कॅन वी बी जस्ट फ्रेंड्स?
असे वाटते का तुला या क्षणाला शक्य आहे ते?
हो
ठीकाय मग. तुला जसे वाटेल तसे
आय डोन्ट थिंक तुला पटेल की नाही पण माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि माझे तुझ्याबद्दलचे हे प्रेम आयुष्यभर तसेच राहील
हंऽऽ
म्हणशील तर कालचा प्रसंग खूपच क्षुल्लक होता, पण काचेपलिकडे बाहेर मम्मा येणार म्हणून नजर लावून बसलेले माझे पिल्लू पाहिले आणि माझा जीव गलबलून गेला. माझी मलाच लाज वाटली. एकच विचार येऊन गेला डोक्यात किती स्वार्थी आहे मी, काय करतीये स्वत:च्या सुखासाठी
हो. मी समजू शकतो. मला पटतंय तुझं. इन फॅक्ट तुझ्या मनात काय चाललेय ते समजत होते, तू सकाळी बोलत होतीस तेव्हा. मी विचारणारही होतो तुला
काय?
तू पुढे जायला कंम्फर्टेबल नाहीस का म्हणून
तुझे वेगळे आहे यार. तुला सारे आयुष्य पडलेय तुझ्यासमोर. माझं तसं नाहीये. अमू मोठा असता तर भाग वेगळा होता. आणखी खूप छोट्या छोट्या गोष्टी झाल्या आहेत. मला सतत बोचणी लागून राहिलीय की मी माझ्या आई आणि मुलगी या नात्याच्या जबाबदार्या नीटपणे निभावत नाहीयेे
इतरवेळी चिंतेने बोलायचीस त्यावेळी मी तुला काळजी करु नकोस म्हणून सांगायचो. पण अमूबद्दल बोललीस त्यावेळी काही बोललो का? मला समजले ते. त्याची काही चूक नसताना त्याला का शिक्षा द्यायची आपण?
आय होप तू मला समजून घेशील शोना
हो आदिती!
मला आता टाईप करणेही मुश्किल होतेय. नंतर बोलते मी
तिला तसे का होतेय ते रितेशला समजले. तिला ओळखत असल्यापासून आदिती या नावाने त्याने हाक मारली नव्हती. नेहमी शोना, बार्बी, माय लेडी, आदि असा बोलायचा पण तिचा प्रॉब्लेम ऐकल्यावर तिला दोघांच्या नात्याची अजून ओढ लावण्यात काही अर्थ नव्हता.
मला घरी सर्वजण आदि म्हणतात. आदि तरी म्हण तू
ओके
त्याने तिला ‘आदि’ म्हणून तसे ऐकण्याचे समाधानही मिळू दिले नाही.
तुला आठवतंय मी म्हणाले होते, मला हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात कधीही मिळत नाहीत. सगळे चांगले चालू असते आणि अचानक हातातून सगळे निघून जाते. म्हणून मी कशात जीव अडकवत नाही. विकास गेला आणि तो धक्का पचवता पचवता साडेतीन वर्षे उलटली. त्यानंतर तू आयुष्यात आल्यापासून खरोखर खुश झालेले मी. पण देवाला ते ही पहावले नाही
हंऽऽ
काय करतोयस तू?
मिटींगमध्ये आहे
खूप वेळ लागेल का तुला?
हो
रितेशच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. कधीना ना कधी असे होईल ही त्याला कुणकुण होतीच. रितेशला तसे पाहून बाजूला बसलेली त्याची असिस्टंट उठून मागे गेली आणि तिच्या मैत्रिणीच्या कानात कुजबूजली, “अगं रडताहेत सर!”
रितेशला ऑफिसच्या जागेवर बसून डोळे पाणावणे खूप ऑकवर्ड वाटले. त्यासाठी त्याला एक व्हिडीओ खूप इमोशनल आहे असा बहाणा करावा लागला. पुन्हा आदितीचा मेसेज आला
खूप मिस करतीये तुला. मला महित आहे मी थोडी विचित्र वागतेय पण इतक्या लवकर या सार्यातून बाहेर नाही पडू शकणार!
आदि, एक विचारू तुला? खरे सांगशील?
हो विचार ना. परवानगी काय मागतोयस?
माझे काही चूकले का किंवा नकळतपणे मी तुला हर्ट केलेय का?
नाही रे माझेच चुकले सारे. मला माझी सिच्यूएशन माहित होती. तरीही मी तूला माझ्यात गुंतणे भाग पाडले. या सर्वाची मीच सुरवात केली. वेळोवेळी मला ते जाणवत होते. त्यात वेळ कमी आणि जबाबदार्या खूप असल्याने मी आपल्यातल्या नात्याला न्याय नाही देऊ शकणार. या क्षणाला मी खूप गोंधळलीये. आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. हे सारे माझ्यामुळे झालेय याची जाणीव आहे मला
ठीकाय यार. तू उगाच स्वत:ला दोष देत बसू नकोस. स्वत:ला सांभाळ आधी!
पण आपण भेटू शकतो, बोलू शकतो. पण मला माझ्या इमोशन्स कंट्रोल करायच्या आहेत, जे तू भेटल्यापासून जमत नाहीये
तू माझी काळजी करू नकोस. आपून जिधरभी जाता है उधर हॅपीनेस फैलाता है
म्हणजे तुला काहीच फरक नाही पडत ना?
तसे समज हवे तर! आजकाल माझा विदुषक झालाय. लोकांना माझी दुसरी बाजू दिसत नाही
लेखक महाशय माझ्याशी जरा नीट बोलाल का?
हसरं दु:ख म्हणतात याला सामान्य भाषेत
माहिताय मला
मग रितेशने तिला यू ट्यूबवरून चार्ली चॅप्लिनच्या ‘सिटी लाईट्स’ या पिक्चरच्या शेवटाची क्लिपची लिंक पाठवून तीन मिनीटे वेळ काढून नक्की बघ म्हणून सांगितले. थोड्यावेळानंतर तिचा मेसेज आला.
शिट यार! हे सर्व माझ्यामुळे होतेय. मी जिथे जिथे जाते तिथल्या सगळ्या लोकांना त्रास होतो. मीच असायला नको आहे हे सगळं थांबवायला
रितेश आदल्या दिवशीच्या गोष्टी आठवू लागला. तो कालच तिला भेटून आलेला. दोघांचाही वेळ वाचावा म्हणून ते लोणावळ्याला भेटलेले. सारा दिवस एकमेकांसोबत घालवलेला. खूप गप्पा मारलेल्या. पण पुण्याला पोहोचायला आदितीला खूपच उशिर झाला. अमूच्या डे केअरमधून तिच्या मोबाईलवर दोनदा फोन येऊन गेले पण ट्राफिकमध्ये असल्याने ती काहीही करु शकत नव्हती. तिथे पोहोचायला तिला रात्रीचे आठ वाजले. एरव्ही डे केअरचे टायमिंग सातचे होते. रोज ऑफिस सुटले की घरी जाताना ती अमूला पिक करायची. पण त्यादिवशी बराच उशिर झाल्याने अमूही काकुळतीला येऊन काचेच्या दरवाजातून बाहेर नजर लावून तिची वाट पहात उभा होता. ती गोष्ट आदिला खूप खोलवर हर्ट करून गेलेली.
रितेश आणि आदितीची ही साधारण चौथी पाचवी भेट असावी. दिवसरात्र बोलत होते, वॉट्सअॅपवर एवढे चॅट करत होते पण दोघांच्या नात्यात कधी वासना दिसली नाही. तिचा हात हातात घेण्यापलिकडे रितेशचे धाडस झाले नाही. त्यादिवशी मात्र त्याने ते धाडस केले आणि “तुझ्या हातात हात दिल्यावर किती सेफ आणि कम्फर्टिंग वाटतं!” असे ती बोललेली आणि रितेश तिच्या विश्वासावर फिदा झालेला. त्याच्यासाठी ती म्हणजे एक नाजूक बाहुलीच होती. शेवटी न राहवून तिने रितेशला विचारले, “तू कधी पुढाकार घेणार आहेस की नाही? सगळ्याच गोष्टी मी करणार नाही. काही गोष्टी तुलाच कराव्या लागतील.”
रितेशने वेळेचा काटा सहा महिने भूतकाळात फिरवला. लिखाणाची पहिल्यापासून आवड असलेला रितेश ठाकूर एमबीए झाला खरा, पण एका मल्टिनॅशनल कंपनीत मार्केटिंगमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळून आयुष्य कमालीचे व्यस्त झाले तरीही त्याने लिहीणे सोडले नाही. फिरण्याची खूप आवड असल्याने हा जॉब त्याला फार आवडायचा. तो नेहमी म्हणायचा एकतर नोकरीमुळे जग फिरायला मिळते, अनेक प्रकारच्या लोकांना भेटता येते आणि आपले अनुभवविश्व विस्तारता येते. आजूबाजूला घडत असलेल्या आणि मनावर कोरल्या जाणार्या गोष्टी त्याला गप्प बसू देत नसत. त्यातूनच त्याने ब्लॉग लिहीणे सुरु केले. संध्याकाळी घरी गेला की त्याचे लिखाण सुरु असायचे. तो अगदी एखाद्या ठिकाणचे खाण्याचे हॉटेल ते अगदी प्रवासात भेटलेला एखादा लक्षात रहाण्यासारखा माणूस सारे काही लिहून काढायचा.
ओघवती शैली असल्याने त्याने लिहीलेले वाचतच रहावे असे वाटायचे. ब्लॉगचे फॉलोअर्स वाढत गेले. त्यात त्याने स्वत:च्या रायटिंग स्किलला चॅलेंज म्हणून ‘रेशीमगाठी’ ही रोमँटिक कादंबरी लिहायचा निश्चय केला. साधारण आठवड्याला तो एक भाग लिहून अपलोड करत असे. लोकांना त्याची ती कादंबरी खूप आवडू लागली. प्रत्येक भागाखालच्या लोकांच्या – विषेशत: मुलींच्या कॉमेंट्स वाढल्या पण धिस वुईल बी पार्ट ऑफ द प्रोफेशन याची जाणीव रितेशला होती. म्हणून तो सर्वांच्या कॉमेंट्सना लेखकाच्या चष्म्यातूनच रिप्लाय करायचा.
गेल्या काही महिन्यात रितेशच्या लक्षात एक गोष्ट आली आणि ती म्हणजे त्याच्या ब्लॉग फॉलोअर्समधली आदिती त्याचा एकूणएक ब्लॉग वाचते आहे, आणि नुसता वाचतच नाही तर त्यावर कॉमेंट्सदेखील लिहीते आहे. त्यानंतर एकदिवशी फेसबुकवर तिचीच फ्रेंड रिक्वेस्ट आली. फेसबुकवर आणि ब्लॉग लिहीत असल्यापासून बर्याच लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट्स यायच्या आणि तो स्वीकारायचा तशीच त्याने तिचीही स्वीकारली. मग ‘रेशीमगाठी’चा नवा भाग लिहीला की आदितीचे मेसेजेस येऊ लागले. तेही त्याला सुखावून जायचे. एवढ्या बारकाईने वाचून आवर्जून सांगणारे वाचक कोणत्या लेखकाला आवडणार नाहीत?
एकदिवशी रितेशने आदितीचा प्रोफाईल उघडून पाहिला. पुण्यात रहाणारी आदिती मॅरिड तर होतीच शिवाय त्याच्यापेक्षा वयाने चार वर्षांनी मोठी आणि एका कंपनीत पर्चेस मॅनेजर. पण इतर फॉलोअर्सना सोडून त्याच्या =दयात आदितीच्या बाबतीत नेमके काय घडत होते ते त्यालाही समजत नव्हते. गेले काही दिवस ती त्याच्यासाठी स्पेेशल बनली होती. ब्लॉगवर तिचे कॉमेंट्स आल्याशिवाय रितेशला चैन पडायचे नाही. तिने लिहीलेली अक्षरे पुन्हा पुन्हा वाचावी असे त्याला वाटायचे. त्याने त्याच्या ‘रेशीमगाठी’चा एक रोमँटिक पार्ट अपलोड केल्यावर आदितीचा मेसेज आलेला – तुमचा आजचा पार्ट वाचला खूप भारी आणि टू हॉट टू हँडल होता! शिवाय ती ऑनलाईनही दिसत होती. म्हणून त्याने रिप्लाय टाकला-
हा हा
एवढे डिटेल वर्णन कसे लिहीलेय?
इमॅजिनेशन
लग्न न होतादेखील चांगले आहे की तुमचे इमॅजीनेशन! पण आवडले बरं का खरोखर
थँक्यू सो मच
तुमचे ऑफिस, लिखाण, प्रवास हे सारे कसे मॅनेज करता?
आवड असेल तर काही अडचणी येत नाहीत आपोआप होते सारे
मला शिकवाल का टाईम मॅनेजमेंट?
का नाही? आणि तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठ्या आहात. मलाच तुमच्याकडून बर्याच गोष्टी शिकायच्या आहेत
इट वूड बी माय प्लेझर इफ आय कॅन बी ऑफ एनी यूज टू यू!
काही दिवसांनी काही हरकत नसेल तर तुमचा नंबर मिळेल का असा तिचा मेसेज आला. एरव्ही बर्याच लोकांचे नंबरसाठी मेसेज यायचे पण तो कुणाला नंबर द्यायचा नाही, त्याची जी काही शंका आहे ती मेसेजवरच सोडवायचा. पण आदितीची केस वेगळी होती. त्याने तिला नंबर दिला आणि मग मेसेंजरवर न बोलता दोघे वॉट्सअॅपवर बोलू लागले. तरी चॅटिंग तितकेसे रेग्युलर नव्हते. कधी दिवाळी दसर्याला शुभेच्छा देताना हा वॉट्सअॅप नंबर कामी यायचा.
क्रमश:
©विजय माने, ठाणे.