मी आर्याला प्रपोज करून चार महिने उलटून गेले तरीही तिच्याकडून काही उत्तर मिळाले नव्हते. तिने होकार दिला नसला तरी नकारही दिला नव्हता. म्हणजे तिच्या मनात माझ्याविषयी नक्की काहीतरी होते यात वादच नव्हता. माझ्याशी वागताना मात्र ती एखाद्या गर्लफ्रेंडसारखी वागत होती. कधी भांडत होती तर कधी तासतासभर फोनवर बोलत होती. पण तिच्या निर्णयाबद्दल विचारले की लगेच विषय बदलायची. याबाबतीत मात्र ती खूप पटाईत झाली होती. व्हॅलेंटाईन डे होऊन गेल्यापासून एक गोष्ट नक्की होती, आम्ही खरंच खूप जवळ आलो होतो. रोज रात्री कॉल आणि इतरवेळी वॉटसअॅप चालू असायचे. कधी कधी ती आमच्या कंपनीच्या गेटबाहेर माझी वाट पहात थांबायची. मग बॅनर्जीने सोडल्यावर मी ऑफिसमधून निघायचो, गेटवर तिला भेटायचो, मग बाईकवरून फिरत दोघे मिळून एखाद्या हॉटेलात जाऊन स्नॅक्सच्या निमित्ताने खूप गप्पा मारायचो. शेवटी तिला तिच्या घराजवळ सोडायचो आणि मी माझ्या घरी जायचो, एकूण असे वेळापत्रक झाले होते.
तिच्याबरोबरच्या सततच्या संपर्कामुळे तिच्याशी बोलायला मी बर्यापैकी निर्ढावलो होतो. त्यामुळे तिला पुन्हा एकदा डेटवर विचारून तिच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज घेण्यापेक्षा सरळ हो किंवा नाही ते सांग असे मी विचारायचे ठरवले. ती नाही म्हणाली तर काय करायचे हे माहित नव्हते. पण ती जोपर्यंत हो म्हणत नव्हती तोपर्यंत मला चैन पडणार नव्हते. मनाला उगीच टोचणी लागून राहिली होती.
गर्लफ्रेंडला काही स्पेशल सांगायचे असेल तर मेसेजसारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. काही गोष्टी कॉल करून अथवा समोर असतानाही बोलता येत नाहीत. म्हणजे बोलता येतात पण त्यासाठी अंगी खूप धैर्य असावे लागते. बर्याचदा तसे बोलणे बरोबरही वाटत नाही. अशावेळी मेसेज एखाद्या जिगरी दोस्तासारखा कामी येतो. एखाद्या सुंदर मेसेजच्या शेवटी ‘आय लव्ह यू’ लिहून पाठवणे कॉलमध्ये कसे शक्य होईल? ‘आय लव्ह यू’ चा अर्थ समजूनही समोरून ‘काय?’ अस मेसेजही येतो पण तिचा मूड पाहून मग आपल्याला त्याप्रमाणे वागता येते. मी शेवटची लाईन वाचली नाही किंवा चांगला मेसेज होता म्हणून फॉरवर्ड केला वगैरे वगैरे थापा ठोकता येतात. तसंही तिला मेसेज करणे आता नेहमीचेच झाले होते. पूर्वी मेसेज करताना मी दहावेळा वाचायचो, त्यातून काही भलतासलता अर्थ निघतोय का ते माझ्यातल्या टीकाकाराला विचारायचो आणि मगच पाठवायचो पण आता तसे नव्हते. बिनधास्त मेसेज टाईप केला आणि पाठवला.
उद्या फ्री आहेस?
हो. का? काही विषेश काम?
म्हणशील तर विषेश! नाहीतर नाही.
काम तरी सांग. मग पाहू.
डेटवर येशील माझ्याबरोबर?
गप्प बस.
तू येणार आहेस की दुसर्या कुणाला विचारू?
जी ओळखीची एकुलती एक मुलगी आहे, तिला नीट हँडल करायला शिक आणि मग दुसरीचा विचार कर. आलाय मोठा दुसरीला विचारणारा!
म्हणजे तू माझी गर्लफ्रेंड आहेस. हो ना?
नाही.
मग कोण आहेस?
उद्या किती वाजता?
विषय बदलायला तिचा हात कोणीही धरू शकला नसता. विषेशत: आमच्या रिलेशनबद्दल काही मुद्दा आला की मला तिच्या मनात काय चालले आहे याचा सुगावाही लागू द्यायचा नाही असा तिने विडाच उचलला होता.
चारला.
कुठे?
आपले आवडते ठिकाण, स्टारबक्स. विवियाना.
हे सगळे तू कधी ठरवलेस?
हे काय, आत्ताच. तुला विचारल्यावर.
आणि अचानक का? बहुतेक बॅनर्जी तुला बिझी ठेवायला पुरेशी कामे देत नाही असे वाटते, बिचार्या मुलींच्या मागे डेटवर येणार का म्हणून लागलायस ते!
तू आणि बिचारी?
मग?
हे बघ, तू अजून मला हो म्हणाली नाहीयेस. कधीपासून उगाच चक्क्यासारखं टांगून ठेवलयंस मला. शिवाय अलीकडे तू फार टवका दिसायला लागलीयेस.
चूप बस. काहीही!
तिची अशी स्तूती केली की गोड लाजून लाल व्हायची. ती नक्कीच लाजेने लाल झाली असावी. ते पहायला मी तिच्यासमोर हवा होतो.
खरंच! आणि आत्ताच एक विचार पटकन मनात येऊन गेला, तू दुसर्या कुणाबरोबर पळून जाण्याआधी तुझ्याकडून होकार मिळवायला हवा.
हो का? आणि मी नाही म्हणाले तर?
हॅलो…अजून मी तूला सिरीयसली अप्रुव्ह केलेले नाही. नुसतेच विचारावे म्हणून विचारलेय. आणि यावेळी जर तू नकार दिलास तर मला दुसर्या मुलींसाठी माझे सर्च इंजिन चालू करायला लागेल.
अच्छा! म्हणजे बॅकअप प्लान तयार आहे तुझा.
तुच तर शिकवलेस, अर्जंसीमध्ये नेहमी बॅकअप प्लान तयार असायला पाहिजे म्हणून.
हो? एकदम अर्जंसीवर आलास?
मग? तू हो म्हणतच नाहीस तर काय करू?
बरोबर चारला ये स्टार बक्सला.
येईन पण काहीही झाले तरी उद्या मला उत्तर हवे.
भेटल्यावर बोलू. बाय..बाऽऽय.
म्हणजे उत्तर देणार की नाही ते सुद्धा न सांगता पुन्हा मला लटकवत ठेवले. माझ्याशी तशीच वागत होती ती!
बाय. सी यूऽ
ती भेटायला तयार होईल की नाही शंकाच होती, पण सुदैवाने तयार झाली. प्रत्येकवेळी भेटल्यावर तिला छोट्यातले छोटे का असेना काहीतरी गिफ्ट द्यावे असे वाटायचेे. अगदीच काही सुचले नाही तर कॅडबरी घेऊन तिला घरी सोडताना द्यायचो. तिला चॉकलेट्स खूप आवडायची हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते.
माझी आणखी एक जूनी सवय आहे, मला ज्या गोष्टी खूप मनापासून आवडतात त्यातले काहीतरी मी दुसर्यांना देण्याचा प्रयत्न करतो. कुणी कोणते पुस्तक चांगले आहे म्हणून विचारले की मी माझ्याकडे असलेले पु. लं किंवा जेफ्री आर्चरचे एखादे पुस्तक त्याला देतो आणि त्याला वाचायला सांगतो. का कोण जाणे, त्याला आनंद मिळाला की मला समाधान मिळते. पिक्चरच्या बाबतीत चार्ली चॅप्लिन माझा देव आहे. त्याचे जवळजवळ सगळे पिक्चर्स मी असंख्यवेळा पाहिले आहेत. शिवाय कोणताही पिक्चर कधीही पहाता यावा म्हणून मी त्याचे संपूर्ण कलेक्शनच केले होते.
यावेळी गिफ्टसाठी एकदम काहीतरी वेगळे म्हणून मी तिला चार्लीचे दोन पिक्चर द्यायचे ठरवले. खरं म्हणजे आदल्या दिवशीपासून माझी तब्ब्येत ठीक नव्हती. अचानक व्हायरल फिव्हर आला होता. त्याचे कारण ते फिव्हर आणणारे व्हायरस आणि आमचे डॉक्टर यांच्याशिवाय कुणालाही माहित नसेल! तरीही डॉक्टरकडे जाऊन मी किरकोळ औषधे घेऊन आलो होतो. मी दोन दिवसांत ठीक होईन, असे ते बोलले होते.
शनिवारी ऑफिस सुटल्यावर चार्लीच्या सीडी शोधायला ठाण्यात जायचे ठरवले. बॅनर्जी वेळेवर घरी निघाल्याने मी निघताना काही अडचण आली नाही. मला चार्लीच्या ‘सर्कस’ आणि ‘सिटीलाईट्स’ या दोन पिक्चरच्या सीडी हव्या होत्या. कितीतरीवेळा हे पिक्चर्स पाहूनही माझी त्यातली गोडी कमी झालेली नाही. खरं म्हणजे चार्ली जगाला हसवण्याचे काम करतो. या पिक्चर्समध्येही तसेच आहे पण त्याचे तिच्या प्रेयसीवरचे प्रेम पहायचे असेल हे दोन पिक्चर्स अगदी मस्ट पहायला हवेत असे आहेत. हसता हसता आपण त्या कथेत एवढे गुंतत जातो की शेवटी चार्लीच्या ठिकाणी आपण स्वत:ला पहायला लागतो.
मी बाईकवरून ठाण्याला गेलो आणि चार्लीच्या सीडींचा शोध सुरु केला. एका पाठोपाठ एक अशी तीन म्युझिक सेंटर्स झाली पण त्यांच्याकडे हे दोनच पिक्चर्स नव्हते. बाकीचे सगळे कलेक्शन होते. मला चार्लीचे सगळे पिक्चर्स आवडत असले तरी याक्षणाला मला त्या दोन सोडून दुसर्या कोणत्याही पिक्चरमध्ये इंटरेस्ट नव्हता. मला कोणत्या मुव्हीज हव्या आहेत यावर मी क्लीअर होतो आणि मला त्याच हव्या होत्या. त्यावर कोणतीही तडजोड मला चालणार नव्हती.
मी तिथून आणखी एका म्युझिक सेंटरच्या शोधात निघालो. अचानक पाऊसही सुरु झाला. एकतर सगळीकडे चिटचिट आणि सगळ्यांना आपणच लवकर जायची घाई त्यामुळे रस्त्यावरचे ट्राफिक वाढले. बाईक चालवत असताना पाऊस पडलेला मला अजिबात आवडत नाही. मला पाऊस आवडत नाही असे नाही, घरी असताना पडत असेल तर खूप आवडतो. मला पावसात भिजायलाही आवडते पण मोबाईल खिशात नसेल तर! पाऊस पडला की खिडकीत बसून त्या टपोर्या थेंबांचा टप टप असा होणारा आवाज ऐकायला मला फार आवडायचे. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध तर माझ्या मनाला आजही वेडे करून टाकतो.
ठाण्यात एकूण चार म्युझिक सेंटर्स धुंडाळली पण माझ्या नशीबात मला हव्या असलेल्या त्या चार्लीच्या सीडीज नव्हत्या. शेवटी कोरम मॉलला गेलो आणि खूप प्रयासाने त्या सीडीज शोधून काढल्या. त्या व्यवस्थित पॅक करून घेऊन त्यावर गुलाबी रंगाचे एक स्टीकर लावले आणि बाजूलाच असणारा मार्कर घेऊन त्यावर लिहीले –
बार्बी, आयुष्य जगण्याचा सल नाहीये…तो तुझ्याशिवाय जगण्याचा आहे…देशील मला साथ…आयुष्याच्या शेवटपर्यंत?
-तुझाच, समीर.
मी तिला अलिकडे बार्बी म्हणायचो. ती खरोखर बार्बीच होती त्यामुळे तिला बार्बी म्हणण्यात काहीही गैर नव्हते. पण तिने मला शोना म्हणायला कधीपासून सुरवात केली आहे ते मलाही कळले नाही. मला दुसरे लोक एकमेकांना अशा नावाने बोलायचे त्यावेळी खूप अप्रूप वाटायचं पण आपल्याही बाबतीत असे काही घडेल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते.
या सीडींच्या नादात चिंब भिजून घरी पोहोचलायला रात्र झाली. जेवणानंतर डॉक्टरने दिलेल्या रंगीबेरंगी गोळ्या घेतल्या आणि बेडवर पडल्या पडल्या केव्हा झोप लागली ते समजलेही नाही.
क्रमश:
©विजय माने, ठाणे.