गुवाहाटीवरून मुंबईला परत येत होतो. आठदहा दिवस घराबाहेर आल्याने परत जायची ओढ होती. तीनचे फ्लाईट पकडायला बारालाच हॉटेलमधून निघालो. टॅक्सी घेऊन एअरपोर्टला चढलो. बॅगेज स्क्रिनिंग झाले आणि बोर्डिंगपास घ्यायला गेलो.
एअरलाईन अडेंडंटने माझे हसून स्वागत केले. मी तिला विंडो सीट मिळत असेल तर द्यायला सांगितले पण विंडो सीट नव्हती. दीड तास लवकर येऊनही माझा सिक्वेंस नंबर एकशे पंधरावा होता. शिवाय वेळेसाठी अजूनतरी इंडिगो एअरलाईन्स प्रसिद्ध आहे म्हणून सगळेजण लवकरच येतात.
पास घेऊन निघालो आणि काय विसरले आहे ते आठवायला लागलो. माझे स्वेटर बॅगेजमध्ये टाकायचे विसरले होते. आणि स्वेटर अंगात असेल तर पाकिट बोर्डिंगपास वगैरे पॅन्टच्या खिशात ठेवावे लागतात. सेक्युरिटी चेकला गेलो. तिथे माझ्यापुढे एक प्राचीन महानुभाव होता. लॅपटॉप तसाच खांद्यावर घेऊन चालला होता. सीआयएसएफच्या लोकांनी त्याला थांबवला. मग त्याने लॅपटॉप चेकिंगसाठी दिला. त्याच्या अंगातले जाकिट उतरवले ते चेकिंगसाठी बॅगेज स्कॅनरसाठी देण्यात आले. पास घेऊन त्या ऑफिसरसमोर उभा राहिला. एवढे सगळे होईपर्यंत आमचे स्कॅनर मध्ये टाकलेले सामान चेक होऊन पुढे ढीग लागून पडले होते. तिकडे लोकांची झुंबड उडाली होती. तो पुढे गेला आणि मी सेक्युरिटी चेकसाठी उभा राहिलो. चेकिंग झाले आणि माझा लॅपटॉप कुठे आहे ते शोधायला गेलो. पुढे दोन ट्रे पडले होते ते चेक केले पण त्यात नव्हता. घाबरणे साहजिकच होते कारण त्या लॅपटॉपची किंमत माझ्या पगारातून जाणार होती.
शेवटी बाजुच्या ट्रेमध्ये ठेवलेला एकदाचा तो दिसला. रिक्वेस्ट करून पाहिली पण तो बाबा देईना. त्याच्याशी भांडण काढून ते सामान घेतले आणि पुढे गेलो आणि माझ्या लक्षात आले माझ्याजवळ बोर्डिंगपास नाही आहे. त्याला (ज्याच्याशी भांडण काढून आलो होतो) विचारले. माझा पास सापडत नाही हे समजल्यावर त्याला आनंद झाला आणि त्याने एअरलाईनवाल्याला सांग म्हणून सांगितले. मी जवळच उभा असलेल्या एअरलाईन स्टाफला सांगितल्यावर तिने चारपाचवेळा वॉकीटॉकीवरून बोलवून त्यांच्या कुणाला सापडला नसल्याचे कन्फर्म केले.
मग ती मला बोर्डिंग एरियात घेऊन गेली आणि वेट करायला सांिागतले. तिथे दोघेचौघे येऊन मी माझा बोर्डिंगपास कसा हरवला याची चौकशी करायला लागले. एका हातात गुवाहाटीवरून घेतलेल्या चहाची पिशवी, पाठीवर लॅपटॉप आणि स्वेटर घातलेला मी एखादी निर्वासित माणसे त्यांच्या प्रदेश सोडून पोटासाठी दूर कुठल्यातरी प्रदेशात जातात तसा दिसत होतो. त्यांनी मला बाजूलाच थांबायला सांगितले.
माझा हवालदिल झालेला चेहरा बघून मॅडमने सांगितले, “काही काळजी करू नका. तुमचा पास नाही मिळाला तर आम्ही दुसरा देतो पण लगेच दुसरा देता येणार नाही. त्यासाठी तुम्हांला सगळयाच्या शेवटी थांबायला लागेल. मी बाजूच्या सीटवर बसून विचार करायला लागलो. चांगले पुस्तक वाचता येईल असा विचार केला होता पण आपल्याला कामाला लावून हा चांगला वाचत बसलाय असा ते विचार करतील म्हणून तसाच बसलो. एवढयात फ्लाईटसाठी बोर्डिंग अनाऊंसमेंट झाली आणि लोकांनी आत जायला सुरवात केली. सगळी लाईन संपत आली. मी हे लोक मला घेऊन जातात की इथेच ठेऊन जातात ते कळेना म्हणून मी मध्येच जाऊन त्या मॅडमला विचारले. थांबा असे उत्तर आले.
एवढयात तिथे एक मॅडम कुणाला तरी शोधत आल्यासारखी आल्यावर का कुणास ठाऊक मी तिला हात केला आणि ती माझ्याकडे आली. ती बहुतेक दुसर्या कुणालातरी शोधत असाावी कारण तिने येऊन नाव विचारल्यावर मी माझे नाव सांगताच ती जशी आली तशीच अचानक निघून गेली. तो बोर्डिंगपास काही केल्या मिळत नव्हता आणि पाच पाच मिनीटाला मुंबईवरून बायकोचा फोन येत होता.
रागानेच फोन उचलला, “काय आहे?”
“बसला का फ्लाईटमध्ये?”
“नाही बसणार बहुतेक.”
“का?”
बॉस आणि बायको जन्माच्या अबाधित हक्काने हा प्रश्न विचारू शकतात.
“माझा बोर्डिंग पास हरवलाय कुठेतरी. मिळत नाहीये तो.”
“मग कसे येणार?”
“आता माझ्याशी वाद घालू नको. हे लोक मला तसाच सोडतात का ते पाहतो.”
मी फोन बंद केला. तिने घाबरून गणपतीला प्रार्थना केली असावी. चांगल्या गोष्टी घडू लागल्या.
सगळे लोक आत गेल्यानंतर त्या मॅडमने चेकइन काऊंटरला वॉकीटॉकीवरून सांगितले ज्या नगाचा बोर्डिंगपास हरवला आहे त्याचा नवा काढ. मी त्याला तुझ्याकडे संजयबरोबर पाठवते. मी माझ्या बॅगा उचलल्या आणि त्या संजयमागे चालता झालो. त्या मॅडमने मला तिथेच बॅगा ठेवायला सांगितले. म्हणजे माझ्या बॅगा मी पहिल्या मजल्यावर ठेवायच्या. त्यांच्याकडे बघायला कोणीही नाही आणि मोकळा त्या संजयबरोबर तळमजल्यावर तो नवा पास घ्यायला जायचे. पण इलाज नव्हता, गेलो.
खाली गेल्यावर सेक्युरिटी चेकवरून बाहेर जाताना त्या संजयने ऑफिसरला माझा बोर्डिंगपास हरवलाय आणि तो आणायला चाललोय म्हणून सांगितल्यावर अगदी सहजतेने तो म्हणाला, “ओ पांडेजी, पास दिखाओ जरा बाजूमे रखा था वो.”
मग पांडेजीने बाजूला ठेवलेला पास हातात घेतला. त्यावर बघत टीव्हीवरच्या क्वीजशोमध्ये हातात कागद लपवून ठेवून विचारतात तसे मला नाव विचारले.
मी नाव सांगितल्यावर त्याला आनंद झाला, म्हणजे तो बोर्डिंगपास माझाच निघाला. त्याने तो संजयच्या हातात दिला. संजय तो मला देईना. मला आयकार्ड मागायला लागला. माझे आयकार्ड लॅपटॉपच्या बॅगेत पहिल्या मजल्यावर होते. निष्काळजीपणे पास हरवणारा महानुभव मीच आहे याच्यावर त्याचा विशास नव्हता. वर गेल्यावर त्याला आयकार्ड दाखवले आणि पास घेतला.
एअरलाईन स्टाफने तो तिच्या हातात घेऊन स्कॅन केला आणि ती मला म्हणाली, “हॅव अ नाईस फ्लाईट सर!”
अजून कसले नाईस फ्लाईट हवे होते देव जाणे!
तिच्या काँप्लिमेंट्स, हातातला हरवून सापडलेला चुरगळलेला बोर्डिंगपास आणि लॅपटॉपची बॅग घेऊन मी अत्यंत खुशीने विमानात चढलो. विमानात चढणारा मी शेवटचा प्रवाशी होतो.
©विजय माने, ठाणे.
खूप सुंदर सर !!!
या वर्षी दिल्ली ते पुणे हा विमान प्रवास करताना मला एक अविस्मरणीय धडा मिळाला होता…त्याची आठवण झाली…
LikeLike
‘have a nice flight sir ‘……..ajun kasle nice flight have hote.🤣🤣😂😂😂
LikeLike
Thank u so much😊😊
LikeLike