कुठलीही नवीन गोष्ट मी अतिउत्साहाने सुरु करतो. वयाच्या बावीसाव्या वर्षी प्रथमच कुंडली काढून घ्यायचा उत्साहसुद्धा तेवढाच अमाप होता. आपली कुंडली ही जगातल्या कुठल्याही माणसापेक्षा भारी असणार हा माझा एक भ्रम होता. ज्योतिषाने तो ताबडतोब फोडला हा भाग वेगळा. बर्याच संशोधनाअंती माझ्या कुंडलीत अनेक दोषांबरोबर अर्धसर्पकालदोषही मिळाला. म्हणजे निम्म्या वयात माणूस साप वगैरे चावून मरतो की काय अशी मला शंका होती पण ती खोटी ठरली. अर्धसर्पकालदोष म्हणजे शक्ती, युक्ती, बुद्धी असूनही त्याचे म्हणावेसे फळ मिळत नाही असा काहीसा भावार्थ होता.
“आता काय करायचे मग?” हे ऐकल्यावर सगळे महाभारत घडून गेल्यावर कृष्णस्पर्शाने शक्तीहीन झालेल्या अर्जुनासारखी माझी अवस्था झाली.
“त्यासाठी ग्रहशांती करणे आवश्यक आहे.”
“म्हणजे काय?”
“काय आहे, तुमचा जन्म साडेसातीच्या काळात झाला असल्यामुळे हे सगळे दोष आहेत.”
आता कोणत्यावेळी जन्माला येणं हे आपल्या हातात थोडीच असतं? पण माझी जन्मवेळ साडेसातीशिवाय असूच शकत नाही हे मला कुंडली काढायच्या आधीही माहिती होते. एक काम म्हणून व्यवस्थित होणार नाही. शाळेत पंधरा ऑगस्टला गोळया बिस्कीटे वाटत असले तरीही माझ्याजवळ येऊन संपणार! रेल्वेचा पास काढायचा असो, माझा नंबर आल्यावरच खिडकी बंद होणार. असो, अजून नको.
“आता हा बघा प्लुटोचा दोष.”
त्या पत्रिकेत बघितल्यावर प्लुटो ऐवजी ‘प्लुटौ’ हा मुद्रणदोष तेवढा मला लगेच कळला. पण त्यांच्यामते प्लुटोचा खरा दोष वेगळाच होता.
“हा दोष म्हणजे अतिचिकीत्सक वृत्ती.”
“म्हणजे?”
“आता आपण चहाचेच उदाहरण घेऊ. तुम्ही चहा गुपचूप पिणार नाही. त्यात साखर टाकली? ती कुणाच्या दुकानातून आणली? त्याने कुठल्या कारखान्यातून आणली? ती साखर ज्या ऊसापासून तयार झाली तो उस कुणाच्या मालकीचा होता? त्याने त्या उसाला रासायनिक खते दिली होती का? त्या रासायनिक खतातला एखादा विषारी घटक चहा पिल्यावर आपल्या पोटात जाणार नाही ना? एवढे सगळे विचार तुमच्या मनात येतील किंवा तुम्ही ते दुसर्यांना विचाराल.”
जोतिबाशपथ सांगतो असे विचार माझ्या मनात आले नव्हते. ह्यांचा बिनसाखरेचा चहा पिल्यामुळे तुम्ही साखर कुठून आणली आहे हे विचारायचा प्रश्नच नव्हता. पण बिनसाखरेचा चहा त्यांच्याबरोबर मलाही दिल्यावर त्यांना डायबेटिस तर नाही ना हा एक विचार माझ्या मनात येऊन गेला.
त्यांनी आडव्या उभ्या चौकोनात बघून विचारले, “तुमचे आणि तुमच्या आईचे का पटत नाही?”
“नाही. असे काही नाही. चांगले पटते.”
“तुमच्या बाबांना काही दम्याचा आजार?”
“नाही.”
“नाही कसा? असायलाच पाहिजे.”
“काय?” मी ओरडलोच.
“हा पत्र पाठवून विचारा. असं क्लीअर लिहीलय त्यात.” मी बारीक नजरेने पाहिले, त्यात असे काही लिहीले नव्हते. त्या कुंडलीत माझं काही सापडतच नव्हते. ते माझे कुंडली बघत होते की माझ्या आईबाबांची कळत नव्हते.
“अतिमहत्वाची वर्षे म्हणाल तर १९७९. काय आठवयतंय तुम्हांला?”
“अहो परवाच्या गोष्टी मला नीट आठवत नाहीत. मागच्या जन्मात घडल्यासारख्या वाटतात आणि एकोणऐंशीचे कसे आठवणार त्यावेळी तर मी एका वर्षाचा होतो.”
“बघा तरीही.”
मी विचारात पडल्यासारखा चेहरा केला.
“दुसरे महत्वाचे वर्ष म्हणजे १९८७. आठवा.”
मी एकोणऐंशी सोडून लगेच सत्त्याऐंशी सालात आलो. १९७९ साली माझ्या आयुष्यात अतिमहत्वाचे काय झाले हे मी दोन हजार ईसवी सनात आठवत होतो. त्यावेळी बालविवाहाची पद्ध्त नव्हती. असती तर कदाचित सत्त्याऐंशी साल अतिमहत्वाचे वर्ष झाले असते.
“तुम्हांला शहान्नवपर्यंत अतिशय त्रास झाला.”
“अहो शहान्नवचे काय घेऊन बसलाय अगदी आत्तादेखील तुमचे घर शोधायला किती त्रास झालाय, तुम्हांला काय सांगू?” असे त्यांना सांगावे मनात येत होते.
“नाहीतर पत्रिका तशी छान आहे.”
“एवढे दोष आहेत आणि कसली छान?”
“म्हणूनच म्हटलं छान आहे.”
टीप : फोटोतील पुरस्कार दिवाळी अंक २०१८ स्पर्धेतील सुभाषित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘नवरदेवाची फजिती’ या कथेसाठीचा आहे.
©विजय माने : हसरी उठाठेव
पुढील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फेसबुकवरील ‘हसरी उठाठेव’ हे पेज लाईक करा.
Mastach sir…👍👍
LikeLike
mast. vinodi lekh. khup hasu yete.
LikeLike
Thank you so much!!
LikeLike