जे काही थोडेफार इंग्लिश येते त्यात सर्वात मोठा वाटा आहे आम्हांला पाचवीत इंग्रजी विषय शिकवणार्या पाटीलसरांचा.
एकतर आताप्रमाणे पहिलीपासून आम्हांला इंग्रजी हा विषय नव्हता. त्याची ओळख पाचवीत गेल्यावर झाली. आणि तेही रीड धिस, लिसन धिस असे नाही, तर ए बी सी डी पासून. पाचवीची सहामाही परीक्षादेखील या इंग्रजीच्या मुळाक्षरांवर व्हायची. त्याला कारण म्हणजे चौथीपर्यंतचे आमचे शिक्षण जि. प. शाळेत झालेले. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर शाळा बदलायला लागायची. हायस्कुल दोन किलोमीटरवर होते. मग हायस्कुला जाणारी सिनीयर पोरं शायनिंग मारायला “आता पाचवीत आल्यावर बघा. घ्या लवणी फटके आणि लाल पावडर.” असे म्हणायची. ही लवणी फटका आणि लाल पावडरची काय भानगड आहे याची आम्हाला जरादेखील कल्पणा नव्हती. त्यासाठी पाचवीत जावे लागले.
हायस्कुलला गेल्यावर पहिल्या दिवशी प्रार्थनेला उभे राहिल्यावर शिक्षकांची फौज बघूनच गार झालो. आमच्या मराठी शाळेत पहिली ते चौथी सगळी मिळून जेवढी मुलं नव्हती तेवढे शिक्षक प्रार्थनेला स्टेजवर उभा राहिलेले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक विषयाला नवीन शिक्षक! आमच्या पंचवीसएक विद्यार्थ्याचा पट (पहिली ते चौथी मिळून) असणार्या शाळेला तशी चैन परवडण्यासारखी नव्हती. आमचे भस्मे आणि पाटील गुरुजी मराठी म्हणा, गणित म्हणा, इतिहास असो किंवा भुगोल, सगळे विषय एकट्यानेच शिकवायचे. पण इथे मामला वेगळा होता.
बाकीचे सगळे ठीक आहे, पण लहानपणापासून इंग्रजीचा आम्हांला गंधच नव्हता. त्याची ओळख करून द्यायला आम्हांला सडपातळ बांध्याचे एक पाटीलसर होते. शाळेत रुळल्यावर लवणी फटका आणि लाल पावडर म्हणून ज्या गोष्टी प्रसिध्द होत्या त्या याच सरांमुळे हे कळले.
लाल रंग त्यांचा आवडता रंग असावा कारण स्टाफरुममधून येताना फळ्यावर लिहायला ते लाल खडू घेऊन यायचे. फळ्यावर जी पण काही लिखापडी व्हायची ती लाल खडूने व्हायची. विदयार्थ्यांना इंग्रजी शब्द पाठ करायला लावणे आणि जो पाठ करत नाही त्याचा खरपूस समाचार घेणे हा त्यांचा पूर्वीपासूनचा कायदा होता. ते वर्गात आले की पाठ करायला सांगितलेल्या शब्दांची उजळणी व्हायची आणि ज्याचे शब्द पाठ नसतील त्याला ते पुढं बोलवायचे.
नंतर नंतर त्यांचे हे वेळापत्रक आमच्या अंगवळणी पडले पण सुरवातीला काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी झाडून सगळ्या शाळांचा पांढरा शर्ट आणि खाकी हाफ चड्डी असा युनिफॉर्म असायचा. पालकलोक फुलपॅन्टसारखी चैन दहावीच्या पुढे करु द्यायचे. त्यामुळे गुडघाच काय, मांडीच्या खालचा भाग सतत उघडाच असायचा. बर्याच उपद्व्यापी नगांचे गुडघे तर हेडलाईट फुटल्यावर समोरुन कार दिसेल तसे दिसायचे.
पाटीलसरांनी पुढं बोलवले की पोरगा बिचारा आधीच गोंधळलेल्या चेहर्यावर ‘बोंबलायला शब्दच पाठ होत नाहीत तर माझी काय चूक?’ हा प्रश्न घेऊन सर्वांसमोर यायचा. त्याला पाटीलसर सगळ्या वर्गाकडे तोंड करून उभा रहायला सांगायचे. ऑपरेशनच्या कॉटवर पडल्यावर आता पुढे काय होणार आहे अशी जशी पेशंटला कल्पणा नसते तशी अवस्था त्या पोराची व्हायची. मग ते सर त्याला तसाच उभा ठेऊन फळ्यावर जे काही लिहीले आहे ते डस्टरने न पुसता हाताने पुसायचे आणि पुढे काय होतंय हे समजायच्या आत वर्गात चटाक असा आवाज घुमायचा. गुडघ्याच्या बरोबर मागच्या बाजूला असणार्या पायाच्या लवणीत फटका बसायचा आणि पोरगा एका पायावर भांगडा करायचा.
माराची ही अनोखी पध्दत शोधून काढणारे पाटीलसर नुसते मारायचेच असे नाही. कधी कधी ते शंभरएक शब्द पाठ करायला द्यायचे आणि जो कोण स्वेच्छेने हे आव्हान स्वीकारेल आणि निभावूनही नेईल त्याला पाटीलसरांनी स्वत:च्या पैशानी आणलेला बॉलपेन बक्षिस मिळायचा.
मलाही लवणी फटक्याचा मोह बरेच दिवस होता. पण लवणी फटका बसला की दिवसा चांदण्या दिसतात असे बर्याचजणांचे मत पडल्याने पाटीलसरांकडून तो घेण्याच्या फंदात मी कधी पडलो नाही. त्याचा एकूणच पुढच्या आयुष्यात फायदा झाला, शाळेय जीवनात आगंतूक सामोरे आलेले अगम्य इंग्रजी आणि या पाटीलसरांच्या धसक्याने इंग्रजीशी कधीही पंगा घेतला नाही.
©विजय माने, ठाणे.