मुंबईत रंगपंचमीची चाहूल पंधरा दिवस आधीच लागते. घरात शोलेतल्या गब्बरसिंगसारखा “कब है होली?” हा बंड्याचा प्रश्न जेरीस आणतो. त्यानंतर सोसायटीच्या आवारात एकमेकांवर पाण्याने भरलेल्या पिशव्या फेकायला सज्ज असलेले बालसैनिक आणि त्यांच्या वेगवेगळ्या गटांवरील हल्ले पाहिल्यावर लवकरच होळी आहे याची जाणीव होते. त्यानंतर सोसायटीच्या आवारात प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्यांचे अवशेष दिसायला लागतात. अगदीच दुर्भाग्य असेल तर एखादी पिशवी आपल्यावरही फुटते.
सोसायटीच्या आवारात कोण जाणता माणूस शिरला की एफबीआय किंवा सीआयएची टीम ज्याप्रमाणे वायरलेस कम्यूनिकेशनने बाकीच्या सेक्यूरिटी एजंटना सावध करते त्याप्रमाणे हे छोटे लोक एकमेकांना, “थांबा थांबा, पाटील काका आले आहेत. आता काही दंगा करू नका नाहीतर लोच्या होईल.” असा संदेश देत सावध करतात.
सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली असली तरी त्या नेमक्या कोणत्या दुकानात मिळतात याची गुप्त माहिती पालकांना नसली तरी छोट्या मुलांना असते. अतिउत्साहात हे लोक “काका, पिशव्या आहेत का संपल्या?” असे ओरडून विचारल्यावर दुकानदाराचे धाबे दणाणतात.
“जरा रस्त्यावर जाऊन ओरड, नाहीतर थोडे पुढे गेल्यावर पोलिस स्टेशन आहे तिथूनच ओरड!”
“सॉरी काका. आहेत ना?”
“पप्पांना घेऊन ये, मग देतो.”
या पिशव्या कुणालाही मिळत नाहीत. वातावरण गंभीर आणि कॉम्पिटीशन टफ असल्यामुळे दुकानात केवायसी झाल्यानंतरच पिशव्या मिळतात आणि मुलगा खुश होतो.
आदल्यादिवशी “रंग खेळायला उद्या सकाळी सातला खाली जाणार आहे!” म्हणून बंड्याने डोके उठवले होते. सातला मी सोडेन की नाही याबद्दल त्याला शंका होती म्हणून मित्राकडेच जाऊन राहू का म्हणून तो हिला गळ घालत होता. कारण दिवाळी आणि रंगपंचमीच्या आदल्या रात्री मित्र रात्रभर टीव्ही पहात बसतो आणि सकाळसकाळी लवकर खाली जातो हे कारण सांगितले जात होते. पण आता लवकर झोपलास तर उद्या सकाळी सातला खाली पाठवतो असे म्युच्यूअल अॅग्रीमेंट झाल्यावर तो शांतपणे झोपी गेला. बरोबर सात वाजता दरवाजावरची बेल वाजली. रंग खेळायला खाली चल म्हणून बंड्याला बोलवायला त्याचे दोन मित्र आले. त्या दोघांना पाहून ते बंड्याचे मित्र आहेत की चांद्रयानावरून आलेले अंतराळवीर आहे ते समजायला मार्ग नव्हता.
म्हणजे रंगीबेरंगी कपडे, पाठीवर पाण्याने भरलेला भलामोठा सिलेंडर, हातात अवघडून धरलेली त्याची पाईप आणि हे सारे कमी की काय म्हणून जंगलातील प्राण्यांना समजू नये म्हणून जसे चित्रविचित्र रंगाचे कपडे घातले जातात तसा रंग खेळण्याआधीच त्याने केलेला चेहर्याचा अवतार! दुसर्यावर नजर वळवली तर त्याचा चेहरा काहीतरी हरवल्यासारखा झाला होता. हातात रिकामा मग घेऊन तो पॅन्टच्या खिशात काहीतरी शोधत होता. “मग कशाला घेतलास?” म्हणून विचारल्यावर “मगातले पाणी हातातल्या पंपाने ओढून ते फुग्यात भरायचे आणि एकदा फुगा भरला की मग तो दुसर्यावर मारायचा!” अशी माहिती मिळाली. तोपर्यंत दुसरे लोक “भर बाबा तुझा फुगा, तोपर्यंत मी थांबतो!” म्हणत वाट पहात थांबेल ही भाबडी आशा त्याच्या मनात होती. त्यापेक्षा तू मगानेच रंगपंचमी खेळ म्हणून हिने त्याला सल्ला दिला.
एकतर घातलेल्या पॅन्टीच्या चार खिशापैकी नेमक्या कोणत्या खिशात रिकामे फुगे ठेवले आहेत याचा त्याला पत्ता नव्हता. केव्हापासून तेच तो शोधत होता. त्याची फुग्यात रंग भरून तो मारायची यंत्रणा एवढी किचकट होती की ती पूर्ण होईपर्यंत त्याला त्याचे फुगे आणि मगासकट कुणीही बॅरेलातून बुचकळून काढला असता.
माझ्या रंगपंचमीच्या तशा खूप आठवणी आहेत. मुंबईत होळीच्या दुसर्या दिवशी रंगपंचमी असली तरी गावाकडे ती नसते. तिथे होळीच्या दुसर्यादिवशी धुलिवंदन असते. सोप्या शब्दांत धुलिवंदन म्हणजे धरतीमातेला वंदन करण्याचा दिवस! जास्ती झाल्यावर रस्त्यांवर साष्टांग नमस्कार घालत पडलेल्या लोकांवरुन ते समजायला वेळ लागायचा नाही. एरव्हीही हे लोक पिऊन पडायचे पण धुलिवंदन म्हणजे त्यांचा ऑफिशियल डे! गावी होळी झाल्यावर पाचव्या दिवशी रंगपंचमी यायची. त्यादिवशी हायस्कुलला सुट्टी असायची मात्र आमच्या गावातली मराठी शाळा चालूच असायची. आम्ही हायस्कुलला असल्याने रंगपंचमीदिवशी मराठी शाळा म्हणजे आमचे टार्गेट असायचे. अर्थातच मराठी शाळेचे गुरुजी! काहीही झाले तरी गुरुजींना भिजवायचे असा प्रत्येक रंगपंचमीला आमचा प्लान असायचा.
आमच्यावेळी आताप्रमाणे रंगीबेरंगी पिचकार्या वगैरे भानगडी नव्हत्या. काचेच्या बाटलीत रंग बनवायचो आणि ज्याच्यावर रंग मारायचा आहे त्याच्या अगदी जवळ जायचे आणि रंग खेळायचा. बर्फाचा गोळेवाला ज्याप्रमाणे गोळा बनवून झाल्यावर त्यावर लाल, हिरवा, केशरी वगैरे रंग मारतो आणि मग गोळ्याला गोळेपण येते अगदी तसा प्रकार असायचा.
एकंदरीतच रंगपंचमीचा उत्सव म्हणजे रामायण किंवा महाभारतात भाले आणि तलवारीने लढणार्या ज्या मास सैनिकांचा घोळका असतो, तसा प्रकार होता. जवळ जाऊन लढायचे. आताच्यासारखे जीपीएसने निशाणा सेट करून मिझाईल स्ट्राईक करतात तशातला प्रकार नव्हता. अगदीच अॅडव्हान्स म्हणजे, सायकलला तेल घालायला वापरात येणारी बुधली म्हणजे आम्हाला साक्षात ब्रम्हास्त्र वाटायचे. बुधलीने थोड्या दूरवरून पिचकारी मारता यायची. शत्रूपक्षाकडे काचेची बाटलीच असायची. त्यामुळे स्वत:कडे बुधली असल्यावर ब्रम्हास्त्र बाळगत असल्याचा इगो असायचा. ज्याच्या हातात बुधली आहे त्याच्यापासून सारेच लांब रहायचे.
त्यानंतर या क्षेत्रात अचाट क्रांती झाली. पिचकार्या वगैरे आल्या. त्यानंतर सिल्व्हर कलर! मुर्त्यांना लावायचा रंग कुठल्यातरी महाभागांनी लोकांच्या तोंडाला लावायाला उपलब्ध करून दिला. सगळे लोक तोंडाला सिल्व्हर कलर लावून गावात हिंडायला लागल्यावर साक्षात राक्षससेना गावात उतरल्याचा भास होत असे.
आपण चकाचक पांढरे कपडे घालून होळी खेळणार्या लोकांपासून बचून राहू असा बर्याच लोकांचा जसा गैरसमज असतो तसेच रंगात भिजलेले अशा कोरड्या माणसाला पाहून “जा, जा तुला काहीही करणार नाही.” म्हणून सांगणारेही काही कमी नसतात. ते काही करत नाहीत पण बोटाने खुणावून ‘गिर्हाईक आले आहे-’ अशी सुचना दिली गेलेली असते. आमच्या गावी तर चौकात रंगाचा एक बॅरेल ठेवलेला असायचा. बिनारंगाच्या माणसाकडे तो एलियन असल्यासारखे पहायले जायचे. तिथून कोणीही – अगदी कोणीही, भले तो पाहुणा का असेना – चालला की अतिशय अदबीने त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवले जायचे – रंग लावून घेणार की बॅरेलमध्ये बुचकळून काढू? आणि मग तो माणूस रंगीबेरंगी होऊन पुढचा रस्ता धरायचा.
पण होळी हा रंगाचा सण आहे त्यात काही वादच नाही. अगदी कोरडे रंग खेळलेले चेहरेदेखील किती साजरे दिसतात! त्यावरचा तो आनंद पाहण्याची मजाच न्यारी आहे. खिडकीत उभा राहून खाली रंग खेळणार्या लोकांकडे पाहिले तरी किती छान वाटते! सगळेजण आपापल्या धुंदीत असतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत रंगात बुडालेले. त्यानंतर घरी आल्यावर ते ओळखत नाहीत हा भाग वेगळा पण होली इज – नो डाऊट – होली!
…
©विजय माने, ठाणे.
बालपणाची आठवण झाली
LikeLike