सगळ्या जगात कोरोनाने थैमान घातले होते. टीव्हीवर ढीगभर बातम्या दाखवल्या जात होत्या, खूप अर्जंट असेल तरच घराबाहेर पडा असे मुख्यमंत्री वेळोवेळी आवाहन करत होते पण बर्याच कंपन्या काही केल्या वर्क फ्रॉम होम देत नव्हत्या. परिणामी लोकांची गर्दी मात्र कमी व्हायला मागत नव्हती. ट्रेन भरभरून लोक ऑफिसला जात होते. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे ऐन मार्चमध्येच हा योग जुळून आला होता.
शेवटी सगळी मुंबई एकतीस मार्चपर्यंत बंद करायची असा सरकारचा आदेश आला आणि मग सर्वांबरोबर सुजितलाही वर्क फ्रॉम होम मिळाले. चार बॅचलर लोकांनी घेतलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुजित रहात होता. तिघे सुट्ट्या टाकून आधीच गावी पळाले होते. सुजितला मात्र गावी जाणे शक्य नव्हते. नाईलाजाने त्याने लॅपटॉपवर लॉगिन केले आणि तो कामाला लागला.
गळ्यात आयकार्ड नाही, ट्रेनमधला प्रवास, रोजचा स्वाईप, चहाची पॅन्ट्री, रोज भेटणारे दोस्त, गेटबाहेरची सिगरेट आणि वडापाव व रोजचे ऑफिसचे गजबजलेले वातावरण हे सारे तो मिस करत होता. दुपारी चारला लंडनवरून एक कॉल होता त्याचा डेटा बनवायच्या तयारीला तो लागला. कामाच्या नादात साडेतीन कधी वाजले त्याला समजलेच नाही. यापुढे निवांत जेवण करणे त्याला जमणार नव्हते म्हणून त्याने भाताचा कुकर लावला आणि चार वाजता व्हर्चुअल मिटींगमध्ये तो जॉईन झाला.
जगाच्या चार कोपर्यातून चारजण कनेक्टेड आहेत, महत्वाची चर्चा चालली आहे आणि अचानक साक्षात वाफेवर चालणार्या रेल्वेने शिट्टी द्यावी तशी शिट्टी सुरु झाली. बाकीच्यांनी दुर्लक्ष करून तसेच डिस्कशन चालू ठेवले पण नंतर नंतर क्लायंट काय बोलतोय हे कुणालाच कळेना म्हणून कॉल तसाच चालू ठेऊन सगळेजण शांतपणे ती शिट्टी संपण्याची वाट पाहू लागले. शिट्टी थांबायचे नाव घेईना. मग सुजित एका मिनीटात आलो म्हणून उठला आणि शिट्टी बंद झाली.
“आय एम सॉरी…” परत जागेवर येऊन बसत सुजित बोलला.
सगळे डिस्कशन संपले आणि कॉल संपवता संपवता शेवटी लंडनच्या ऑफिसमधून लाईनवर असलेल्या अभिषेकने विचारले, “बाय द वे, सुजित वो क्या था?”
“सॉरी सर? मै कुछ समझा नही-”
“इंडिया मे चार बजे थे…और वो टाईम पे इतनी लंबी सीटी?”
“दाल खिचडी सर! मेरा लंच!”
#WorkFromHome
थोडेसे महत्वाचे –
आजकाल तोंडाशी आलेल्या कोरोनाच्या संकटावर लोकांनी काय करावे हे बरेचजण सांगताहेत. पण खरोखर ही वेळ क्रिटीकल आहे. या वेळेत तुम्ही ऑफिसला गेलाय म्हणून देशाची पडलेली इकॉनॉमी एका दिवसात सुधारणार नाही हे लक्षात घ्या. कोरोनाचे संकट टळल्यावर जे काही दिवे लावायचे आहेत ते लावा. दिवसरात्र ऑफिसमध्ये थांबलात तरी चालेल पण सध्या मात्र घराबाहेर पडू नका. स्वत:ची काळजी नसेल तर निदान दुसर्यांची तरी करा.
त्यापेक्षा या अचानक मिळालेल्या सक्तीच्या मोकळ्या वेळेत आयुष्यात आपले कोणते छंद पूर्ण करायचे राहून गेलेत याचा आढावा घ्या. चित्रे काढा, पुस्तके वाचा, फोटोंचे जुने अल्बम बघा, घरच्यांसोबत वेळ घालवा. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ – अगदी लुडोही खेळा. घरचेही लोक तसे चांगले आहेत याचा अनुभव घ्या. दुपारच्या जेवणानंतरची झोप कशी असते ते पहा. तुम्ही घराबाहेर न पडल्यामुळे तुम्ही तर संसर्गापासून वाचालच पण बाकीचे किती लोक वाचतील याचाही जरा विचार करा.
पण ही सुट्टी पाट्र्या करण्यासाठी, मित्र, नातेवाईक यांना भेटण्यासाठी, सकाळसकाळी गर्दीत जाऊन वॉक करण्यासाठी, पिकनिकसाठी नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या. इटली आणि स्पेनमधल्या लोकांनी त्यांच्या सक्तीच्या सुट्ट्यांचा उपयोग याच गोष्टींसाठी केला होता. त्यांचे काय होतेय हे आपण बातम्यांमधून पहातोय. तेव्हा घरीच रहा आणि कोरोनाला रोखा. आर्मीसारखे आपण सीमेवर लढत नाही आहोत पण खरोखर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची ही संधी चालून आली आहे, ती वाया घालवू नका!
©विजय माने, ठाणे.