विधिलिखित 

2

मला आर्याच्या घरचा लॅन्डलाईन नंबर माहित नव्हता. तो माहित असण्याची कधी गरजच पडली नव्हती. आम्ही दोघे नेहमीच मोबाईलवर बोलायचो. मी तिला एकदा लॅन्डलाईन नंबर विचारला होता पण तिने सांगितलेल्या माहितीवरून मी पुन्हा विचारण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. हॉलमध्ये जिथे लॅन्डलाईन फोन ठेवलेला असायचा तिथेच अंकल नेहमी बसलेले असायचे. बसण्यासाठी हॉल ही त्यांची आवडती जागा होती. आर्याची आई खूप प्रेमळ असली तरीही अंकलची नको ती रिस्क घ्यायच्या भानगडीत मी पुन्हा पडलोच नाही.

इन्स्पेक्टर वागळेंच्या कॉलनंतर लगेचच तसल्या रात्री मी बाईक काढून तिच्या घरी निघालो. याआधी दोन तीनवेळा तिच्या घरी गेलो असल्यामुळे पत्ता शोधण्यासाठी मला खूप त्रास घ्यावा लागला नाही. अर्थातच बंगल्याचे मेन गेट बंद होते. बाईक पार्क करून मी गेटजवळ आलो आणि आर्याच्या नावाने खूप हाका मारल्या पण आत काहीही हालचाल झाली नाही की कुठली लाईट लागल्याचेही दिसले नाही. एकतर त्या धक्क्यात तिचे नाव उच्चारणेही मला जड जात होते. खूप सारे हुंदके गळ्याशी येऊन थांबले होते. डोळ्यांतून एवढे पाणी वाहून गेले होते की ते जवळजवळ आटून गेले होते. तरीही मी हाका मारणे चालूच ठेवले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी झोपेतून कोण उठत नाही म्हणून मी गेटवरून चढून आत जाण्याच्या विचारात होतो तेवढ्यात हॉलमधली लाईट लागल्याचे दिसले. हॉलचा दरवाजा उघडून अंकल गेटकडे बाहेर आले. एवढ्या रात्री मी का त्यांच्याकडे कुठल्या अर्जंसीने आलोय हे त्यांना समजले नसले तरीही एवढ्या ऑड वेळेमुळे ते हैराण झालेले त्यांच्या नजरेतून समजत होते. त्यांनी गेट उघडून मला आत घेतले.

“काय झाले समीर? सारे काही ठीक आहे ना? तू टूरवर गेला होतास ना?”
“हो. थोड्या वेळापूवीच परत आलो.”
“आर्या पुण्याला गेलीय. सकाळी येईल ती.”
“मला माहित आहे पण…” म्हणून मी थोडा अडखळलो.
“पण काय समीर?”
“ती आता कधीच नाही येणार …अंकल.”
“काय?”
“हो! आत्ताच मला लोणावळ्यावरून इन्स्पेेक्टर वागळेंचा कॉल आला होता.”
“तू काय म्हणतोयस मला काहीही समजत नाही समीर, मला जरा शांतपणे सांगतोस का प्लीज?”

मी आजुबाजूला आंटी नाहीयेत याची खात्री करून घेतली. अपघाताच्या बातमीपेक्षा आर्याबद्दल मी काय सांगू ते मला समजत नव्हते. तरीही मी अडखळत सुरवात केली, “आर्या आणि करिश्मा पुण्यावरून कारने परत येत होत्या. त्यांचा अॅक्सिडेंट झालाय असा कॉल होता इन्स्पेक्टर वागळेंचा.”
“आर्या कशी आहे मग?”

मी मान खाली घालून गप्प राहिलो.

“समीर गप्प का आहेस तू? काय आहे ते खरे सांग.”
“त्यांनी सांगितलेय, आर्या आपल्यात नाहीये. आपल्याला लगेच निघावे लागेल लोणावळ्याला.”

मी आर्याबद्दल एवढे स्पष्ट सांगितल्यावर अंकल धक्क्याने तिथेच पायर्‍यांवर खाली बसले. बराचवेळ ते काहीच बोलले नाहीत. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो आणि एकाएकी माझाच बांध फुटला. डोळ्यांतून पुन्हा पाणी सुरु झाले. त्यांनीही मला घट्ट मिठी मारली आणि मग त्यांचा हुंदका अनावर झाला. ते खूप भावूक झाले होते. भावनांचा आवेग ओसरल्यावर ते शांत झाले आणि यातले काहीही आंटीला सांगू नकोस असे त्यांनी मला बजावले.

लोणावळ्याला पोहोचायला आम्हांला दोन तास लागले. वेळ वाचावा म्हणून मी अंकलना टॅक्सीनेच पोलिस स्टेशनला जायला सांगितले आणि मी रिक्षाने इन्स्पेक्टर वागळेंनी दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर निघालो. एकेक मिनीट मला युगासारखा वाटत होता. तरीही तिथे पोहोचायला मला पंधरा मिनीटे लागली. धावतच रिसेप्शनवर गेलो आणि करिश्मा नेमकी कुठे आहे ते विचारले.

“वॉर्ड नंबर पाच. ती झोपली असेल तर तिच्याशी जास्त बोलू नका.”
“ओके अॅन्ड थँक्यू.”
“बाय द वे कोण आहात तुम्ही?”
“तिचा मित्र.”
“आणि घरचे कोण आलेय का?”
“ऑन द वे आहेत ते.” करिश्माच्या घरचे नेमके कुठे होते ते मला माहित नव्हते. त्यांना ही बातमी तरी समजली आहे की नाही याचीही मला कल्पना नव्हती, “वॉर्ड नंबर पाच कुठे आहे नक्की?”
“लेफ्ट घेतला की सरळ जा. उजव्या हाताला पाच नंबर लिहीला आहे तो वॉर्ड.”

मी तिने दिलेल्या सुचनांचे पालन करून पाच नंबरच्या वार्डात घुसलो. माझी नजर करिश्माला शोधायला भिरभिरत होती. मला तिला भेटून खूप काही विचारायचे होते. माझ्याशी बोलण्याइतपत ती सुखरुप असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करत होतो. डोक्यात असंख्य विचारांचे वादळ घेऊन मी घाईघाईने एकामागून एक बेड चेक करत पुढे जात होतो. शेवटच्या बेडला लावलेला मोरपंखी रंगाचा पडदा बाजूला करून तिथल्या बेडवर झोपेत असलेल्या मुलीवर माझी नजर पडली आणि मला खरोखरची चक्कर आली. अपघातात वाचलेली करिश्मा नसून आर्या होती हे समजल्यावर डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागले. तिला वाचवल्याबद्दल देवाचे आभार कसे मानावेत ते मला कळेना.

मी धावत तिच्याजवळ जाऊन पुन्हा एकदा ती आर्याच असल्याची खात्री करून घेतली. डोळे मिटून ती शांत झोपेत असल्यासारखी वाटत होती. तिथे असलेले स्टूल ओढून मी तिच्या बेडच्या बाजूलाच बसलो आणि हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तिला स्पर्शाची जाणीव झाली असावी कारण तिने खूप प्रयासाने डोळे उघडले. मला पाहताच तिच्या डोळ्यांतून घळकन अश्रू ओघळले. तिच्या डोळ्यांतले तेज कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. एका धक्क्याने ती खूपच थकलेली वाटत होती. मी तिच्या हातावर हात ठेऊन उबदार स्पर्शाची जाणीव करून देत तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत हे नजरेनेच सांगितले.

तिला बोलायला बहूतेक खूप त्रास होत असावा, “कधी आलास तू टूरवरून परत?”
“साडेबाराला.”
“कशी झाली तुझी टूर?”
“तू वेडी आहेस का? हॉस्पिटलच्या बेडवर आहेस आणि मला टूरबद्दल विचारते आहेस?”
“अरे तू किती डेडिकेशनने काम करतोस, म्हणून मी विचारले.”
“पण मला स्वत:ची काळजी घ्यायला लावून तू हे काय करून बसली आहेस?”
“नो क्राईंग.” माझे भरत असलेले डोळे तिला लगेच जाणवले.
“मला एक सांग, एवढ्या रात्री पुण्यावरून निघायची काय गरज होती? सकाळपर्यंत वाट पाहू शकत नव्हतीस?”
“नाही ना. मग कशाला? मी तुला खूप मिस करत होते.”

ती खरे बोलत होती त्याने मला खूप हेलावून आले. तिला एकदा भेटावेसे वाटले की काही जरी झाले तरी ती मला भेटायचीच. मग वेळ काळ याचे तिला भान नसायचे. तिच्या हाताच्या तळव्याचे मी चुंबन घेतले. बेधुंद करणारा तिच्या शरीराचा तोच सुगंध आला जो मला नेहमी वेडा करायचा. तिला घट्ट मिठीत घेऊन ती ठीक आहे याची मला खात्री करायची होती पण मला माहित होते, ती ठीक नव्हती.

“समीर, मला एक गाणे ऐकायचे आहे.”
“कोणते?”
“गाना अॅप उघड ना, मग सांगते.”
मी मोबाईलवर गाना अॅप उघडले आणि याक्षणाला ती नेमके कोणते गाणे सांगतेय याची वाट पाहू लागलो.
“लग जा गले…लाव ना.”
“आर्या नको ना प्लीज…तुला माहित आहे, मला या क्षणाला हे गाणे नाही ऐकायचेय.”
“अरे पण माझे खूप आवडते आहे ते. प्लीज ऐकू या ना एकत्र आपण. ते अगदी बरोबर आहे या वेळेसाठी.”

मी गाणेे प्ले केले. लताच्या आवाजातले ते गाणे खूप इमोशनल आहे ते मला ठाऊक होते आणि तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये असताना या क्षणाला तर ते ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती.

लग जा गले की फिर ये हसीं रात हो ना हो 
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…
हमको मिली हैं आज ये घडियाँ नसीब से
जी भर के देख लिजिए हमको करीब से
फिर आपके नसीब में ये बात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…

लता खूप आर्ततेने गात होती आणि मी खूप भावनिक झालोय हे तिच्या लक्षात आल्यावर तिने माझा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यांत नजर रोखली. तिच्या बोटांत बोटे लॉक करत आमच्या दोघांचेही कान पुढच्या ओळी ऐकायला आतूर झाले. का कोण जाणे हे गाणे फक्त आता आम्ही ज्या प्रसंगातून जात होतो त्यासाठीच लिहीले गेले आहे असे मला वाटत होते पण त्याचा खरा अर्थ लक्षात आल्यावर तसे काही आमच्या आयुष्यात घडायला नको असे मनोमन वाटत होते.

पास आईये की हम नहीं आयेंगे बार बार 
बाहें गले मे डालके हम रो ले जार जार
आखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…

गाणे संपल्यावर आम्ही बराच वेळ गप्प होतो. दोघांच्याही नजरा मात्र बोलत होत्या. सरळ आनंदी आयुष्य चाललेले असताना आम्हांला मध्येच या अशा वळणावर यावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. या विचारात असतानाच हळूच तिने विचारले, “मला एक प्रॉमिस करशील?”
“नो. हॉस्पिटलमध्ये नो प्रॉमिसेस. त्यासाठी सीसीडी, मॅक्डी, आणि तिथल्या तुझ्या फेवरेट फ्राईज असे खूप बहाणे आहेत.”
“मला नाही वाटत.”
“काय?”
“आता मी पुन्हा इथून बाहेर पडू शकेन.”
“वेड्यासारखे काहीही बोलू नकोस.”
“तूला माहित आहे, मी वेडी नाहीये.”
“हो. माहित आहे. तू खूप हुशार मुलगी आहेस पण तू इथून बाहेर पडल्यावर आपण खूप सारी प्रॉमिसेस करुयात.”
“नाही. मला आत्ताच हवे आहे.”
“नाही.”
“कदाचित ही माझी शेवटची इच्छा असेल.”

मला माझ्या डोळ्यांतून गळणारे पाणी टिपायला दुसर्‍या बाजूस वळावे लागले.

“आर्या प्लीज नको ना असे बोलूस यार.”
“मग ऐक ना माझे प्लीज.”
“सांग…”
“तू दुसरी मुलगी शोध.”
“चूप्प बस. मी तुला सोडणार नाहीये.”
“अजूनही जीव अडकलाय माझ्यात?”
“आयुष्याच्या शेवटपर्यंत अडकलेला असेल. आणि भर रस्त्यातल्या चौकात कुणीतरी अंगठी बोटात घालून मला आयुष्यभरासाठी बुक केलेय याची जाणीव आहे मला. ते कसा विसरेन मी?”
“पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता मला खरोखर नाही वाटत माझ्याकडे जास्त वेळ आहे म्हणून.”
“काहीही बोलू नकोस.”
“पण मी खरे तेच बोलतीये.”
“आर्या तू स्वप्न आहेस माझे.”
“आणि तू माझे होतास.”

तिने माझ्या पकडलेल्या हातावरची पकड मजबूत झाली होती. कदाचित माझ्याशी बरेच बोलून ती थकली असावी. तिला ग्लानी आली आणि तिने डोळे मिटून घेतले. मी तिला आराम मिळावा म्हणून तिच्या कपाळावर थोपटत बसलो. डोळे बंद ठेवूनच ती बोलू लागली, “शोना, तुझ्याआधी मला मरण यावे अशी माझी खूप इच्छा होती.”
“आर्या चूप बस आणि आता काही बोलू नकोस. तू खूप थकली आहेस.”
“मला थोड्या गोष्टी बोलू देत. हल्ली तू माझ्या जगण्याचा एक भाग झाला होतास. मी तुझ्याशिवाय जगूच शकले नसते.”
“तू मला हे आता का सांगते आहेस? आधी का नाहीस सांगितलेस?”
“तुला माहित होते ते. पण मला वाटते आता मी सांगायला हवे. तुला ते माझ्याकडून ऐकायला हवे असायचे आणि मी दुष्टपणा करायचे. कधीही बोलायचे नाही. आय एम सॉरी समीर.”
“आर्या आय लव्ह यू. आता नकोस बोलू. मला सारे आयुष्य तुझ्याबरोबर जगायचेेय.”

बोलता बोलता माझ्या डोळ्यांतून गालांवर अश्रू ओघळले. तिने ते पुसायचा प्रयत्न केला आणि मी तिला पूसू दिले. माझ्या आयुष्यातले सगळे चढउतार तिला माहित होते. त्या सगळ्या परिस्थितीत ती मला समजून घेत होती. एक शब्द उच्चाराला की माझ्या मनात काय चाललेय याचा तिला अंदाज यायचा. अगदी मोबाईलवर बोलत असलो तरी दोन शब्दांच्या मध्ये घेतलेल्या पॉझवरून तिला माझा मूड कळायचा. तिच्याशिवाय माझे आयुष्य अधुरे होते. ती माझी सर्वात जवळची मैत्रीण, प्रेयसी आणि सर्व काही होती.

“समू, प्लीज रडू नकोस. तू रडताना अजिबात चांगला नाहीस दिसत.”

मी माझ्या इमोशन्स आवरल्या. ती रागावली की मला बरे वाटायचे. खरे म्हणजे ती रागवत नव्हती. तिच्या माझ्यावरच्या हक्काची वेळोवेळी जाणीव करून द्यायची. मी डोळे पुसत नॉर्मल असल्याचे नाटक केले.

“आता एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकवेळी तुझी काळजी घ्यायला आता मी नसेन. डोके शांत ठेवत जा. बॅनर्जी तू समजतोयस तेवढा वाईट नाहीये. त्याने तुला प्रत्येक परिस्थितीशी सामना करण्याएवढा स्ट्राँग बनवले आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे.
“कोणती?”
“तुला आठवतं, मी तुला व्हॅलेंटाईन्स डे ला भेटायला आले होते. अॅक्च्युली मी तुला माझ्या बर्थडे दिवशी भेटू शकले असते. पण मला ‘व्हॅलेंटाईन डे’लाच भेटायचे होते. मला वाटत होते तू हा दिवस खूप स्पेशल बनवशील.”

आर्या म्हणजे खरोखर इंपॉसिबल होती. माझ्याशी एका शब्दाने या गोष्टीबद्दल बोलली नव्हती आणि आता एकेक सरप्राईज देत होती.

“पप्पा आणि मम्मा कुठे आहेत?”
“पप्पा ऑन द वे आहेत.” मी इन्स्पेक्टरच्या कॉलबद्दल तिला काहीही सांगितले नाही.
“मम्मा?”
“मम्मा नाही आली आपणच घरी जायचेय.”
“मला तिला पहायचे होते.”

माझ्या डोळ्यांना काय झाले होते कळत नव्हते. ते एकसारखे पाझरत होते. तिने माझा हात मागितला आणि मी तो दिला. हळुवारपणे तिने हाताचे चुंबन घेतले.

“मम्माला तू खूप आवडायचास. तुझे किती कौतूक करायची ती!”
“आणि मला तू हे कधी सांगितले नाहीस?”
“अगदी पप्पांनाही आवडायचास.”
“मग मला त्यांच्याबद्ल सांगितलेस ते खोटे होते?”
“काय?”
“ते मला काय म्हणालेले ते – कुत्र्याचे पिल्लू आणि रुबाबदार जावई वगैरे गोष्टी?”
तिने दुबळेपणाने हसण्याचा प्रयत्न केला आणि बोलली, “नाही, ते खरे होते पण नंतर त्यांचे तुझ्याबद्दलचे मत बदलले.”
“बदलले की तू बदलायला लावलेस?”

तिने तशाही परिस्थितीत डोळा मारला. ही पोरगी म्हणजे खरोखर सॅम्पल होती, “म्हणून काय झाले? कितीही केलं तरी मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. आणि माझ्या पहिल्या प्रेमाला ते कसा नकार देतील?”
“खरंच पहिले प्रेम?”
“तुला काय वाटतं?”
“थिएटरमध्ये पिक्चर पहाताना ज्या पद्धतीने माझा किस घेतलेलास त्यावरून तरी वाटले नाही मला.”
“मुलींना नेहमी प्रेमळ आणि हळुवार स्पर्श आवडतो.”
“आता गप्प बस, विषय बदलू नकोस. तू मला पप्पा काय म्हणाले ते सांगत होतीस.”
“मग काय, त्यांना केले तयार मी, पण आता त्याचा काही उपयोग नाही.”
“का?”
“माझा सिक्सथ सेन्स ते सांगतोय मला.”
“चूप्प बस तू आता.”
“पण मी तुला एका गोष्टीची शिक्षा देऊ शकले नाही.”
“कोणत्या?”
“मला तू लेखक आहेस ते सांगितले नव्हतेस त्या.”
“पण आता तर माहित झाले की तुला.”
“तुझे पहिले पत्र वाचतानाच मला शंका आली होती. माझी पर्स कुठाय? तू मला दिलेले पहिले पत्र माझे जीव की प्राण होते.”
मी बाजुच्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये आणि बेडच्या आजुबाजूला तिची पर्स आहे का ते पाहिले, पण कुठेच नव्हती.
“तुझे ते पत्र नेहमीच माझ्याजवळ असायचे आणि कोणीतरी माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतंय याची मला नेहमी जाणीव व्हायची.”
“खरोखर?”
“तू तीन आठवडे माझ्याशी बोलत नव्हतास तर ते पत्रच माझ्या आशेचा किरण होते. केवळ तुझ्यासाठी जगायला हवं असं वाटायचं. तुझी गर्लफ्रेंड असल्याचे मला खरोखर खूप समाधान होते. मी त्या पत्राची पारायणे केली होती. जेव्हा डोळ्यांतले पाणी थांबायचे नाही त्यावेळी मी तुझे पत्र वाचत बसायचे. तू माझे काही ऐकत नव्हतास त्यावेळी मी तुझ्या पत्राशी बोलत बसायचे. मग मला तुझ्याशी बोलल्याचे समाधान मिळायचे. तुझ्या त्या कागदावरच्या शब्दांनी मला अक्षरश: भुरळ पाडली होती. कदाचित ते पत्र मला दिले नसतेस तर माहित नाही मी तुला हो म्हणाले असते की नाही. जगात ती एकच गोष्ट अशी होती की त्याशिवाय मी जगू शकले नसते.”
“आर्या, तू थकली आहेस. शांत झोप आता.”
“मला बोलू दे समीर. माझ्याकडे जास्त वेळ नाही. माझ्या नजरेत तुला साठवून घेऊ दे. मला तुला घट्ट मिठीत घ्यायचे होते. पण आता ते शक्य नाही. आता मी तुला ना पंच मारू शकते ना पिंच करू शकते. माझ्या शेवटच्या काळात तू माझ्या बेडजवळ असावास असे मला वाटायचे पण ती वेळ एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. तरीही मी खुश आहे.”
“आर्या प्लीज…”
“थांब ना समू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुझे पहिले पत्र, टेडी, आपण पाहिलेले पिक्चर्स. एकत्र शेअर केलेल्या मोमेंट्स, तू खरोखर स्टूपिड आणि क्यूट आहेस. पण काय झालेय माहित नाही, हल्ली माझ्या मौल्यवान वस्तू हरवायला लागल्या आहेत.”
“काहीही हरवत नाहीये तुझे.”
“माझी डायरी हरवली आहे. खूप दिवस झाले ती मिळत नाहीये मला.”
“माझ्याकडे सुरक्षित आहे ती.”
तशाही परिस्थितीत तिचे डोळे चमकले, “तुला कुठे मिळाली ती?”
“मी तुझ्या पर्समधून पळवलेली.” मी एखाद्या गुन्हेगारासारखी कबूली दिली. ती हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या तिच्या हरवलेल्या खजिन्याबद्दल खंत व्यक्त करत होती. त्यावेळी गप्प बसणे शक्य नव्हते.
“चिटर! हृदय चोरलेस ते पुरेसे नव्हते का?”
“मला वाचायची होती तुझी डायरी.”
“पण डिसेन्सी नावाची काहीतरी गोष्ट असते म्हटलं.”
“मला माहित आहे शोना! पण तसाही मी कुठे डिसेंट आहे तुझ्याबरोबर?”

प्रेमाने तिने माझा हात दाबला. तेवढ्यात अचानक अंकल आले. आर्याला बेडवर पाहून त्याना आनंदाचा धक्काच बसला. मी त्यांना एवढे एक्सप्रेसिव्ह कधीही पाहिले नव्हते. ते धावत आले आणि त्यांनी आर्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. आर्या खूप छान हसली.

“हे सारे कसे झाले बाळा?”
“माहित नाही पप्पा. मला फक्त आमच्या बाजूला येत असलेला कंटेनर दिसला. करिश्मा ड्राईव्ह करत होती. तिला मी सांगायच्या आतच…हे सारे झाले.”

बोलून तिला पुन्हा दम लागला.

“आम्हांला इथे कुणी आणले? आणि करिश्मा कुठाय?”
“ती ठीकाय.” मी अंकलना डोळ्यांनेच गप्प रहायला सांगितले.
“डॉक्टर काय म्हणाले?”
“डॉक्टर म्हणाले, यू वुईल बी फाईन पण तुला आराम करायचाय आता.”
“पप्पा तुम्ही खोटे बोलताय.”

अंकलनी त्यांचे डोळे पुसले.

“मला माहित आहे डॉक्टर काय म्हणाले असतील. मला मम्माला पहायचे होते.”
“आपण घरी जातोय मग भेटा आणि काय बोलायचेय ते बोला.”

तिने अंकलच्या हातात पर्स पाहिल्यावर ती कमालीची खुश झाली आणि म्हणाली, “माझी पर्स?”

अंकलनी तिच्याकडे पर्स दिली. तिने एक्साईट होऊन एका हाताने ती उघडायचा प्रयत्न केला. मी तिला चेन उघडायल मदत केली. तिने पर्समध्ये हात घातला आणि ते पत्र बाहेर काढले – तेच पत्र, जे मी तिला ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला लिहीलेले. तिने ते पत्र उघडायचा एक शेवटचा दुबळा प्रयत्न केला आणि अचानक दोन बोटांत पत्र पकडलेला तिचा हात अचेतन होऊन खाली पडला. आमची सर्वात मोठी भीती खरी ठरली. आर्या आमच्या डोळ्यांसमोर आमच्यातून निघून गेली आणि आम्ही तिच्या बाजूला असतानाही काहीच करू शकलो नाही.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.

About Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in

One thought on “विधिलिखित 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s