बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. कार लोणावळ्याच्या घाटातून चालली होती. पावसाळ्यात हिरवागार झालेला घाट मनाला गारवा देत होता. मध्येच कोसळणारे धबधबे अचानक नजरेस पडत होते. सारी झाडे आणि वेली हिरवे, पोपटी पोषाख घालून पावसात भिजत होते. डोंगरांवर तर हिरवा गालिचा अंथरल्यासारखे वाटत होते. मुंबईच्या गर्दीला मागे टाकून पावसाळ्यात निसर्गाच्या एवढया जवळ आलो होतो. मनात बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे-’चे कॅसेट सरू झाले. शाळेत असताना ही कविता मला खूप आवडायची. मन क्षणात असे पाठीमागे गेले. नॉस्टॅलजियाही किती हवाहवासा वाटतो!
इतक्यात कार ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि खळ्कन मनातल्या विचारांची साखळी तुटली. रम्य भूतकाळातून वास्तवात आलो. त्याची जाणीव पुन्हा एका हार्नच्या कर्कश आवाजाने करून दिली. मग मात्र ड्रायव्हरचा राग आला आणि मी समोर पाहिले. ड्रायव्हरलाही चीड येणे साहजिक होते कारण त्याला गाडी पुढे काढता येत नव्हती.
आमच्या पुढे एक टेंपो चालला होता. ड्रायव्हर त्याच्या उजव्या बाजूने गाडी पुढे घ्यायचा प्रयत्न करत होता पण टेंपो बिलकुल साईड द्यायला तयार नव्हता. कार उजव्या बाजूला घेतली की टेंपोही उजव्या बाजूला सरकायचा. डाव्या बाजूने जायचा प्रश्नच नव्हता. खाली शेकडो फुट खोल दरी होती. काही केल्या पुढे जायला रस्ता मिळत नव्हता. या डोके उठवणार्या हॉर्नच्या आवाजाने माझी सहनशीलता संपली आणि त्या कसेही वाहन चालवणार्या उद्धट टेंपो ड्रायव्हरला काहीतरी सुनवावे म्हणून काच खाली घेऊन मी खिडकीशी तोंड आणले. तेवढयात कार पुढे घुसली आणि माझी खिडकी टेंपो ड्रायव्हरच्या खिडकीजवळ आली. त्या ड्रायव्हरला “साले, अकल नही है क्या? ऐसे गाडी चलाता है!” एवढे तरी बोलावे म्हणून मनातल्या मनात तयारी केली आणि डाव्या बाजूला नजर टाकली. हैराणच झालो! समोर काय पहातोय याच्यावर विश्वासच बसेना.
एक पंचविशीतली मुलगी टेंपो चालवत होती. दिसायला सुंदर होती. अंगात ग्रे कलरचा साधारण सकाळ सकाळी जॉगिंगला घालतात तसा राऊंड नेकचा टीशर्ट होता. श्रीमंत घराण्यातली असावी. चेहर्यावरच्या एकूण आटिट्यूडवरून तरी तसे वाटत होते. तिच्या बाजूलाच अजून एक मुलगी जीव मुठीत धरून बसली होती.
कार ड्रायव्हरने अॅक्सिलेटरवर पाय ठेवला आणि झटक्यात टेंपो मागे पडला. टेंपो ड्रायव्हरच्या सीटवर मुलगी पाहिल्यावर मी आणि माझा कार ड्रायव्हर दोघेही गार झालो. मग तिला शिव्या कसल्या देतोय! कारच्या आरशात मागून टेंपो येत असलेलं दिसत होतं. तो आमच्या मागूनच येत राहिला. अगदी ओव्हरटेक करायचा चान्स असूनही तो पुढे गेला नाही. थोडया वेळात हॉटेल आले. आमची कार डाव्या बाजूला वळली. शिट्टी वाजवत पार्किंगचा वॉचमन धावत आला. मोकळया जागेत कार पार्क झाली आणि मागोमागच टेंपो पार्किंगमध्ये शिरला.
कारमधून उतरलो एवढयात बाजूच्या टेंपोचा दरवाजा उघडला. हातात चावी घेऊन ती मुलगी खाली उतरली. भिजलेला टीशर्ट घालून सोबत त्या घाबरलेल्या मुलीला घेऊन ही ललना टेंपो चालवत कुठे चालली होती, काही कळायला मार्ग नव्हता. दरवाजा बंद करून ती आमच्या दिशेने आली आणि काहीही कारण नसताना मला आणि ड्रायव्हरला लूक देत ती म्हणाली, “हिने पाणी अंगावर सांडले म्हणून पुढे गेलात. नाहीतर असे नसते जाऊ दिले.”
एवढी बोल्ड आणि मवालीपणा करणारी मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आम्ही दोघेही गप्प बसलो. तिच्याकडे निरखून बघितले. टीशर्ट ओला झाला होता. कमरेखाली टाईट जीन्स होती. डाव्या मनगटात घडयाळ होते. नखांनाही रंगरंगोटी केली होती. म्हणजे मुलगी एकदम मॉड होती. आजुबाजूंच्याची जराही दखल न घेता आमच्या समोरच तिने आपल्या केसांतून हात फिरवून घेतले. त्यांना पकडून ठेवणारा रबर बॅन्ड नीट केला आणि घाबरलेल्या मैत्रीणीला घेऊन ती हॉटेलमध्ये गेली.
मी विचारात पडलो. या मुलीच्या बाबतीत काहीतरी वेगळे होते. त्या तंद्रीतच मिसळीची ऑर्डर दिली. लगेच आली. जिभेवरची चव बाजूला ठेऊन ती खायला सुरवात केली. टेंपोवाल्या मुलीचा विचार डोक्यातून जात नव्हता. कोण असावी ही? आणि श्रीमंत आहे तर टेंपो का चालवते आहे? कार का नाही? या सगळया विचारात माझ्या समोरच्याच टेबलावर ती बसली आहे हे माझ्या लक्षातही आले नव्हते. ड्रायव्हरने मला खुणावल्यावर मी तिला पाहिले आणि नंतर अधूनमधून माझे लक्ष तिच्याकडे जायला लागले.
तिचे जेवण संपले असावे. हल्लीच्या मुली खातातच कुठे? एखादे कुरकुरे किंवा वेफर्सचे पाकिट मिळाले तरी त्यावर दिवस काढतील. त्यात भर म्हणून डायटिंगचे फॅड निघालेच आहे. फिगर आणि वजनाबाबत त्या जाम कॉन्शस असतात. वजन हा तर त्यांचा हक्काचा प्रांत आहे. ते कमी कसे करावे हे सांगणार्या पुस्तकांच्या हजारो प्रती वर्षाला खपतात. ग्राहक पंच्यान्नव टक्के स्त्रीवर्ग. उरलेले पाच टक्के पुरुष! ते सगळीकडे स्लीम ट्रीम इ. इ. पाहून आपल्या बायकोसाठी पुस्तक भेट म्हणून घेऊन जातात. दीडदोनशे रुपयात काही फरक पडतोय का हे पहायचा अजून एक व्यर्थ प्रयत्न!
ती उठून गेली आणि पुढच्या मिसळीची चव लागली. मुर्खाने खूप तिखट बनवली होती. पूर्ण तोंड भाजून निघाले. मग चहा झाला. आता तासाभराचाच प्रवास राहिला या आनंदात हॉटेलातून बाहेर पडलो. समोरच ती उभी होती. तशीच भिजलेली. पाऊस मात्र थांबला होता. काय व्हायचं आहे ते होऊ दे, तिच्याशी बोलायचंच असा विचार करून मी तिच्याजवळ गेलो.
“एक विचारू?”
“मला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहात ते. मी टेंपो कसा काय चालवते हेच ना?”
“हो. तुम्हांला कसं माहित मी हेच विचारणार आहे?”
“सगळया गोष्टी तोंडानेच स्पष्ट बोलाव्यात असे थोडीच आहे? समजतं ते!”
“हंऽ बरोबर आहे तुमचे. मी टेंपो चालवताना कुठल्याही मुलीला पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच तुम्हांला पाहिले.”
“गेला महिनाभर चालवते आहे. सगळयांच्या नजरेत हाच प्रश्न दिसतो पण भीत भीत का होईना स्पष्ट विचारणारे पहिले तुम्हीच.”
“पण टेंपोच का?”
“त्याची खूप मोठी स्टोरी आहे. इतक्यात नाही सांगून व्हायची.”
“मला ऐकायला आवडेल. ऑफकोर्स… इफ यू डोंट माइंड.”
मी खिशातून माझे व्हिजीटींग कार्ड काढले आणि तिला दिले. तिने ते घेऊन त्यावरचे नावही न बघता जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊन दिले. कार्ड घेताना ते अदबीने घ्यावे, समोरचा माणूस- ज्याने कार्ड दिले आहे, तो असेपर्यत तरी ते व्यवस्थित हाताळावे या कार्पोरेट एटीकेट्स बहुधा तिला माहित नसाव्यात.
तिला बाऽय करून मी कारमध्ये बसलो. कार बरीच पुढे निघून आली तरी मागे टेंपो दिसला नाही. आरशात दिसत नाही म्हणून मागे वळून काचेतून पाहिले तरी त्याचा पत्ता नव्हता. उगाच अस्वस्थ व्हायला लागलं म्हणून तो नाद सोडून दिला आणि खिडकीतून बाहेर नजर लावली.
पुण्यात पोहोचलो. माझे वेंडर व्हिजिटचे एक छोटेसे काम होते, ते झाले. दुसर्यादिवशी एक मिटींग होती. एक तासाचीच. त्यासाठी हॉटेलवर रहायला लागले. मुंबईला जाऊन परत दुसर्यादिवशी पुण्याला येणं अवघड नव्हतं. पण उगाच धावपळ आणि त्रास नको म्हणून तो बेत रद्द केला. गुपचूप हॉटेलवर जाऊन टीव्ही ऑन केला. चॅनलना तोटा नव्हता. संध्याकाळी त्या मुलीचा फोन येईल असे वाटत होते, पण आला नाही.
दुसर्या दिवशीची मिटींग संपली. मी मुंबईला परत आलो. रोजच्या ऑफिसच्या कामाला लागलो. त्या मुलीचा विचार मात्र डोक्यातून जात नव्हता. दोनचार दिवस फोन येईल असे वाटले होते पण आलाच नाही. त्यावर जवळजवळ महिना लोटला. प्रवासातला तो ठळक प्रसंग डोक्यातून काहीसा पुसट झाला.
…आणि अचानक एकदिवशी ऑफिसमध्ये माझ्या नावाचे कुरियर आले. घाईघाईने पाकिट उघडले, पत्राला मायना वगैरे काहीच नव्हता. लिहीणारा स्ट्रेट फॉरवर्ड असावा. डायरेक्ट मुद्दा! मी हादरलोच.
नमस्कार…मी तुम्हांला भेटलेली टेंपोवाली.
मी मॅरिड आहे. कौस्तुभ माझा नवरा. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. मुंबईत स्वत:चे घर आहे. तो ब्राम्हण आणि मी मराठा. लग्नाला त्याच्या घरातून विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केले. आता इथे दोघेच रहातो. दोन महिन्यापूर्वी ऑफिसला जाताना त्याच्या बाईकचा अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला, त्यावर प्लास्टर चढले आणि डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.
मी बीकॉम आहे. नोकरी करायची खूप हौस होती. पण नोकरीचा विषय काढला की कौस्तुभ काही गरज नाही, नोकरी आणि बॉसला सांभाळण्यापेक्षा माझ्याकडे लक्ष दे असं म्हणायचा. म्हणून नाईलाजाने मी नोकरी शोधणं बंद केले.
घराचा महिन्याचा इएमआय आणि चांगली लाईफस्टाईल यासाठी पैसे तर हवे होते. इलाज नव्हता म्हणून सुट्टी घेऊन तो घरी बसलेला. पगारी रजा होती पण मलाही काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. जीव गुदमरु लागला. महिनाभर त्याच्याकडे खूप लक्ष दिलं पण फक्त तेवढयावर मन स्वस्थ बसू देईना. मला करता येण्यासारखे एक आवडीचे काम होते. बराच विचार केला, मनात काहीतरी निर्णय घेतला आणि शेजारच्या बिल्डींगमधल्या ओळखीच्या काकांना जाऊन भेटले. त्यांचा ट्रान्सपोर्ट बिझनेस होता.
त्यांनी विश्वास दाखवला आणि टेंपोची चावी मिळाली. रोज मुंबई- पुणे- मुंबई आहे. सकाळीसकाळी घरचं आवरून बाहेर पडते. पैसा मिळवणे हा पहिला मुद्दा. हो, उगाच खोटं का बोला? आणि थ्रील अनुभवायचे दुसरा. माहेरी असताना गाडया चालवायची फार आवड होती. घरी स्वत:चा टेंपो आणि ट्रॅक्टर होते. बाबांच्या नकळत मी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विश्रांती देऊन ट्रॅक्टरदेखील चालवायचे. तशी अभ्यासात मी सोऽ सोऽ च होते. पास होण्यापुरता अभ्यास करायचे. पण इतर गोष्टी आणि खेळात नेहमी पुढे असायचे. या महिन्याभरात मला एक गोष्ट जाणवली, मी टेंपो चालवताना दिसल्यावर बर्याचजणांच्या भुवया उंचावतात. असे का? बाईची जात म्हणून त्यांनी आपल्या कक्षेच्या बाहेर कधी जायचेच नाही? आम्हांला आमची स्वत:ची अशी आयडेंटी बनवता येत नाही का? सगळयाच ठिकाणी नुसते पुरुषच का? माझीही कमाल आहे! हे सगळे मी तुम्हांला- एका पुरुषालाच सांगते आहे. याचे उत्तर कदाचित तुमच्याकडेही नसेल.
आता कौस्तुभ ठणठणीत झाला आहे. म्हणजे माझं टेंपो चालवणं बंद होणार! तो काही केल्या ऐकणार नाही. परवाच झालं एवढं बस झालं म्हणाला. कुणालातरी सांगावसं वाटलं म्हणून पत्र लिहीलं. स्वत:च्या एजग्रुपच्या किंवा आपल्याला समजून घेऊ शकतील अशा मैत्रीणीच नाहीत. बिल्डींगमध्ये माझ्या वयाच्या काहीजणी आहेत पण व्हेवलेंथ जुळण्यासारख्या नाहीत. असो! खूप बोलले. काय करणार? स्वभावाला औषध नाही. तुम्ही फोनची वाट पाहिली असेल पण एकाच भेटीनंतर फोन करणे मला प्रशस्त वाटले नाही. तुम्ही एवढया आपुलकीने विचारले होते म्हणून हा सगळा लिहीण्याचा खटाटोप केला. गैरसमज नसावा.
खरोखर ही मुलगी म्हणजे बाप होती. एका झटक्यात जमिनीवर आणले! पत्रावर आणि पाकिटावर कुठेही नंबर, नाव किंवा पत्ता नव्हता. कुरियरवालाही ते पाठवणारा आणि घेणारा यांचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड असल्याशिवाय पाकिट घेत नाही. तोदेखील तिच्या ओळखीचा असावा.
मी ते असामान्य पत्र नीट घडी करून बॅगेत ठेवले आणि मनातल्या मनात तिच्या बिनधास्तपणाचे कौतूक करत पुढच्या कामाला लागलो.
…
©विजय माने, ठाणे.