तुझ्याविना # 5

boyfriend-cold-couple-878668

रविवार असल्याने सकाळचे दहा वाजले तरी मी अंथरुणावरच लोळत पडलो होतो. मला काय झाले होते कळत नव्हते. डोक्यात आर्याबद्दलचे विचार चालू होते. अलिकडे मी सतत तिचाच विचार करत होतो. अगदी झोपेतून उठल्या उठल्या पहिली आठवण तिची यायची. कदाचित आज ती आपल्या नजरेस पडेल असे रोज वाटायचे. झोपतानाही तिच्याच विचारात कधी झोप लागायची ते समजायचे नाही. माझ्या विश्वात फक्त ती भरून राहिली होती. आपले मनही मोठे विचित्र असते, आपल्यालाही ते नीटसे समजत नाही. ज्याच्यात ते गुंतले आहे, सतत त्याच्याकडे ओढ घेते. बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेजे अशा ठिकाणी रोज आपण हजारो लोक रोज पहातो पण त्यांच्याबद्दल विषेश काही वाटत नाही. पण त्यात एखादा कोण स्पेशल असणार असेल तर मात्र गर्दीतून त्या व्यक्तीला आपण शोधत रहातो. मग बाजूला हजारो लोक असले तरीही आपण तसल्या गर्दीत एकटे असतो.
जर ‘तिने’ मनात घर केले असेल तर सतत तिचा विचार डोक्यात असतो. गर्दीत कुठेतरी ती नजरेस पडावी अशी अपेक्षा असते. मला खरोखर समजत नव्हते की मी आर्याला डोक्यातून का काढू शकत नाही. खरे सांगायचे म्हणजे तिला डोक्यातून काढायचा विचारही नकोसा वाटत होता. माझ्यासाठी ती कधीही डोक्यातून न निघणारी ती एक सुखद हुरहूर होती. पण यातून सुटायला एकच मार्ग होता आणि तो म्हणजे तिला सर्व काही सांगणे. पण तिला सांगायचे कसे हा देखील मोठा प्रश्न होता. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आल्याची बीप आली. मी मोबाईल चेक केला. दिवसातून येणार्‍या अनेक प्रमोशनल मेसेजेसपैकी तो एक होता. मी वाचून डिलीट करणार एवढ्यात मला काहीतरी क्लिक झाले. मी पुन्हा तो मेसेज उघडला.

तुमच्या व्हॅलेंटाईनला आजच्या दिवशी परफेक्ट डायमंड रिंग गिफ्ट करा आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसवर घसघशीत पंचाहत्तर टक्क्यांची डिस्काउंुट मिळवा.

एका नामांकित डायमंड ज्वेलर्सचा तो प्रमोशनल मेसेज होता. पंचाहत्तर टक्के सूट? कमाल आहे! दिवस कुठलाही असेल तर कसे परवडत असेल ह्यांना पंच्याहत्तर टक्के डिस्काउंुट द्यायला? मी पुन्हा तो मेसेज वाचला तर ती डिस्काउंुट प्रॉडक्टवर नसून मेकिंग चार्जेसवर आहे ते समजले. पण तरीही त्याच दिवशी का? मोबाईलवरची डेट पाहिली आणि मी चमकलोच. चौदा फेबु्रवारी, व्हॅलेंटाईन्स डे! परफेक्ट रिंगचे सोडा, काय परफेक्ट दिवस होता! शिवाय रविवार. ऑफिसमधून लवकर निघताना बॅनर्जीची कटकट वगैरे भानगड नव्हती. काहीही झाले तरी त्यादिवशी मी आर्याला मनात आहे ते सर्व सांगून टाकायचे असे ठरवले. मनातल्या मनात मी तिला प्रपोज करण्याची रिहर्सलही करून झाली. पण जसजसा तिच्याशी प्रत्यक्षात बोलण्याचा विचार करू लागलो तशी मनात भीती वाटायला लागली. सुरवात कशी करायची हेच समजेना. मन नकारात्मक विचारांनी भरून गेले.
मी प्रपोज केल्यावर तिची रिअॅक्शन काय असेल? ती माझ्याबद्दल काय विचार करेल? तिच्या मनात असलेल्या माझ्या प्रतिमेला तडा जाईल का? मनात अशा असंख्य विचारांचे काहूर उठले. मी ही एकदम टोकाला जाऊन ज्या घडणार नाहीत त्या गोष्टींचा विचार करू लागलो. तिने पोलिसांना सांगितले तर? छे, काय आपणही! एखाद्या गोष्टीला कुठच्या कुठे घेऊन जातो! मागच्यावेळी तिने तर मला भेटायला बोलवले होते, ती कशाला पोलिसांना सांगेल? मी तिला प्रांजळपणे सांगायचे ठरवले, मला तुझ्याबद्दल एकूण असे वाटते आहे आणि तू त्यावर विचार करून निर्णय घ्यावास. शक्यतो हो म्हण म्हणजे तुला आडनाव बदलण्याचा त्रास होणार नाही! फक्त मधलेच तेवढे नाव बदलायला लागेल. (हे प्रसंगाचे गांभीर्य कमी करायला.) होकार असेल तर लगेच सांग आणि मन नको म्हणत असेल त्याचे पटकन ऐकू नकोस, ते फसवे असते. पूर्ण विचारानंतरच तू निर्णय घे. त्यातूनही तुझा नकार ठरलाच तर मी तो ऐकायलाही तयार आहे. पण ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यातली असल्यामुळे कुणाजवळही बोलू नकोस. एकदा लोकांना समजले की लोक भलतासलता विचार करायला लागतात. त्यांचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी तूझ्या निर्णयाच्या विरुद्ध जाणार नाही आणि तुझा खरोखर नकार असेल तर तुला पुन्हा विचारणारही नाही. हे सगळे डोक्यातले विचार आणि मनातल्या आवाजांचे ऐकून मी पुढची तयारी सुरु केली.
माझ्यासाठी आर्याला प्रपोज करणे म्हणजे साधेसुधे काम नव्हते. शिवाय मी टाईमपास म्हणूनही तिला प्रपोज करणार नव्हतो. मला तिची साथ आयुष्यभरासाठी हवी होती. एवढे मोठे कार्य करायचे आहे म्हटल्यावर अंगी धैर्य असणे आवश्यक होते आणि ते येण्यासाठी मी मनातल्या मनात मोठ्या लोकांचे गाजलेले कोट्स आठवू लागलो. युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य असते, तुमच्या आणि तुमच्या ध्येयात किती अंतर आहे ते पाहू नका, त्यादिशेने फक्त पहिले पाऊल उचला ते आपोआप जवळ येत जाईल. चांगली सुरवात म्हणजे अर्धे ध्येय प्राप्त झाल्याची पावती असते वगैरे वगैरे. माझ्यात स्फुरण चढले आणि मी लगेच चार्ज झालो, लगेच बाजूचा मोबाईल घेऊन मी माझ्या ध्येयाला मेसेज टाईप करायला सुरवात केली.

दोस्ती की तडप दिल से निकाली नही जाती,
दिल मे छुपी चाहत मिटाई नही जाती,
चाहे कितनी भी दूरी क्यों न हो,
किसीकी चांद सी मुस्कान भुलाई नही जाती!

मी प्रेमात पडलेल्या शायरासारखे पटकन लिहीले खरे पण ते बाळबोध वाटत होते. मी पुन्हा पुन्हा वाचून त्यात काही दुरुस्ती करता येते का ते पाहिले, पण जमेना. शब्द थेट काळजातून आल्याने त्या भावना खर्‍या होत्या. पुन्हा पाठवावे की नको याचे द्वंद्व सुरु झाले. पण मला काहीतरी करणे आवश्यक होते नाहीतर ध्येय हातातून निसटून जाण्याचा धोका होता. शेवटी गणपतीबाप्पाला स्मरून दुसरे काहीही न लिहीता हा चारोळीचा मेसेज तिला पाठवून दिला.
पंधरा मिनीटे उलटून गेली तरी काहीही रिप्लाय आला नाही. हातात मोबाईल घेऊन एकटक मी मोबाईलच्या स्क्रीनकडे डोळे लावून होतो पण रिप्लाय येत नव्हता. माझा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचला तर असेल ना या असंबद्ध विचाराने मी हैराण झालो. मी पाठवलेला मेसेज फक्त आर्यानेच पहावा अशी मी देवाला प्रार्थना केली. दुसर्‍या कुणी पाहिला असता तर ओढवणार्‍या आणखी प्रसंगांना सामोरे जायची माझी मानसिक तयारी अजून तरी नव्हती. म्हणजे तसा विचारही केला नव्हता. पुन्हा दहा मिनीटांचा काळ लोटला तरीही मेसेजच्या रिप्लायचा पत्ता नव्हता. हा काळ मला वर्षभरासारखा वाटला.
शेवटी मेसेज येत नाही असे समजून नाखुशीनेच मी अंघोळीला गेलो. बाथरुममध्ये थंड पाण्याचा शॉवर अंगावर घेतल्यावर डोके शांत झाले. तेवढ्यात मोबाईलवर मेसेज आल्याची बीप कानावर पडताच मी पटकन शॉवर बंद केला आणि अर्ध्यावरच अंघोळ सोडून अंगही न पुसता तसाच बाहेर धावलोे. चार्जिंगला लावलेला मोबाईल खेचून आधी मेसेज उघडला आणि मी निराश झालो. वीस तारखेआधी क्रेडिटकार्डाचे बिल भरा असा बँकेकडून रिमाइंडर मेसेज होता. तो वाचून मोबाईल पुन्हा चार्जिंगला लावला आणि दोन पावलेही दूर गेलो नसेन इतक्यात पुन्हा मेसेजची बीप वाजली. येस्स! हा मात्र आर्याचा होता – एकच शब्द आणि एक विरामचिन्ह –

रियली?

तिच्या या एका शब्दावर काय म्हणून समजायचे? तिच्यासाठी लिहीलेला प्रत्येक शब्द थेट काळजातून आला होता ते तिला कसे सांगायचे या विचारात मी पडलो. मग नाखुशीनेन टाईप केले –

ऑफ कोर्स यार…तुम्हाला नाही कळणार ते!

पुन्हा एक मेसेज आणि बीप.

आज बिझी आहेस?

प्रोफेशनल लाईफमध्ये आम्ही वॉट्सअॅप फार कमी वापरायचो. वॉट्सअॅप वापरण्याचे काही तोटेही आहेत. बर्‍याचदा रात्री लोक इंटरनेट कनेक्शन बंद करून झोपतात त्यामुळे असा अचानक पाठवलेला वॉट्सअॅपचा मेसेज त्यांना मिळेल की नाही ती धास्ती असते. शिवाय लोकांच्या मोबाईलमध्ये वॉट्सअॅपचे असंख्य गु्रप असतात. बरेचशे हौशी लोक त्यावर टुकार मेसेजेसचा पाऊस पाडत असतात म्हणून बहुतेकवेळा वॉट्सअॅप वेळेवर पाहिले जात नाही. सतत फोन वाजत असेल तर त्याकडे दुर्लक्षही होते. त्यामानाने साधा टेक्स्ट मेसेज हा जुन्या काळातल्या तारेसारखा काम करतो. म्हणजे इंटरनेट नसलेल्या मोबाईलवरही तो तितक्याच तत्परतेने पोहोचतो. आर्याची बर्‍यापैकी ओळख होती पण निवांत वॉट्सअॅप चॅट करावी एवढी पर्सनल ओळख अद्याप झाली नव्हती. म्हणून मी ही मेसेजच केला.

नाही. अजिबात बिझी नाही.

मी उतावीळपणे तिच्या पुढच्या मेसेजची वाट पाहू लागलो. मला वाटले व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने माझ्याआधी तीच मला काहीतरी स्पेशल विचारेल वगैरे वगैरे…पण कसले काय? तिच्या पुढच्या मेसेजसाठी पुन्हा पंधरा मिनीटे वाट पहावी लागली.

आज काय स्पेशल करणार आहेस मग?

विषेश असे काहीच नाही. संध्याकाळी विवियानाला जाणार आहे.

ओके.

पुन्हा बराच वेळ शांतता झाली. म्हणून मीच एक मेसेज टाईप केला आणि जास्त विचार न करता पाठवून दिला!

तू ही ठाण्यातच रहातेस ना? येणार तू विवियानाला?

बावळटासारखा मी असा काय मेसेज केला ते मला समजेना. खरोखर तिच्यात मी वहावत चाललो होतो. तिला चक्क भेटायला येणार का असे विचारायचे धाडस कसे करू शकलो याचे माझे मलाच आश्चर्य वाटले.

थांब जरा मी काहीतरी चेक करतीये.

एखाद्या जुजबी ओळख असलेल्या मुलाने भेटायला येणार का असे विचारल्यावर कोणती मुलगी पटकन हो म्हणेल? शिवाय भलतेसलते विचारायचा नको तो आगाऊपणा केल्यामुळे माझी बाजू पडती होती. ती नेमके कशात आणि काय चेक करत होती ते समजायला मार्ग नव्हता. मी आपला तसाच वाट पहात राहिलो.

मी दोन वाजता तिथे आले तर चालेल?

तिचा असा रिप्लाय आल्यावर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. स्वत:लाच चिमटा काढून पाहिले. स्वप्न नव्हते. आर्या चक्क भेटायला हो बोलली होती. मला आनंदाचा झटकाच यायचा बाकी होता पण मी स्वत:ला आवरले. वास्तविक थोडी गैरसोय झाली होती पण साक्षात ध्येयाला भेटण्यासाठी तेवढी ठीक होती. सुट्टीचा दिवस म्हणजे माझ्यासाठी कपडे धुवायचा दिवस होता आणि काल रात्री कपडेही भिजत घातले होते पण जाऊ दे! संध्याकाळी निवांतपणे धुवायला येतील असे म्हणत ती चिंता मी लागलीच बाजूला सारली.

डन. आणि आता यावेळी चिटींग नको करूस.

ती भेटायला तयार झाल्यावर माझे धाडस थोडे वाढले होते.

बर्थडेबद्दल मी आधीच सॉरी बोललीये. माझ्या बॉसमुळे मी त्यादिवशी तुला भेटू शकले नाही. त्यासाठी माझ्यावर एक पार्टी आहे तुझी. ठीक?

फाईन. मग दोन वाजता विवियानाला भेटू!

तिला मेसेज पाठवला आणि माझा मेंदू ब्लँक झाला. एकदम कोरा. पुढे काय करायचे ते समजेना. तिला भेटणार तर आहे पण माझ्या मनातले सर्व काही सांगणार कसे आणि कोणत्या शब्दांत? मी प्रत्यक्षात तिच्याशी नीट बोलू शकेन की नाही ही देखील मला शंकाच होती. म्हणून मी बॅकअप प्लान आखून तो दिवस दोघांच्याही चांगलाच लक्षात राहावा यासाठी काहीतरी वेगळे करायचे ठरवले.
माझी डायरी ओढून मी आर्याला पत्र लिहायला घेतले. याआधी शाळेत असताना तीनचार मार्कांसाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा मित्राला वगैरे पत्र लिहील्याचे आठवले. पण आयुष्यात लिहीलेले पहिले खरे पत्र म्हणाल तर हेच. शाळेतल्या पत्र लिहीण्याची ती तालीम एका मुलीला प्रेमपत्र लिहायला कामी येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. या इंटरनेट आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात पत्र लिहीणारा मीच महाभाग असेन याची मला जाणीव होती पण पत्राची मजा काही औरच असते. खरं सांगायचं म्हटलं तर पत्रातल्या भावना फेसबुक किंवा मेलवर येत नाहीत. “लव यू…” असं लिहीलं तरीदेखील ते कृत्रिम वाटतं पण पत्रात ‘त्यादिवशी तुझं पत्र आलं, कुणालाही न दाखवता चोरून वाचलं खरं, पण का कुणास ठाऊक, मनात तुला भेटण्याची हुरहुर लागली…’ ही लाईन ज्याच्यासाठी असेल तोच त्यातली भावना समजू शकेल. असो, बराचवेळ देऊन मी छानसे पत्र लिहीले. कोण जाणे त्यादिवशी साक्षात माता सरस्वती मला प्रसन्न झाली होती. आधी चारोळी नंतर रोमँटिक पत्र…अशा अचाट गोष्टी करताना तशाच स्पेशल कुणात तरी गुंतायला हवं ही जाणीव मला पहिल्यांदा त्यादिवशी झाली.
दीड वाजता स्वच्छ पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून माझा आवडता लाईट परफ्यूम मारला आणि मी विवियानाला जायला तयार झालो. वाटेत आर्चिजमध्ये जाऊन तिच्यासाठी एक गिफ्ट घेतले. दोनला दहा मिनीटे बाकी असताना पार्किंगमध्ये बाईक पार्क करून बाहेरून मी विवियाना मॉलच्या एंट्रीजवळ पोहोचलो तर आर्या तिथे माझ्याआधी येऊन वाट पहात थांबली होती. तिने काळ्या रंगाच्या स्कर्टवर काळाच पण सोनेरी फुलांची नक्षी असलेला टॉप घातला होता. नाजूक मानेभोवती लाल रंगाच्या दुपट्टयासारखा काहीतरी प्रकार गुंडाळला होता. शिवाय पटकन कुणाचेही लक्ष वेधून घेतील असे रेशमी केस मोकळे सोडले होते. एकूण जी काही वेशभुषा आणि केशभुषा होती त्याने जवळून जाणारा प्रत्येकजण मान वळवून तिच्याकडे पहात होता पण हातात मोबाईल घेऊन ती आपल्याच नादात होती. काळा रंग जरी व्हॅलेंटाईन डे ला साजेसा नसला तरी तिच्या गोर्‍या रंगाला तो खूप खुलून दिसत होता. समोर मी दिसल्यावर किंचित मान तिरकी करून ती एवढी गोड हसली की पुढे काय बोलायचे ते मी विसरूनच गेलो. फक्त एअर इंडियाच्या महाराजासारखा कमरेत किंचित वाकून ‘मॉलमध्ये चला-’ असा मी हावभाव केला. माझ्या त्या हावभावाला मान देत ती म्हणाली, “आपण मॉलमध्ये जाण्याआधी डोनट्स पाहूयात का?”
मग मॉलमध्ये शिरण्याआधी बाहेरच असलेल्या मॅड फॉर डोनट्स नावाच्या कॅफेत आम्ही गेलो. मी तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेऊन होतो. तिचे निवांत चालले होते. कुठलीही घाई नाही, ते रंगीबेरंगी मेनुकार्ड हातात घेऊन ह्यात काय आहे, त्यात काय आहे अशी काऊंटरवर चर्चा करून तिने स्ट्राबेरी फ्रॉस्टेड डोनट सिलेक्ट केला तर माझ्यासाठी मी पटकन चॉकलेट क्रीमफिल्ड निवडला. मला मुलींच्या खाण्याचे नेहमीच नवल वाटत आलेले आहे. खातात एवढेसे, पण त्यांना चव खूप लागते. मग डोनट्स झाल्यावर आम्ही मॉलमध्ये गेलो. खरे सांगायचे म्हणजे तिच्याबरोबर वावरताना मलाच दडपण आले होते. एकतर बरेच लोक तिच्याकडे पाहून झाले की माझ्याकडे बघायचे आणि दुसरे म्हणजे खूप कमी अंतर ठेऊन तिला स्पर्श न करता चालायची कसरत करावी लागत होती. तिने मारलेल्या परफ्युमचा सुवासाने माझ्या नाकाबरोबर मेंदूचाही ताबा घेतला होता. तिचा तो परफ्युम खरोखर स्वप्नांच्या जगात घेऊन जात होता.
सगळा मॉल लाल रंगाने सजला होता. जागोजागी लाल फुगे व रिबीन्स बांधल्या होत्या. प्रेमात पडलेल्या कुणीही कोणता उत्सव ते असेल ओळखले असते. एकूणएक गिफ्ट शॉप्स लाल रंगात चमचमत होती. चॉकलेट्स, केक्स, परफ्युम्स, लाल गुलाबाची फुले ठिकठिकाणी सुशोभित केली होती. दुकाने अशा रितीने सजवली होती की आत मांडून ठेवलेल्या वस्तू येणाजाणार्‍यांना लगेच दृष्टीस पडतील आणि लोक दुकानात एंट्री करतील.
प्रेमीयुगुले त्यांच्या आभासी जगात विहरत होती. त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वहात होता. मी देखील आनंदी होतो पण बाकींच्याएवढा नव्हतो. आमचा निर्णय अजून बाकी होता, ती एक गोष्ट क्लीअर असती तर मी ही त्यांच्या एवढाच खुश झालो असतो. बरेचजण आम्ही भेटलो तसे पहिल्यांदाच भेटत होते. दोघांच्या अंतरावरून त्यांच्या रिलेशनशिपचा बर्‍यापैकी अंदाज येतो तसे त्यांच्या हालचालीवरून समजून येत होते. नवीन लग्न झालेले काही लोकही एकमेकांच्या कमरेभोवती हात टाकून जगाचे भान विसरून फिरत होते. विषेशत: मुली खूप खुश दिसत होत्या. चेहर्‍यावर लज्जा आणि हसू याचे मिश्रण घेऊन त्या वावरत होत्या.
आम्ही कोणत्याही ठराविक ठिकाणी जायचे असे ठरवले नव्हते, त्यामुळे बाहेरूनच वेगवेगळी शोरुम्स आणि तिथे असलेल्या डिस्काऊंट्स पहात आम्ही फिरत होतो. पूर्ण मॉल फिरून झाल्यावर शेवटी आम्ही फुडकोर्टमध्ये जाऊन बसलो. दुपारचे जेवण झाले नसल्याने मॅक्डोनल्ड्समधून खायचे हे तिनेच डिसाईड केले व स्वत:लायनीत उभे राहून ऑर्डर दिली. मी बिलासाठी पाकिट काढले होते पण आर्याने तिच्या वाढदिवसाची पार्टी देते आहे म्हणून मला बिल देऊ दिले नाही. तिला फुडकोर्टमधल्या एका शांत ठिकाणचा टेबल दाखवून तो पकडायला सांगितला आणि मी ऑर्डर घेऊन आलो. वास्तविक तो टेबल पकडायचे कारण म्हणजे आजुबाजूला थोडी कमी गर्दी असल्याने तिच्याशी निवांत बोलता आले असते. मग गप्पा मारत खाणे सुरु केले.
तिच्या एकंदरीत बोलण्यावरून ती ऑफिसमध्ये चांगलीच रमली आहे ते समजत होते. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या पण माझ्या कंठातून जो निघायला हवा होता तो प्रश्न निघत नव्हता. बराचवेळ शांतता होती ती संधी साधून मी घसा खाकरला. मला काहीतरी वेगळे बोलायचे आहे ते बरोबर ओळखून आर्या सावरून बसली.
“आर्या, मला तुला काहीतरी सांगायचे आहे.”
चेहर्‍यावर कसलेही भाव न आणता शक्य तेवढी नॉर्मल राहून फ्रेंचफाईजचे एक टोक सॉसमध्ये बुडवत तिने विचारले, “काय? सांग ना मग.”
“कुठून सुरवात करु ते समजत नाही.”
“कुठूनही कर.”
“तुला एक विचारू?”
“ठीक आहेस ना तू समीर? असे बावळट प्रश्न का विचारतोयस?”
या तिच्या प्रश्नाने मला आणखीच नर्व्हस केले आणि मी माझ्या मोबाईलसारखा सायलेंट मोडवर गेलो. बराचवेळ काहीही बोलत नाही ते ओळखून पुन्हा तीच म्हणाली, “विचारतोयस ना काहीतरी?”
“थोडे पर्सनल आहे.” खाली मान घालून तिच्या मूडचा अंदाज घ्यायचा मी प्रयत्न केला.
“मला माहित आहे तू काय विचारणार आहेस ते.” गोड हसून ती असे बोलल्यावर मनावरचे दडपण थोडे कमी झाले. तरीही आपण जणू काय या गावचेच नाही हा भाव चेहर्‍यावर आणत मी विचारले, “काय?”
“तुझे माझ्यावर प्रेम आहे आणि माझेही तुझ्यावर आहे की नाही. हेच ना?”
“नाही.”
“मग?” हे नाहीतर मी अजून काय विचारणार आहे या आश्चर्याने ती हैराण झाली.
पहिल्यांदाच मी तिच्या डोळ्यांत पाहिले. अगदी आरपार. आणि काळजाचे पाणी झाले. माझ्या =दयाची धडधड मला ऐकू येत होती. तिचे डोळे एवढे बोलके होते की माझ्या तोंडातून शब्द फुटेना. तळहात आणि बुटांच्या आत असलेल्या तळपायाला एकाएकी घाम आल्याचे जाणवले. जन्मापासून माझ्या शरीरात असे होणारे अचानक बदल मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. ती फक्त स्मित करून माझी झालेली शिकार पहात होती. माझी सहजता हरवून गेली आणि तिच्या डोळ्यांत डोळे घालून मी इंटरव्युव्ह देतात तसे बोललो, “अॅक्च्युली तू मला खूप आवडतेस.”
तिच्या चेहर्‍यावरची झरझर बदलणारी लाली मला दिसली. झुकलेल्या नजरेने तिने कपाळावर हात मारून घेतला. वाटले बस्स, हा क्षण संपूच नये.
“तू पण ना समीर! मला माहित होतं ते. तेच तर बोलले ना मी?”
“पण मी तुझ्यावर प्रेम करतोय असे म्हणालो?”
“मग?”
“तू मला खूप आवडतेस आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय.”
“काय?” मी काय बोललोय हे तिला चांगलेच समजले होते पण रिकन्फर्म करायची अशी एक पद्धत असते.
“थांब. माझे अजून संपले नाही.”
“अजून काय आता?”
“करशील माझ्याशी लग्न?”

वास्तविक माझ्या प्रश्नाने ती हैराण झाली नाही. मला वाटतं मी काय विचारणार आहे याची तिला पुसटशी कल्पना असावी. ती ही तयारीनिशीच आली होती. लगेच हो किंवा नाही असे काहीही बोलली नाही. विचार करायला थोडा वेळ मागितला. तो देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नसल्याने मी पुन्हा गप्प बसलो.
“मला वाटतं आपण चांगले मित्र आहोत.” या शब्दांनी मात्र मी थोडा घाबरलो कारण मुली ‘जस्ट फ्रेंड्स’ या गोंडस शब्दाने हो म्हणायचे टाळतात अशी एक अनुभवी टीप मला मिळाली होती. म्हणून मी पुढे काहीही बोलायला तोंड उघडले नाही.
“ऐकतोयस ना?”
“हंऽऽ”
“आणि तसा तू एवढा वाईटही नाहीस.” चला, झिडकारले नाही, म्हणजे होकाराचा चान्स होता तर!
“आणखी काही दोष माझ्यात?”
“नाही रेऽ डोन्ट वरी. असंच बोलले. आपल्यात जसे आहे तसेच चालू दे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने थोडे तरी जवळ आलो आपण. पुढे काय होतंय ते पाहूया-”
खरं म्हणजे तिच्यासाठी काहीही करायला मी तयार होतो. तिने नकार दिला नाही हेच माझ्यासाठी खूप होते. पण मी भलताच आनंदी झालोय हे तिथे लगेच दाखवणे योग्य दिसले नसते, कारण ती आमची पहिली डेट होती. माझ्याबरोबर वावरताना ती नर्व्हस नव्हती त्यामुळे माझ्या आशा उंचावल्या होत्या. नाहीतर हा चाप्टर तिथल्या तिथे बंद झाला असता. जाऊदे, काही का असेना, मनाप्रमाणे गोष्टी घडत होत्या. मी तो दिवस आमच्या दोघांच्याही लक्षात राहील असे काहीतरी करण्याचे ठरवलेलेच होते ते माझ्या ध्यानात आले.
“मला प्रॉमिस कर तू रागावणार नाहीस म्हणून.”
“आता आणि काय?”
“आधी प्रॉमिस.”
“बरं बाबा प्रॉमिस.”
“नक्की?”
“आता काय ते सांगशील की नाही?”
मी तिला खिशात व्यवस्थित घडी करून ठेवलेले दुपारी लिहीलेले पत्र दिले. ते घेऊन काय लिहीलंय ते न पहाताच पटकन तिने पर्समध्ये ठेवले. तिने कमीतकमी त्यावरची डिझाईन तरी पहावी अशी माझी इच्छा होती. त्यावरचे दोन हार्टशेप बनवून त्याला कलर करायला मी कितीतरी वेळ घालवला होता. पण पत्र पर्समध्ये ठेवताना तिच्या हातांची झालेली थरथर माझ्या डोळ्यांतून सुटली नाही. किती विचित्र आहे नाही, मुलगा असो किंवा मुलगी, अशा नाजुक वेळेला वरून कितीही दाखवत नसले तरी दोघेही बावरलेलेच असतात. एकमेकांना दोघांमधील नाते कितीही हवे असले तरी सुरवातीला मनात एक अनामिक भीती असते.
तेच जर दोघांच्यात काहीही बंध नसतील तर एकमेकांविषयी काहीच वाटत नाही. पण दुसर्‍या व्यक्तीबद्दल ओढ, प्रेम, हुरहुर असे काही वाटायला लागले की ते नाते साधे रहात नाही. एक अदृश्य बंध तयार होतो आणि मग पुढची कोणतीही गोष्ट करताना त्याला काय वाटेल किंवा तिला काय वाटेल असा विचार करण्यात जातो. आपल्या एखाद्या गोष्टीने ती रागावणार तर नाही ना? बर्‍याचदा आपले नाते तिला मान्य नसेल तर काय असे विचार मुलांच्या मनात येत रहातात. मुली त्यांच्या प्रपोजलवर ज्यावेळी विचार करत असतात तो काळ मुलांसाठी जीवघेणा असतो. तिचा निर्णय समजणे महत्वाचे असते. अगदी नकार असला तरी काही हरकत नाही, जीव भांड्यात पडतो पण निर्णय समजतो. हे एवढे सगळे विचार डोक्यात चालले होते की आर्या बाजूलाच बसली आहे ते मी विसरूनच गेलो.
“काय विचार करतोयस?” कोल्ड्रिंकच्या स्ट्रॉबरोबर प्लम रेड कलरचे नेलपॉलिश लावलेल्या नाजूक बोटाने चाळा करत ती बोलली.
“नाही, असाच.”
“मग एवढा गप्प का?”
“मी विचार करत होतो.”
“कसला?”
“तुला बर्थडे गिफ्ट द्यायचा.”
“माझा बर्थडे झालाय ना?”
“बिलेटेड बर्थडे गिफ्ट.”
“आणि ते विचारून देतात का?”
मी व्यवस्थित रॅप करून आणलेला एक बॉक्स टेबलवर ठेवला. गिफ्ट पाहिल्यावर तिच्या भुवया वर गेल्या, डोळे मोठे झाले आणि चेहरा लहान मुलीसारखा आनंदी झाला.
“पुन्हा एकदा हॅपी बर्थडे…आर्या!”, तिला शुभेच्छा द्यायला मी माझा हात पुढे केला. तिने माझा हात तसाच घट्ट पकडून ठेवला. मी पकड ढिली केली पण ती माझा हात मुद्दाम सोडत नाही हे माझ्या लक्षात आले. आजुबाजूला लोक असल्याने मलाच अन्कम्फर्टेबल वाटले म्हणून मीच तो ओढून मागे घेतला.
“थँक्यू सो मच.” गिफ्टचा बॉक्स हातात घेऊन तिने सर्व बाजूनी निरखून पहात आत काय असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला पण तिला काही जमेना, “काय आहे?”
“असं थोडीच सांगायचं असतं. तूच चेक कर आणि सांग.”
“बरं घरी गेल्यावर ओपन करेन आणि सांगेन.” म्हणून तिने ते गिफ्टही पर्समध्ये ठेवले.
“आणि मघाशी दिलेलं ते पत्र खूप महत्वाचं आहे. फक्त तुझ्यासाठी व्हॅलेंटाईन डे ला लिहीलंय मी.”
माझ्या बोलण्याकडे तिने मुद्दाम दुर्लक्ष केल्याचे मला समजले. मी हिरमुसला झालो. पण या सार्‍या गोष्टी घडताना मी एक गोष्ट मार्क केली. माझ्याबरोबर कोणत्याही क्षणी ती अन्कम्फर्टेबल नव्हती. सुरवातीला मीच नर्व्हस होतो आणि जसा जसा वेळ गेला तसा नॉर्मल होत गेलो.
दुपारपासून आम्ही भटकत होतो. तिच्याबरोबर वेळ कसा गेला ते समजलेही नाही. संध्याकाळचे सहा वाजत आल्याने निघायला हवे असे ती बोलल्यावर मी भानावर आलो. परत येताना बाईकने मी तिला तिच्या घराजवळ ड्रॉप केले. जाताना तिने केलेल्या बाय बायने दिवसाचे सार्थक झाले. तिचे उत्तर मिळाले नसले तरी दिवस वाया गेला नव्हता. तिच्या भाषेत तर आम्ही अजून जवळ आलो होतो. घरी आल्यावर व्हॅलेंटाईन डे किंवा आम्ही दिवसभर एवढे फिरलो त्याबद्दल तिचा काही मेसेज येईल म्हणून मी वरचेवर मोबाईल चेक करत होतो पण तो आलाच नाही. रात्री बेडवर पडून मनातल्या मनात दिवसभराच्या आठवणींचे कॅसेट रिवाईंड करत होतो. इतक्यात तिचा कॉलच आला. क्षणाचाही विलंब न लावता मी उचलला. ती खूप खुश होती.
“गिफ्टबद्दल खूप खूप थँक्यू समीर. मला खूप आवडले.”
“यू आर ऑलवेज वेलकम.”
“पण तुला का वाटले मला ते आवडेल म्हणून?”
“मुलाने गिफ्ट दिलेले टेडी कोणत्या मुलीला नाही आवडत?”
“हंऽऽ एक सांगू? तुझ्यासारखेच क्युऽट आहे ते.”
“पण मला पत्राचे उत्तर मिळाले नाही अजून.”
“चार लोकांत साधा हात पकडून ठेवला तर लोक अन्कम्फर्टेबल होतात आणि वर पत्राचे उत्तर मागतात. थोडा विरोधाभास आहे नाही? हो ना?”
“अगं तसं नाही…पण…”
“असूदे, तुला तुझ्या पत्राचे उत्तरही लवकरच मिळेल.”
तिच्या लवकराला अंत नव्हता. दुसर्‍यादिवशी मला उत्तर मिळण्याऐवजी भलतीच माहिती मिळाली आणि त्याने मला घाम फुटला. ती माझे प्रपोजल कुणाबरोबर तरी डिस्कस करणार होती. मी तिला हे कुणालाही सांगू नकोस म्हणून सांगितले होते पण का कुणास ठाऊक ती माझे ऐकत नव्हती. पण या सार्‍या गोष्टी घडून गेल्यावर आमचे रिलेशन अपग्रेड झाले होते, ते अशासाठी की आम्ही वॉट्सअॅपवर चॅट करायला सुरवात केली होती.

प्लीज आर्या, नको ना सांगूस कुणाला. माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे यार. तुला समजत कसे नाही?

नाही, मला सांगावेच लागेल.

ऑफिसमध्ये नाहीस ना सांगणार?

नाही.

मग कुणाला?

आईबाबांना.

पण तुझा काय निर्णय आहे?

पहिल्यांदा आईबाबांना ठरवू देत.

प्लीज आर्या, तुझा निर्णय तरी सांग ना.

मला ठीक वाटतोस तू.

फक्त ठीक? अजून जास्त काही नाही?

अजून काय जास्त?

आमच्या मनाचा मुली कधी विचार करतील देव जाणे! सगळे स्पष्टीकरण देऊनच सांगायला हवे!

मग मी माझ्या मित्रांबरोबर पार्टी करू का तुझ्या निर्णयाबद्दल?

थोडे थांब ना.

अजून कशाला थांबू?

आईबाबांना तर डिसाईड करू देत.

ते नाही म्हणाले तर?

तसे होणार नाही. मी त्यांची एकुलती एक लाडाची लेक आहे. माझ्या आनंदाला ते कधीच नाही म्हणणार नाहीत.

मला खरोखर कळत नाही, मुलींचे आईबाबा त्यांच्या मुलींची एवढी काळजी का करतात? त्यांच्या बाहुल्यांची राजकुमार्‍यांसारखी बडदास्त ठेवायला हजारो उमेदवार तयार असतात. ते ही लग्नाच्या आधी! लग्नानंतर काय होते हे सांगायची वेगळी आवश्यकता नाही. स्त्रिया जन्मत:च रिंगमास्टर असतात. तरीही त्यांचे आईबाबा शेरलॉक होम्ससारखे डिटेक्टीव्हज मुलाच्या मागे लावून त्याची फाईल बनवतात. त्याच्यावर संशोधन करून मग एकदाचा बकरा फायनल करतात. पुढे दोघांचे लग्नकार्य मोठ्या धामधुमीत आटोपले जाते. आर्याबद्दल माझ्या घरच्यांना काहीही प्रॉब्लेम नव्हता. घरच्यांची माझ्याकडून एकच अपेक्षा होती आणि ती म्हणजे मी लग्न करावे – मुलीशी. धर्म, जात, वय किंवा रंग काहीही फरक पडणार नव्हता. आणि आर्याबद्दल तर बोलायलाच नको! कुणीही जीव ओवाळून टाकावा अशी ती एकमेवाद्वितीय प्रेयसी होती.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.

About Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s