
कोणत्याही विवाहित पुरुषाला वरील प्रश्न विचारा, शंभरपैकी जास्त नाही सांगणार, नव्वदवेळा तरी टाईम चुकलेला असतो. म्हणजे काय टेलिपथी आहे समजत नाही, एखादा बाका प्रसंग निभावून नेत असतानाच नेमकी तिला आपली आठवण यावी हे एक विषेशच आहे. दाखले पहा –
प्रसंग पहिला :
मित्राने रेफरन्स दिल्यामुळे एका प्रख्यात इनवेस्टमेंट कंपनीकडून फोन आला होता. ह्यात इन्वेस्ट करा त्यात इन्वेस्ट करा हे सांगून झाले. नंतर कोणत्या बँकेत अकाऊंट आहे हा प्रश्न आला. ते सांगितल्यावर कार्ड नंबर विचारला गेला, बोलण्याच्या ओघात मी तो सांगून टाकला आणि माझी चूक माझ्या लक्षात आली. असा कार्ड नंबर देणे बरोबर नव्हते. त्यावेळी आताएवढे ऑनलाईन फ्रॉड होत नसले तरी माझ्या साहेबाच्या अकाऊंटमधून चाळीस गेलेल्याला एक महिनाही उलटला नव्हता. ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा कॉल केला तर फोन लागत होता पण कोणीही उचलत नव्हता. बहुतेक कार्ड नंबर मिळाला म्हणून पार्टी खुश असावी.
माझी शंका बळावली. माझ्याबरोबर आणखी एका मित्रानेही त्याचा कार्ड नंबर असाच सांगितलेला. मी मित्राला माझा डाऊट सांगितल्यावर मित्राने त्याच्या अकाऊंटवरचे पैसे लगेच दुसर्या कुणाच्यातरी अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करून टाकले. हे सगळे एवढे रामायण चालले आहे. मी माझ्या बँकेला फोन करून माझे कार्ड ब्लॉक करायला फोन करतोय आणि बायकोचा फोन आला.
“काय आहे?” हा नैसर्गिक वैताग असतो, मुद्दाम आणावा लागत नाही.
“काही नाही असाच फोन केला.”
“काही अर्जंट काम होतं का?”
“नाही. अशीच आठवण आली.”
“मी तुला पुन्हा फोन करू का?”
“हे तुमचं नेहमीचंच आहे. घरी आल्यावर तर माझ्याशी बोलायला वेळच मिळत नाही. सतत त्या टीव्हीसमोर बसलेले असता. आत्ता पोरं शाळेत गेली. सगळं आवरून ठेवलं आणि बोलावं म्हटलं तर हे तुमचं हे असं.” म्हणून बायको मोबाईलवरच मुसमुसायला लागली. काय करावं ते मला कळेना. माझी मानसिकता त्या बिचार्या बँकवाल्याला कळाली असती पण ही माझे काही ऐकून घ्यायच्या मूडमध्ये नव्हती.
मी बँकेचाच फोन बंद केला आणि तिच्याशी खूप प्रेमाने बोललो. आपले पैसे कसे महत्वाचे आहेत आणि पुढच्या पाच दहा मिनीटात त्या बँकेला फोन नाही केला तर सगळे पैसे कसे जातील हे तिला समजावून सािागतले तर ती म्हणाली, “तसेच पाहिजे तुम्हांला. माझ्याशी बोलायला नको.”
ही म्हणजे हद्द झाली!
प्रसंग दुसरा :
बॉस पेटलाय, त्याला हवे असलेले रिपोर्ट आत्ताच्या आत्ता आणा म्हणून सांगितले आहे. त्याची तरी काय चूक म्हणा, त्याने बाहेरच्या कुणालातरी मिटींगला बोलवले आहे, म्हणजे बोलवले होते हे तो विसरला आहे आणि ते येऊन रिसेप्शनमध्ये बसल्यावर ह्याला त्या रिपोर्टसची आठवण आली. ते रिपोट्र्सचे काम करत होतो आणि बायकोचा फोन आला.
पहिल्यांदा तर उचललाच नाही. फोन केल्या केल्या जर तो उचलला गेला नाही तर मी कुणाबरोबर पळून चाललोय की काय अशी तिला शंका येत असावी. ताबडतोब दुसरा कॉल आलाच पाहिजे असा नियम आहे आणि तो आलाही. बोलल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून उचलला. “एका अर्जंट कामात आहे, झाल्यावर लगेच तुला कॉलबॅक करतो.” समोरून हो नाही वगैरे काहीही न बोलता फोन कट होतो. तसे बोलून मी फोन कट केला की ती मला तुसडा किंवा माणूसघाणा म्हणते. म्हणून काहीही रिसपॉन्स न देता फोन कट करून ती माझ्यावर असा सूड उगवते.
प्रसंग तिसरा :
कित्येक वर्षांनी कॉलेजच्या मैत्रिणीचा आपणहून फोन आलाय. किती खटाटोपाने कुठूनतरी तिने माझा नंबर मिळवलाय. पहिल्यांदा कोण बोलतंय हे ऐकल्यावरच माझा कानांवर विश्वास बसत नाही.
“काय आमची आठवण होते की नाही? की विसरलास आम्हांला?” समोरून असा नाजुक प्रश्न येतो. त्या प्रश्नाने कॉलेजच्या आठवणी जाग्या होतात आणि ब्लॅक अॅन्ड व्हाईट पिक्चरसारखे त्या वयातले प्रसंग डोळ्यांसमोरून तरळून जातात. तेवढ्याने आपल्या चेहर्यावर लाली चढते आणि फोन चालू असतानाच पिप पिप असा दुसरा कुणाचातरी फोन येतोय म्हणून मोबाईल सांगतो. नेमका त्याचवेळी बायकोचा फोन कसा काय येतो हे खरंच आजपर्यंत न उलगडलेले कोडे आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिल्या पाहिल्या “काय आमची आठवण होते की नाही?” या प्रश्नानंतरच्या फिलींग्ज कुठल्या कुठे पळून जातात. मग वर्गमैत्रिणीलाच बिचारीला “थांब जरा एक अर्जंट कॉल येतोय, तुला पाचच मिनीटात फोन करतो.” म्हणून पहिल्यांदा हिच्याशी बोलावे लागते.
प्रसंग चौथा :
दीडतास कॉन्फरन्सरुममध्ये बसून जोराची लागलीये, वॉशरुमकडे चाललोय इतक्यात बायकोचा फोन येतो, कुठे आहे किंवा काय करताय वगैरे भानगड नाही, “ऐका ना, एक अर्जंट काम होते.”
“तू पाचच मिनीट थांब, तुला कॉल करतो.”
“नाही नाही, तो अमेझॉनवाला डिलीव्हरी घेऊन आला असेल, तुम्हांला कॉल करेल, त्याला सांगा मी घरी नाही म्हणून.”
“अजून काय सांगू त्याला?”
“बाजारात गेली आहे म्हणून सांगा.”
हिला उपरोधिक प्रश्न वगैरे काय भानगड असते ते कळत नाही.
“नाहीतर एक काम करता का?” तिला काहीतरी दुसरी आयडिया सुचली असावी.
“मी वॉशरुमला चाललोय. दीड तास एका मिटींगमध्ये बसून होतो. आता तिकडे तरी जाऊन देशील का दोन मिनीटे.”
“तुम्ही लॅपटॉप घेऊन वॉशरुममध्येच बसत जा.” तिला उपरोधिक प्रश्न समजत नसले तरी दुसर्याला उपरोधिक बोलता मात्र येते.
“बाय…”
“लगेच फोन करा. नाहीतर तो अमेझॉनवाला डिलीव्हरी न देताच परत जाईल.”
घराला कुलूप असल्याने मग त्यानंतर पंधरावीस मिनिट मी, तो अमेझॉनवाला आणि आमचे शेजारी यांचे एकत्रितपणे थ्रीपार्टी संभाषण करून ती डिलीव्हरी सोडवून घ्यावी लागते आणि बाजारातून परत आल्यावर ही शेजार्यांना अमेझॉनवरून गोष्टी मागवणे किती सोपे आहे ह्याचे धडे देत बसते.
प्रसंग पुढचा :
जाऊदे, कुणाचातरी फोन वाजतोय, बापरे! तिचाच आहे. बाकीचे सवडीने नंतर कधीतरी लिहीन. आत्ता तिच्याशी बोलायला हवे.
©विजय माने, ठाणे.