वास्तव

12

आजुबाजूला बर्‍याच लोकांचे आवाज येत होते. बहुतेक ते कॉरिडॉरमधून येत असावेत. जवळजवळ सगळे अनोळखी होते. एक मात्र ओळखीचा होता, आशिषचा. तो कुणाशी बराचवेळ काहीतरी बोलत होता, पण त्याचा संदर्भ लागत नव्हता. मला आजुबाजूच्या हालचाली समजत होत्या पण डोळे उघडता येत नव्हते. नाकात फिनाईलच्या वासाबरोबर साधारण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असतो तसा एक विशिष्ठ प्रकारचा वास हाता.

थोड्यावेळाने माझ्या हातावरून कुणीतरी खूप प्रेमाने हात फिरवल्यासारखे वाटले. भास! पुन्हा एकदा तसेच झाल्यावर मात्र मी डोळे उघडायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते उघडतच नव्हते. त्यानंतर तो प्रेमळ हात माझ्या डोक्यावर गेला आणि प्रेमाने लहान मुलांचे केस कुरवाळावेत तसा लाडिवाळपणा माझ्या केसांशी झाला.

शेवटी अंगात होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून खूप प्रयासाने डोळे उघडले तरीही समोर काहीच दिसले नाही. पण मी कुठल्यातरी हॉस्पिटलच्या रुममध्ये होतो तेवढे मात्र समजले. खोलीतल्या ट्युबलाईटचा उजेड डोळ्यांना सहन होत नव्हता. मांजरासारखे किलकिले डोळे करून मी आजुबाजूचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण खूप थकलो असल्याने पुढचे काहीच आठवले नाही. नंतर एका ऑथॉरेटिव्ह आवाजाने मी शुद्धीवर आलो, “आता कसे वाटतेय समीर?”

मला सारे काही ऐकू येत होते पण बोलावेसे वाटले तरी तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. मग डाव्या दंडावर काहीतरी टोचल्यासारखे झाले, बहुतेक ते इंजेक्शन असावे. रुममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली.

“डॉक्टर, किती वेळ लागेल अजून?” आशिष डॉक्टरांना विचारत होता.

“मी इंजेक्शन दिलेय. अजून अर्धा पाऊणतास झोपू दे त्याला. बरे वाटेल मग.”

कितीवेळ झोपेत होतो देवालाच ठाऊक, पण नंतर जाग आल्यावर मात्र थोडे बरे वाटले. डोळे उघडून पाहिले तर समोरच आशिष चेहरा पाडून बसला होता. मी शुद्धीत आल्यावर तो एकच वाक्य बोलला, “आय एम सो सॉरी समीर.”

मी गप्प राहिलो. आता भेटणारा प्रत्येकजण माझे सांत्वन करणार होता आणि मला त्याची सवय करून घ्यायला लागणार होती. खरे म्हणजे मला स्वत:ला आर्याच्या धक्क्यातून सावरणे खूप कठीण जात होते. मी नेमका कुठे होतो आणि मला काय झाले होते याची मात्र मला काहीच कल्पना नव्हती.

“आशिष, मी कुठे आहे आणि मला काय झालेय?”

“तू ना, खूप मोठे कांड केले आहेस आमच्या जीवाला घोर लावून. तुला इथे हॉस्पिटलमध्ये काही बोलत नाही. घरी चल, मग सांगते.”

तिचा चेहरा पहावा म्हणून मी वळून पाहिले. डोळ्यांत पाण्याचे तळे घेऊन ती माझ्या मागे उभी होती. भूत दिसल्यासारखे मी तिच्याकडे पहातच राहिलो आणि काही समजायच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. मला पुन्हा चक्कर येते की काय असे वाटू लागले. मी आर्याच्या मिठीत होतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. परफ्यूम आणि तो सुगंध! नो डाऊट, तिचाच होता तो! मी स्वप्न पहातोय की जागेपणी तिचा असा भास होतोय ते मला कळत नव्हते. मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला, तरीही काही समजेना. म्हणून तशा परिस्थितीतही मी तिला चिमटा काढला. “आऊच!” म्हणत तिने जोराचा पंच दिल्यावर ती खरी आर्या आहे याची मला खात्री झाली.

मी वेड्यासारखा आशिषकडे पहायला लागलो.

“आर्या?” अजूनही माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती आर्याच आहे ते पटवून देण्यासाठी मला किमान एका साक्षीदाराची गरज वाटत होती.

“हो. आर्याच आहे ती.”

“मग मला सॉरी का म्हणालास थोड्यावेळापूर्वी?”

आशिष बाजूलाच राहिला आणि माझ्यापासून बाजूला होत आर्यानेच माझा क्लास घ्यायला सुरवात केली, “तू चेन्नईवरून आल्यावर किती झोपेच्या गोळ्या घेतलेल्यास?”

“झोपेच्या गोळ्या?”

हे लोक मला वेडा वगैरे समजत होते, मला वेडा बनवायचा त्यांचा प्लान होता की माझ्याच डोक्यात काही केमिकल लोच्या झाला होता ते समजायला मार्ग नव्हता.

“हो. झोपेच्या गोळ्या.”

“मी कशाला झोपेच्या गोळ्या घेईन?”

“आम्हांला काय माहित? आम्हांला विचारून थोडीच घेतल्या होत्यास?”

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

“एक मिनीट…एक मिनीट थांबा जरा. लेट मी रिमेंबर! स्टडी टेबलवरची ती बॉटल झोपेच्या गोळ्यांची होती आशिष?”

“अरे पण सुशिक्षित आहेस ना तू? गोळ्या घेताना त्या वाचून तरी घ्यायच्यास? आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुला कुठे मिळाल्या त्या?”

“ती खूप मोठी स्टोरी आहे. नंतर सांगेन कधीतरी.”

“नाही. मला आत्ताच ऐकायची आहे.”

“आपण मध्यंतरी बोलत नव्हतो त्यावेळी सुब्रतोने त्याच्या भावाच्या मेडिकलमधून आणून दिलेल्या. रात्रभर झोपच यायची नाही म्हणून घेत होतो. थोड्या शिल्लक राहिलेल्या. पण मी ती बॉटल फ्रीजवर ठेवली होती. बाहेर स्टडी टेबलवर कशी आली?”

“ती जागा आहे अशा गोळ्या ठेवायची? कसा रे तू असा वेंधळा? आणि काम झाल्यावर त्या टाकून द्यायच्या ना? की मला लग्नाआधीच विडो बनवायचा प्लान होता तुझा?”

च्यायला! डोक्यात माझा लग्नाआधी विधूर झाला होता त्याचे हिला काही पडले नव्हते. पण झालेल्या सगळ्या प्रकरणामुळे माझी कीव वाटल्याने आशिष समोर येत म्हणाला, “यार! ही सगळी माझी चूक आहे.”

“आता तुझे आणि काय मध्येच? मला नक्की काय झाले होते ते कुणीतरी सांगाल का प्लीज?”

“तू चेन्नईवरून यायच्या आदल्याच दिवशी मी घराची बरीच साफसफाई केली आणि किचन साफ करताना फ्रीजवरची ती गोळ्यांची बाटली- जिथे आपल्या कॉमन टॅब्लेट्स असतात तिथे स्टडी टेबलवर ठेवलेली – नेमकी तिथेच विसरलो. माझ्यामुळेच हा सगळा घोटाळा झाला.”

“ओह आय सी! किती गोळ्या होत्या त्यात?”

“तू किती घेतल्यास?”

“नाही यार आठवत! अंग दुखत होते म्हणून घेतलेल्या मी. पण मग पुढे काय झाले आणि मला इथे कोणी आणले?”

मग खरे कांड काय झाले होते ते त्या दोघांकडून समजले. ऐकल्यावर तर अंगावर काटाच आला.

मी रात्री चेन्नईवरून येऊन जे झोपलो ते उठलोच नाही. दुसर्‍यादिवशी कुठे भेटायचे ते ठरवायला सकाळसकाळी आर्याने फोन केला. पण मी उचलला नाही. सुट्टीच्या दिवशीही मी जास्तीजास्त साडेदहा अकरापर्यंत झोपायचो. दोनतीन दिवसांच्या सततच्या प्रवासामुळे मी कदाचित सुट्टी घेतली असेल म्हणून तिने त्यानंतरही फोन ट्राय केला तरीही माझ्याकडून नो रिसपॉन्स! शेवटी थकून ती थेट आमच्या फ्लॅटवरच आली. दारावरची बेल, दरवाजा – दोन्ही वाजवून झाले, माझ्या नावाने हाका मारून झाल्या पण काही उपयोग झाला नाही. दरवाजाबाहेरून कॉल केल्यावर आतून रिंगटोनचा आवाज येत होता पण मी पण मी दरवाजा उघडत नव्हतो. मग मात्र काहीतरी विपरीत घडल्याची तिला शंका आली आणि तिने आशिषला फोन केला. त्यावेळी नागपूरला असलेला आशिष संध्याकाळपर्यंत परत येणार होता. सगळा सीन ऐकल्यावर त्याने अर्जंसीसाठी सोसायटीमधल्या मित्राकडे ठेवलेली फ्लॅटची चावी घेऊन दरवाजा उघडायला सांगितले.

सुदैवाने तो मित्र घरीच होता. आर्याने त्याच्या मदतीने दरवाजा उघडला तर मी गाढ झोपलेलो. हाका मारून पाहिल्या पण माझे लक्षण ठीक दिसत नव्हते. म्हणून त्यांनी बिल्डिंगमध्येच रहाणार्‍या एका डॉक्टरांना बोलवले. मला चेक करत असताना स्टडी टेबलवरची स्लिपिंग पिल्सची बाटली दिसल्यावर एकंदरीत काय झाले असावे याचा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी मला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यास सांगितले.

मग आर्याने धावपळ करून तिच्या फॅमिली डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केले. आशिष पोहोचायला संध्याकाळ झाली. दिवसभर माझ्या फोनवर बॅनर्जीचे फोन येत होते, पण आर्याने इमर्जन्सीमुळे ‘समीरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे आणि ऑफिस जॉईन करायला त्याला किमान चार दिवस तरी लागतील असा मेसेज पाठवला. घरचा आईचा फोन आला तर उगाच तिला काळजीत टाकायला नको म्हणून, “आम्ही बाहेर पिकनिकला आलोय आणि उद्या समीर तुम्हांला नक्की फोन करेल.” असे सांगितले. ती म्हणजे बॉर्न प्लानर होती. तिला फक्त टास्क सांगायचा. लगेच तिच्याकडे प्लान तयार असायचा, बॅकअप प्लानसह! हे निरोप आणि हॉस्पिटलमधली माझ्यासाठीची धावपळ करताना बिचारी थकून गेली होती. तरीही सार्‍या गोष्टी तिने व्यवस्थित हँडल केल्या होत्या.

ती पुन्हा माझ्या बेडवर बसत म्हणाली, “अजूनही तुझे अंग दुखतेय? आशिष, थोडावेळ बाहेर जातोस का प्लीज? मी जरा याच्याकडे पाहते!”

तिने आशिषला डोळा मारलेला माझ्या लक्षात आले. तिच्या तावडीत मला एकट्याला सोडून तो ही लेकाचा बाहेर जायला निघाला. आर्याचे लक्षण ठीक दिसत नव्हते म्हणून मीच त्याला म्हणालो, “आशिष, डॉक्टर किंवा कोणीतरी येतील त्यांच्यावर लक्ष ठेव, ही वेडी आहे. यू नो वॉट आय मीन.”

आशिष हाताने थम्सअप करून मला डोळा मारत बाहेर गेला. त्या दोघांनाही आम्ही कुठे आहे आणि काय करतोय याचा जरादेखील सिरीयसनेस नव्हता. तो बाहेर गेल्याची खात्री झाल्यावर आर्या माझ्याजवळ आली, “सम्या, आय एम गोईंग टू किल यू नाऊ! तुला काही विचार असतो की नाही मागे मी आहे याचा?”

“अगं, पण मला समजलेच नाही की ती झोपेच्या गोळ्यांची बॉटल आहे.”

“तुला काही झालं असतं तर?”

“काही नाही होणार मला.”

“माझी अवस्था तुला नाही कळणार! किती घाबरलेले मी. अक्षरश: थरथरत होते तू शुद्धीवर येईपर्यंत.”

“आणि तुला कुठे माहित आहे माझी अवस्था काय झालेली ते! माझ्या डोक्यात एक भयंकर पिक्चर चालू होता.”

“काय?”

“जाऊदे. विचार करायलाही नको वाटतेय यार.”

“सांग ना-”

“तुझा अॅक्सिडेंट झालाय असे पहात होतो मी.”

“अच्छा! म्हणजे अपघातात मला मारायचा विचार आहे का तुझा?”

“सांगताही येणार नाही काय काय पाहिले! सारेच हॉरिबल होते!”

“रिअली?”

“मग काय! मी तुझ्याशिवाय कसा जगू शकलो असतो माहित नाही!”

“ऐक ना, रेडी आहेस तू?”

“कशासाठी?”

मला काही समजायच्या आत तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले आणि तिने एक जोराचा चावा घेतला.

“अगं काय करतेयस तू?”

“तू मला खूप त्रास दिला आहेस. त्याचा हा छोटासा बदला.”

“पण इथे हॉस्पिटलमध्ये?”

“अचानक कोण येईल त्याची काळजी तू करू नकोस. आशिष इज ऑन द डोअर!”

तिच्या या आक्रमक पवित्र्याने हैराण होऊन मी बेडवर बसलो आणि माझे डोके आपल्या छातीशी कवटाळून माझ्यावर अश्रूंचा अभिषेक करता करता अचानक ती हळवी झाली. आयुष्यात एवढे उत्कटपणे प्रेम करणारे आपल्याला कुणीतरी मिळाले म्हणून मी ही भावूक झालो आणि डोळ्यांत पाणी तरळले.

“सम्या, आता तुला रडायला काय झालेय?”

“तुला गमवायची खूप भीती वाटलेली.”

“शोना, मलाही तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे आता. या दोन दिवसांत ते कळून चुकलेय मला.”

“मग आता काय करायचे?”

“सध्या तरी हे…” म्हणत तिने डोळे मिटले आणि अत्यंत आवेगाने पुन्हा माझे चुंबन घेतले. त्यावेळी मात्र कोणताही प्रतिकार न करता तिला कसलीही इजा होणार नाही याची काळजी घेत मी चुंबनाच्या बाबतीतला माझाही अनुभव किती विस्तारलाय हे दाखवून दिले. आम्हा दोघांनाही हवाहवासा तो क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत धुंद होतो आणि बाजुलाच असलेल्या एका ट्रॉलीवर आर्याने माझ्यासाठी आणलेली एका नवोदित लेखकाची ‘तुझ्याविना’ ही कादंबरी आमच्याकडे चोरून पहात गालातल्या गालात हसत होती.

समाप्त.

मनोगत

हुश्श! झाले बाबा एकदाचे! आता सगळेजण खुश ना? अरे किती प्रेशर करायचे एखाद्यावर? तीन चार दिवस झोप नाही मला! असो, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल! नऊ महिन्यानंतर प्रसवलेल्या आईची जी मनस्थिती असते, अगदी तशीच मनस्थिती या क्षणाला माझी आहे. जूनमध्ये मी ‘तुझ्याविना’ लिहायला सुरवात केली होती. त्यानंतरचे हे सात महिने खूप मंतरलेले होते. माझे बहुतांश लेखन विनोदी आहे. पण प्रतिलिपीवर लिहायला लागल्यापासून मी ती मर्यादा मनातून काढून टाकली. माझे लेखन वाचून वाचकाचे पहिले पत्र यायला मला बारा वर्षे वाट पहावी लागली होती. दिवाळी अंकातल्या एका व्यक्तिचित्राचा रिव्ह्यू त्या वाचकाने लिहीला होता. त्यांचे पत्र हातात आल्यावर मला आभाळ ठेंगणे झालेले. लिखाणावर एवढ्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया पूर्वी मिळायच्या नाहीत. पण प्रतिलिपीने हे सर्वव्यापी व्यासपीठ उघडून लेखक आणि त्याचबरोबर वाचकांवरही खूप उपकार केले आहेत.

इथे लिहून प्रकाशित करायचा अवकाश की लगेच प्रतिक्रिया येतात. कोणत्याही लेखकासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात. म्हणून वाचकांना एक नम्र विनंती, तुम्ही एवढा वेळ काढून कुठल्याही लेखकाचे जे लेखन वाचता आहात, त्यावर थोडी तरी प्रतिक्रिया लिहा. तुमच्या प्रतिक्रिया वाचून लेखकाला खूप आनंद होतो. तुमचे रिव्ह्यूज खर्‍या अर्थाने लेखकांचे बुस्टर्स असतात. ते लेखकांना लिहीते ठेवतात. पण प्रतिक्रियाच येत नसतील तर बरेच नवोदित लेखक आपले लेखन कुणालाही आवडत नाही असा समज करून घेऊन लिहायचे कमी होतात. त्यांना लिहीते करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना? त्याशिवाय ते चांगले साहित्य कसे लिहीतील?

तुम्ही समीर आणि आर्यावर किती प्रेम करता ते खर्‍या अर्थाने मला तेहतीसावा भाग लिहील्यावर समजले. कुणाला आर्याचे असे अचानक जाणे अजिबात पटले नाही, त्यांनी तसे स्पष्ट सांगितले. काही वाचक माझ्यावर रुसले. काही रागावले. पुढचा भाग वाचा म्हटल्यावर “आर्या गेल्यावर आता काय वाचायचे आहे?” अशी त्यांची चिडचिड झाली. बर्‍याच वाचकांनी पर्सनल मेसेज करून “आर्याला परत आणा नाहीतर यापुढे मी तुमची कथा वाचणार नाही.” अशा प्रेमळ धमक्याही दिल्या. तरीही काही चतूर वाचक खूप आशावादी आहेत. आर्याचे काय करायचे त्याबद्दल स्वत: मी कन्फर्म नव्हतो, पण तिला काहीही होणार नाही अशी त्यांची ठाम खात्री होती. खरोखर धन्य आहात तुम्ही!

या कथेत, विशेषत: तेहतीसाव्या भागात मी तुम्हांला खूप रडवले त्याबद्दल सॉरी! माझ्या लेखनाची ती एक कसोटी होती. आणि मला खरोखर ती टेस्ट द्यायची होती. त्यात मी कितपत यशस्वी झालोय हे तुम्हीच सांगू शकाल. आय होप, तुम्हांला ही कथा आवडली असेल. आवडली असेल तर वाचण्यासाठी मित्रांना नक्की रेकमंड करा. आणि शेवटी सांगायचे म्हणजे तुमचे माझ्यावरचे प्रेम असेच राहू द्या! प्रतिलिपीवर माझी ओळख बनवण्यात तुमचा व्यक्तिश: वाटा आहे, त्यामुळे प्रत्येक वाचकाचे मनापासून आभार! शेवटी सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे! तुटलेले नाते जोडताना जीवाचा आटापिटा करण्यापेक्षा ते नाते मुळातच तुटू नये याची काळजी घ्या. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि पार्टनरच्या स्वभावातील वेगळेपणा एन्जॉय करायला शिका म्हणजे वेगळा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सेलिब्रेट करण्याची आवश्यकता वाटणार नाही.

तुमचाच,

विजय माने, ठाणे.

About Vijay Manehttps://vijaymanedotblog.wordpress.comआजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, भेटणारे लोक, त्यांच्या सवयी आणि अज्ञानातून उद्भवणारे विनोदी प्रसंग लिहायला मला आवडते. बहुतेकदा स्वत:चा अनुभवही मोठा गंमतीदार असतो, तो लिहायला खूप मजा येते. माझ्या पहिल्या ‘एक ना धड’ या पुस्तकास महाराष्ट्र राज्याचा २००८ चा ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ हा राज्यपुस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर माझा ‘एक गाव बारा भानगडी’ हा कथासंग्रह व ‘ऑल आय नीड इज जस्ट यू’ ही इंग्रजी कादंबरी प्रकाशित झाली आहे. मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. खरंच, आयुष्य सुंदर आहे – लिहीत आणि वाचत रहा. लिखाणाबद्दल तुमचे अभिप्राय अवश्य कळवा. संपर्क : vijay_s_mane@yahoo.co.in

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s