एक निनावी ओळख

LD2

बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. कार लोणावळ्याच्या घाटातून चालली होती. पावसाळ्यात हिरवागार झालेला घाट मनाला गारवा देत होता. मध्येच कोसळणारे धबधबे अचानक नजरेस पडत होते. सारी झाडे आणि वेली हिरवे, पोपटी पोषाख घालून पावसात भिजत होते. डोंगरांवर तर हिरवा गालिचा अंथरल्यासारखे वाटत होते. मुंबईच्या गर्दीला मागे टाकून पावसाळ्यात निसर्गाच्या एवढया जवळ आलो होतो. मनात बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे-’चे कॅसेट सरू झाले. शाळेत असताना ही कविता मला खूप आवडायची. मन क्षणात असे पाठीमागे गेले. नॉस्टॅलजियाही किती हवाहवासा वाटतो!

इतक्यात कार ड्रायव्हरने हॉर्न वाजवला आणि खळ्कन मनातल्या विचारांची साखळी तुटली. रम्य भूतकाळातून वास्तवात आलो. त्याची जाणीव पुन्हा एका हार्नच्या कर्कश आवाजाने करून दिली. मग मात्र ड्रायव्हरचा राग आला आणि मी समोर पाहिले. ड्रायव्हरलाही चीड येणे साहजिक होते कारण त्याला गाडी पुढे काढता येत नव्हती.

आमच्या पुढे एक टेंपो चालला होता. ड्रायव्हर त्याच्या उजव्या बाजूने गाडी पुढे घ्यायचा प्रयत्न करत होता पण टेंपो बिलकुल साईड द्यायला तयार नव्हता. कार उजव्या बाजूला घेतली की टेंपोही उजव्या बाजूला सरकायचा. डाव्या बाजूने जायचा प्रश्नच नव्हता. खाली शेकडो फुट खोल दरी होती. काही केल्या पुढे जायला रस्ता मिळत नव्हता. या डोके उठवणार्‍या हॉर्नच्या आवाजाने माझी सहनशीलता संपली आणि त्या कसेही वाहन चालवणार्‍या उद्धट टेंपो ड्रायव्हरला काहीतरी सुनवावे म्हणून काच खाली घेऊन मी खिडकीशी तोंड आणले. तेवढयात कार पुढे घुसली आणि माझी खिडकी टेंपो ड्रायव्हरच्या खिडकीजवळ आली. त्या ड्रायव्हरला “साले, अकल नही है क्या? ऐसे गाडी चलाता है!” एवढे तरी बोलावे म्हणून मनातल्या मनात तयारी केली आणि डाव्या बाजूला नजर टाकली. हैराणच झालो! समोर काय पहातोय याच्यावर विश्वासच बसेना.

एक पंचविशीतली मुलगी टेंपो चालवत होती. दिसायला सुंदर होती. अंगात ग्रे कलरचा साधारण सकाळ सकाळी जॉगिंगला घालतात तसा राऊंड नेकचा टीशर्ट होता. श्रीमंत घराण्यातली असावी. चेहर्‍यावरच्या एकूण आटिट्यूडवरून तरी तसे वाटत होते. तिच्या बाजूलाच अजून एक मुलगी जीव मुठीत धरून बसली होती.

कार ड्रायव्हरने अॅक्सिलेटरवर पाय ठेवला आणि झटक्यात टेंपो मागे पडला. टेंपो ड्रायव्हरच्या सीटवर मुलगी पाहिल्यावर मी आणि माझा कार ड्रायव्हर दोघेही गार झालो. मग तिला शिव्या कसल्या देतोय! कारच्या आरशात मागून टेंपो येत असलेलं दिसत होतं. तो आमच्या मागूनच येत राहिला. अगदी ओव्हरटेक करायचा चान्स असूनही तो पुढे गेला नाही. थोडया वेळात हॉटेल आले. आमची कार डाव्या बाजूला वळली. शिट्टी वाजवत पार्किंगचा वॉचमन धावत आला. मोकळया जागेत कार पार्क झाली आणि मागोमागच टेंपो पार्किंगमध्ये शिरला.

कारमधून उतरलो एवढयात बाजूच्या टेंपोचा दरवाजा उघडला. हातात चावी घेऊन ती मुलगी खाली उतरली. भिजलेला टीशर्ट घालून सोबत त्या घाबरलेल्या मुलीला घेऊन ही ललना टेंपो चालवत कुठे चालली होती, काही कळायला मार्ग नव्हता. दरवाजा बंद करून ती आमच्या दिशेने आली आणि काहीही कारण नसताना मला आणि ड्रायव्हरला लूक देत ती म्हणाली, “हिने पाणी अंगावर सांडले म्हणून पुढे गेलात. नाहीतर असे नसते जाऊ दिले.”

एवढी बोल्ड आणि मवालीपणा करणारी मुलगी मी आयुष्यात कधी पाहिली नव्हती. आम्ही दोघेही गप्प बसलो. तिच्याकडे निरखून बघितले. टीशर्ट ओला झाला होता. कमरेखाली टाईट जीन्स होती. डाव्या मनगटात घडयाळ होते. नखांनाही रंगरंगोटी केली होती. म्हणजे मुलगी एकदम मॉड होती. आजुबाजूंच्याची जराही दखल न घेता आमच्या समोरच तिने आपल्या केसांतून हात फिरवून घेतले. त्यांना पकडून ठेवणारा रबर बॅन्ड नीट केला आणि घाबरलेल्या मैत्रीणीला घेऊन ती हॉटेलमध्ये गेली.

मी विचारात पडलो. या मुलीच्या बाबतीत काहीतरी वेगळे होते. त्या तंद्रीतच मिसळीची ऑर्डर दिली. लगेच आली. जिभेवरची चव बाजूला ठेऊन ती खायला सुरवात केली. टेंपोवाल्या मुलीचा विचार डोक्यातून जात नव्हता. कोण असावी ही? आणि श्रीमंत आहे तर टेंपो का चालवते आहे? कार का नाही? या सगळया विचारात माझ्या समोरच्याच टेबलावर ती बसली आहे हे माझ्या लक्षातही आले नव्हते. ड्रायव्हरने मला खुणावल्यावर मी तिला पाहिले आणि नंतर अधूनमधून माझे लक्ष तिच्याकडे जायला लागले.

तिचे जेवण संपले असावे. हल्लीच्या मुली खातातच कुठे? एखादे कुरकुरे किंवा वेफर्सचे पाकिट मिळाले तरी त्यावर दिवस काढतील. त्यात भर म्हणून डायटिंगचे फॅड निघालेच आहे. फिगर आणि वजनाबाबत त्या जाम कॉन्शस असतात. वजन हा तर त्यांचा हक्काचा प्रांत आहे. ते कमी कसे करावे हे सांगणार्‍या पुस्तकांच्या हजारो प्रती वर्षाला खपतात. ग्राहक पंच्यान्नव टक्के स्त्रीवर्ग. उरलेले पाच टक्के पुरुष! ते सगळीकडे स्लीम ट्रीम इ. इ. पाहून आपल्या बायकोसाठी पुस्तक भेट म्हणून घेऊन जातात. दीडदोनशे रुपयात काही फरक पडतोय का हे पहायचा अजून एक व्यर्थ प्रयत्न!

ती उठून गेली आणि पुढच्या मिसळीची चव लागली. मुर्खाने खूप तिखट बनवली होती. पूर्ण तोंड भाजून निघाले. मग चहा झाला. आता तासाभराचाच प्रवास राहिला या आनंदात हॉटेलातून बाहेर पडलो. समोरच ती उभी होती. तशीच भिजलेली. पाऊस मात्र थांबला होता. काय व्हायचं आहे ते होऊ दे, तिच्याशी बोलायचंच असा विचार करून मी तिच्याजवळ गेलो.

“एक विचारू?”

“मला माहित आहे तुम्ही काय विचारणार आहात ते. मी टेंपो कसा काय चालवते हेच ना?”

“हो. तुम्हांला कसं माहित मी हेच विचारणार आहे?”

“सगळया गोष्टी तोंडानेच स्पष्ट बोलाव्यात असे थोडीच आहे? समजतं ते!”

“हंऽ बरोबर आहे तुमचे. मी टेंपो चालवताना कुठल्याही मुलीला पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच तुम्हांला पाहिले.”

“गेला महिनाभर चालवते आहे. सगळयांच्या नजरेत हाच प्रश्न दिसतो पण भीत भीत का होईना स्पष्ट विचारणारे पहिले तुम्हीच.”

“पण टेंपोच का?”

“त्याची खूप मोठी स्टोरी आहे. इतक्यात नाही सांगून व्हायची.”

“मला ऐकायला आवडेल. ऑफकोर्स… इफ यू डोंट माइंड.”

मी खिशातून माझे व्हिजीटींग कार्ड काढले आणि तिला दिले. तिने ते घेऊन त्यावरचे नावही न बघता जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊन दिले. कार्ड घेताना ते अदबीने घ्यावे, समोरचा माणूस- ज्याने कार्ड दिले आहे, तो असेपर्यत तरी ते व्यवस्थित हाताळावे या कार्पोरेट एटीकेट्स बहुधा तिला माहित नसाव्यात.

तिला बाऽय करून मी कारमध्ये बसलो. कार बरीच पुढे निघून आली तरी मागे टेंपो दिसला नाही. आरशात दिसत नाही म्हणून मागे वळून काचेतून पाहिले तरी त्याचा पत्ता नव्हता. उगाच अस्वस्थ व्हायला लागलं म्हणून तो नाद सोडून दिला आणि खिडकीतून बाहेर नजर लावली.

पुण्यात पोहोचलो. माझे वेंडर व्हिजिटचे एक छोटेसे काम होते, ते झाले. दुसर्‍यादिवशी एक मिटींग होती. एक तासाचीच. त्यासाठी हॉटेलवर रहायला लागले. मुंबईला जाऊन परत दुसर्‍यादिवशी पुण्याला येणं अवघड नव्हतं. पण उगाच धावपळ आणि त्रास नको म्हणून तो बेत रद्द केला. गुपचूप हॉटेलवर जाऊन टीव्ही ऑन केला. चॅनलना तोटा नव्हता. संध्याकाळी त्या मुलीचा फोन येईल असे वाटत होते, पण आला नाही.

दुसर्‍या दिवशीची मिटींग संपली. मी मुंबईला परत आलो. रोजच्या ऑफिसच्या कामाला लागलो. त्या मुलीचा विचार मात्र डोक्यातून जात नव्हता. दोनचार दिवस फोन येईल असे वाटले होते पण आलाच नाही. त्यावर जवळजवळ महिना लोटला. प्रवासातला तो ठळक प्रसंग डोक्यातून काहीसा पुसट झाला.

…आणि अचानक एकदिवशी ऑफिसमध्ये माझ्या नावाचे कुरियर आले. घाईघाईने पाकिट उघडले, पत्राला मायना वगैरे काहीच नव्हता. लिहीणारा स्ट्रेट फॉरवर्ड असावा. डायरेक्ट मुद्दा! मी हादरलोच.

नमस्कार…मी तुम्हांला भेटलेली टेंपोवाली.

मी मॅरिड आहे. कौस्तुभ माझा नवरा. सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. चांगल्या कंपनीत नोकरीला आहे. मुंबईत स्वत:चे घर आहे. तो ब्राम्हण आणि मी मराठा. लग्नाला त्याच्या घरातून विरोध म्हणून पळून जाऊन लग्न केले. आता इथे दोघेच रहातो. दोन महिन्यापूर्वी ऑफिसला जाताना त्याच्या बाईकचा अपघात झाला. पाय फ्रॅक्चर झाला, त्यावर प्लास्टर चढले आणि डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.

मी बीकॉम आहे. नोकरी करायची खूप हौस होती. पण नोकरीचा विषय काढला की कौस्तुभ काही गरज नाही, नोकरी आणि बॉसला सांभाळण्यापेक्षा माझ्याकडे लक्ष दे असं म्हणायचा. म्हणून नाईलाजाने मी नोकरी शोधणं बंद केले.

घराचा महिन्याचा इएमआय आणि चांगली लाईफस्टाईल यासाठी पैसे तर हवे होते. इलाज नव्हता म्हणून सुट्टी घेऊन तो घरी बसलेला. पगारी रजा होती पण मलाही काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागलं. जीव गुदमरु लागला. महिनाभर त्याच्याकडे खूप लक्ष दिलं पण फक्त तेवढयावर मन स्वस्थ बसू देईना. मला करता येण्यासारखे एक आवडीचे काम होते. बराच विचार केला, मनात काहीतरी निर्णय घेतला आणि शेजारच्या बिल्डींगमधल्या ओळखीच्या काकांना जाऊन भेटले. त्यांचा ट्रान्सपोर्ट बिझनेस होता.

त्यांनी विश्वास दाखवला आणि टेंपोची चावी मिळाली. रोज मुंबई- पुणे- मुंबई आहे. सकाळीसकाळी घरचं आवरून बाहेर पडते. पैसा मिळवणे हा पहिला मुद्दा. हो, उगाच खोटं का बोला? आणि थ्रील अनुभवायचे दुसरा. माहेरी असताना गाडया चालवायची फार आवड होती. घरी स्वत:चा टेंपो आणि ट्रॅक्टर होते. बाबांच्या नकळत मी ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला विश्रांती देऊन ट्रॅक्टरदेखील चालवायचे. तशी अभ्यासात मी सोऽ सोऽ च होते. पास होण्यापुरता अभ्यास करायचे. पण इतर गोष्टी आणि खेळात नेहमी पुढे असायचे. या महिन्याभरात मला एक गोष्ट जाणवली, मी टेंपो चालवताना दिसल्यावर बर्‍याचजणांच्या भुवया उंचावतात. असे का? बाईची जात म्हणून त्यांनी आपल्या कक्षेच्या बाहेर कधी जायचेच नाही? आम्हांला आमची स्वत:ची अशी आयडेंटी बनवता येत नाही का? सगळयाच ठिकाणी नुसते पुरुषच का? माझीही कमाल आहे! हे सगळे मी तुम्हांला- एका पुरुषालाच सांगते आहे. याचे उत्तर कदाचित तुमच्याकडेही नसेल.

आता कौस्तुभ ठणठणीत झाला आहे. म्हणजे माझं टेंपो चालवणं बंद होणार! तो काही केल्या ऐकणार नाही. परवाच झालं एवढं बस झालं म्हणाला. कुणालातरी सांगावसं वाटलं म्हणून पत्र लिहीलं. स्वत:च्या एजग्रुपच्या किंवा आपल्याला समजून घेऊ शकतील अशा मैत्रीणीच नाहीत. बिल्डींगमध्ये माझ्या वयाच्या काहीजणी आहेत पण व्हेवलेंथ जुळण्यासारख्या नाहीत. असो! खूप बोलले. काय करणार? स्वभावाला औषध नाही. तुम्ही फोनची वाट पाहिली असेल पण एकाच भेटीनंतर फोन करणे मला प्रशस्त वाटले नाही. तुम्ही एवढया आपुलकीने विचारले होते म्हणून हा सगळा लिहीण्याचा खटाटोप केला. गैरसमज नसावा.

खरोखर ही मुलगी म्हणजे बाप होती. एका झटक्यात जमिनीवर आणले! पत्रावर आणि पाकिटावर कुठेही नंबर, नाव किंवा पत्ता नव्हता. कुरियरवालाही ते पाठवणारा आणि घेणारा यांचा पूर्ण पत्ता आणि पिनकोड असल्याशिवाय पाकिट घेत नाही. तोदेखील तिच्या ओळखीचा असावा.

मी ते असामान्य पत्र नीट घडी करून बॅगेत ठेवले आणि मनातल्या मनात तिच्या बिनधास्तपणाचे कौतूक करत पुढच्या कामाला लागलो.

©विजय माने, ठाणे.

वर्क फ्रॉम होम

1

सगळ्या जगात कोरोनाने थैमान घातले होते. टीव्हीवर ढीगभर बातम्या दाखवल्या जात होत्या, खूप अर्जंट असेल तरच घराबाहेर पडा असे मुख्यमंत्री वेळोवेळी आवाहन करत होते पण बर्‍याच कंपन्या काही केल्या वर्क फ्रॉम होम देत नव्हत्या. परिणामी लोकांची गर्दी मात्र कमी व्हायला मागत नव्हती. ट्रेन भरभरून लोक ऑफिसला जात होते. ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे ऐन मार्चमध्येच हा योग जुळून आला होता.

शेवटी सगळी मुंबई एकतीस मार्चपर्यंत बंद करायची असा सरकारचा आदेश आला आणि मग सर्वांबरोबर सुजितलाही वर्क फ्रॉम होम मिळाले. चार बॅचलर लोकांनी घेतलेल्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुजित रहात होता. तिघे सुट्ट्या टाकून आधीच गावी पळाले होते. सुजितला मात्र गावी जाणे शक्य नव्हते. नाईलाजाने त्याने लॅपटॉपवर लॉगिन केले आणि तो कामाला लागला.

गळ्यात आयकार्ड नाही, ट्रेनमधला प्रवास, रोजचा स्वाईप, चहाची पॅन्ट्री, रोज भेटणारे दोस्त, गेटबाहेरची सिगरेट आणि वडापाव व रोजचे ऑफिसचे गजबजलेले वातावरण हे सारे तो मिस करत होता. दुपारी चारला लंडनवरून एक कॉल होता त्याचा डेटा बनवायच्या तयारीला तो लागला. कामाच्या नादात साडेतीन कधी वाजले त्याला समजलेच नाही. यापुढे निवांत जेवण करणे त्याला जमणार नव्हते म्हणून त्याने भाताचा कुकर लावला आणि चार वाजता व्हर्चुअल मिटींगमध्ये तो जॉईन झाला.

जगाच्या चार कोपर्‍यातून चारजण कनेक्टेड आहेत, महत्वाची चर्चा चालली आहे आणि अचानक साक्षात वाफेवर चालणार्‍या रेल्वेने शिट्टी द्यावी तशी शिट्टी सुरु झाली. बाकीच्यांनी दुर्लक्ष करून तसेच डिस्कशन चालू ठेवले पण नंतर नंतर क्लायंट काय बोलतोय हे कुणालाच कळेना म्हणून कॉल तसाच चालू ठेऊन सगळेजण शांतपणे ती शिट्टी संपण्याची वाट पाहू लागले. शिट्टी थांबायचे नाव घेईना. मग सुजित एका मिनीटात आलो म्हणून उठला आणि शिट्टी बंद झाली.

“आय एम सॉरी…” परत जागेवर येऊन बसत सुजित बोलला.

सगळे डिस्कशन संपले आणि कॉल संपवता संपवता शेवटी लंडनच्या ऑफिसमधून लाईनवर असलेल्या अभिषेकने विचारले, “बाय द वे, सुजित वो क्या था?”

“सॉरी सर? मै कुछ समझा नही-”

“इंडिया मे चार बजे थे…और वो टाईम पे इतनी लंबी सीटी?”

“दाल खिचडी सर! मेरा लंच!”

#WorkFromHome

थोडेसे महत्वाचे –

आजकाल तोंडाशी आलेल्या कोरोनाच्या संकटावर लोकांनी काय करावे हे बरेचजण सांगताहेत. पण खरोखर ही वेळ क्रिटीकल आहे. या वेळेत तुम्ही ऑफिसला गेलाय म्हणून देशाची पडलेली इकॉनॉमी एका दिवसात सुधारणार नाही हे लक्षात घ्या. कोरोनाचे संकट टळल्यावर जे काही दिवे लावायचे आहेत ते लावा. दिवसरात्र ऑफिसमध्ये थांबलात तरी चालेल पण सध्या मात्र घराबाहेर पडू नका. स्वत:ची काळजी नसेल तर निदान दुसर्‍यांची तरी करा.

त्यापेक्षा या अचानक मिळालेल्या सक्तीच्या मोकळ्या वेळेत आयुष्यात आपले कोणते छंद पूर्ण करायचे राहून गेलेत याचा आढावा घ्या. चित्रे काढा, पुस्तके वाचा, फोटोंचे जुने अल्बम बघा, घरच्यांसोबत वेळ घालवा. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ – अगदी लुडोही खेळा. घरचेही लोक तसे चांगले आहेत याचा अनुभव घ्या. दुपारच्या जेवणानंतरची झोप कशी असते ते पहा. तुम्ही घराबाहेर न पडल्यामुळे तुम्ही तर संसर्गापासून वाचालच पण बाकीचे किती लोक वाचतील याचाही जरा विचार करा.

पण ही सुट्टी पाट्र्या करण्यासाठी, मित्र, नातेवाईक यांना भेटण्यासाठी, सकाळसकाळी गर्दीत जाऊन वॉक करण्यासाठी, पिकनिकसाठी नाही हे मात्र पक्के लक्षात असू द्या. इटली आणि स्पेनमधल्या लोकांनी त्यांच्या सक्तीच्या सुट्ट्यांचा उपयोग याच गोष्टींसाठी केला होता. त्यांचे काय होतेय हे आपण बातम्यांमधून पहातोय. तेव्हा घरीच रहा आणि कोरोनाला रोखा. आर्मीसारखे आपण सीमेवर लढत नाही आहोत पण खरोखर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची ही संधी चालून आली आहे, ती वाया घालवू नका!

©विजय माने, ठाणे.

 

वास्तव

12

आजुबाजूला बर्‍याच लोकांचे आवाज येत होते. बहुतेक ते कॉरिडॉरमधून येत असावेत. जवळजवळ सगळे अनोळखी होते. एक मात्र ओळखीचा होता, आशिषचा. तो कुणाशी बराचवेळ काहीतरी बोलत होता, पण त्याचा संदर्भ लागत नव्हता. मला आजुबाजूच्या हालचाली समजत होत्या पण डोळे उघडता येत नव्हते. नाकात फिनाईलच्या वासाबरोबर साधारण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असतो तसा एक विशिष्ठ प्रकारचा वास हाता.

थोड्यावेळाने माझ्या हातावरून कुणीतरी खूप प्रेमाने हात फिरवल्यासारखे वाटले. भास! पुन्हा एकदा तसेच झाल्यावर मात्र मी डोळे उघडायचा प्रयत्न केला पण काही केल्या ते उघडतच नव्हते. त्यानंतर तो प्रेमळ हात माझ्या डोक्यावर गेला आणि प्रेमाने लहान मुलांचे केस कुरवाळावेत तसा लाडिवाळपणा माझ्या केसांशी झाला.

शेवटी अंगात होती नव्हती तेवढी शक्ती एकवटून खूप प्रयासाने डोळे उघडले तरीही समोर काहीच दिसले नाही. पण मी कुठल्यातरी हॉस्पिटलच्या रुममध्ये होतो तेवढे मात्र समजले. खोलीतल्या ट्युबलाईटचा उजेड डोळ्यांना सहन होत नव्हता. मांजरासारखे किलकिले डोळे करून मी आजुबाजूचा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण खूप थकलो असल्याने पुढचे काहीच आठवले नाही. नंतर एका ऑथॉरेटिव्ह आवाजाने मी शुद्धीवर आलो, “आता कसे वाटतेय समीर?”

मला सारे काही ऐकू येत होते पण बोलावेसे वाटले तरी तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते. मग डाव्या दंडावर काहीतरी टोचल्यासारखे झाले, बहुतेक ते इंजेक्शन असावे. रुममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली.

“डॉक्टर, किती वेळ लागेल अजून?” आशिष डॉक्टरांना विचारत होता.

“मी इंजेक्शन दिलेय. अजून अर्धा पाऊणतास झोपू दे त्याला. बरे वाटेल मग.”

कितीवेळ झोपेत होतो देवालाच ठाऊक, पण नंतर जाग आल्यावर मात्र थोडे बरे वाटले. डोळे उघडून पाहिले तर समोरच आशिष चेहरा पाडून बसला होता. मी शुद्धीत आल्यावर तो एकच वाक्य बोलला, “आय एम सो सॉरी समीर.”

मी गप्प राहिलो. आता भेटणारा प्रत्येकजण माझे सांत्वन करणार होता आणि मला त्याची सवय करून घ्यायला लागणार होती. खरे म्हणजे मला स्वत:ला आर्याच्या धक्क्यातून सावरणे खूप कठीण जात होते. मी नेमका कुठे होतो आणि मला काय झाले होते याची मात्र मला काहीच कल्पना नव्हती.

“आशिष, मी कुठे आहे आणि मला काय झालेय?”

“तू ना, खूप मोठे कांड केले आहेस आमच्या जीवाला घोर लावून. तुला इथे हॉस्पिटलमध्ये काही बोलत नाही. घरी चल, मग सांगते.”

तिचा चेहरा पहावा म्हणून मी वळून पाहिले. डोळ्यांत पाण्याचे तळे घेऊन ती माझ्या मागे उभी होती. भूत दिसल्यासारखे मी तिच्याकडे पहातच राहिलो आणि काही समजायच्या आत तिने मला घट्ट मिठी मारली. मला पुन्हा चक्कर येते की काय असे वाटू लागले. मी आर्याच्या मिठीत होतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. परफ्यूम आणि तो सुगंध! नो डाऊट, तिचाच होता तो! मी स्वप्न पहातोय की जागेपणी तिचा असा भास होतोय ते मला कळत नव्हते. मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला, तरीही काही समजेना. म्हणून तशा परिस्थितीतही मी तिला चिमटा काढला. “आऊच!” म्हणत तिने जोराचा पंच दिल्यावर ती खरी आर्या आहे याची मला खात्री झाली.

मी वेड्यासारखा आशिषकडे पहायला लागलो.

“आर्या?” अजूनही माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ती आर्याच आहे ते पटवून देण्यासाठी मला किमान एका साक्षीदाराची गरज वाटत होती.

“हो. आर्याच आहे ती.”

“मग मला सॉरी का म्हणालास थोड्यावेळापूर्वी?”

आशिष बाजूलाच राहिला आणि माझ्यापासून बाजूला होत आर्यानेच माझा क्लास घ्यायला सुरवात केली, “तू चेन्नईवरून आल्यावर किती झोपेच्या गोळ्या घेतलेल्यास?”

“झोपेच्या गोळ्या?”

हे लोक मला वेडा वगैरे समजत होते, मला वेडा बनवायचा त्यांचा प्लान होता की माझ्याच डोक्यात काही केमिकल लोच्या झाला होता ते समजायला मार्ग नव्हता.

“हो. झोपेच्या गोळ्या.”

“मी कशाला झोपेच्या गोळ्या घेईन?”

“आम्हांला काय माहित? आम्हांला विचारून थोडीच घेतल्या होत्यास?”

मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

“एक मिनीट…एक मिनीट थांबा जरा. लेट मी रिमेंबर! स्टडी टेबलवरची ती बॉटल झोपेच्या गोळ्यांची होती आशिष?”

“अरे पण सुशिक्षित आहेस ना तू? गोळ्या घेताना त्या वाचून तरी घ्यायच्यास? आणि विदाऊट प्रिस्क्रिप्शन तुला कुठे मिळाल्या त्या?”

“ती खूप मोठी स्टोरी आहे. नंतर सांगेन कधीतरी.”

“नाही. मला आत्ताच ऐकायची आहे.”

“आपण मध्यंतरी बोलत नव्हतो त्यावेळी सुब्रतोने त्याच्या भावाच्या मेडिकलमधून आणून दिलेल्या. रात्रभर झोपच यायची नाही म्हणून घेत होतो. थोड्या शिल्लक राहिलेल्या. पण मी ती बॉटल फ्रीजवर ठेवली होती. बाहेर स्टडी टेबलवर कशी आली?”

“ती जागा आहे अशा गोळ्या ठेवायची? कसा रे तू असा वेंधळा? आणि काम झाल्यावर त्या टाकून द्यायच्या ना? की मला लग्नाआधीच विडो बनवायचा प्लान होता तुझा?”

च्यायला! डोक्यात माझा लग्नाआधी विधूर झाला होता त्याचे हिला काही पडले नव्हते. पण झालेल्या सगळ्या प्रकरणामुळे माझी कीव वाटल्याने आशिष समोर येत म्हणाला, “यार! ही सगळी माझी चूक आहे.”

“आता तुझे आणि काय मध्येच? मला नक्की काय झाले होते ते कुणीतरी सांगाल का प्लीज?”

“तू चेन्नईवरून यायच्या आदल्याच दिवशी मी घराची बरीच साफसफाई केली आणि किचन साफ करताना फ्रीजवरची ती गोळ्यांची बाटली- जिथे आपल्या कॉमन टॅब्लेट्स असतात तिथे स्टडी टेबलवर ठेवलेली – नेमकी तिथेच विसरलो. माझ्यामुळेच हा सगळा घोटाळा झाला.”

“ओह आय सी! किती गोळ्या होत्या त्यात?”

“तू किती घेतल्यास?”

“नाही यार आठवत! अंग दुखत होते म्हणून घेतलेल्या मी. पण मग पुढे काय झाले आणि मला इथे कोणी आणले?”

मग खरे कांड काय झाले होते ते त्या दोघांकडून समजले. ऐकल्यावर तर अंगावर काटाच आला.

मी रात्री चेन्नईवरून येऊन जे झोपलो ते उठलोच नाही. दुसर्‍यादिवशी कुठे भेटायचे ते ठरवायला सकाळसकाळी आर्याने फोन केला. पण मी उचलला नाही. सुट्टीच्या दिवशीही मी जास्तीजास्त साडेदहा अकरापर्यंत झोपायचो. दोनतीन दिवसांच्या सततच्या प्रवासामुळे मी कदाचित सुट्टी घेतली असेल म्हणून तिने त्यानंतरही फोन ट्राय केला तरीही माझ्याकडून नो रिसपॉन्स! शेवटी थकून ती थेट आमच्या फ्लॅटवरच आली. दारावरची बेल, दरवाजा – दोन्ही वाजवून झाले, माझ्या नावाने हाका मारून झाल्या पण काही उपयोग झाला नाही. दरवाजाबाहेरून कॉल केल्यावर आतून रिंगटोनचा आवाज येत होता पण मी पण मी दरवाजा उघडत नव्हतो. मग मात्र काहीतरी विपरीत घडल्याची तिला शंका आली आणि तिने आशिषला फोन केला. त्यावेळी नागपूरला असलेला आशिष संध्याकाळपर्यंत परत येणार होता. सगळा सीन ऐकल्यावर त्याने अर्जंसीसाठी सोसायटीमधल्या मित्राकडे ठेवलेली फ्लॅटची चावी घेऊन दरवाजा उघडायला सांगितले.

सुदैवाने तो मित्र घरीच होता. आर्याने त्याच्या मदतीने दरवाजा उघडला तर मी गाढ झोपलेलो. हाका मारून पाहिल्या पण माझे लक्षण ठीक दिसत नव्हते. म्हणून त्यांनी बिल्डिंगमध्येच रहाणार्‍या एका डॉक्टरांना बोलवले. मला चेक करत असताना स्टडी टेबलवरची स्लिपिंग पिल्सची बाटली दिसल्यावर एकंदरीत काय झाले असावे याचा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी मला तातडीने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यास सांगितले.

मग आर्याने धावपळ करून तिच्या फॅमिली डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केले. आशिष पोहोचायला संध्याकाळ झाली. दिवसभर माझ्या फोनवर बॅनर्जीचे फोन येत होते, पण आर्याने इमर्जन्सीमुळे ‘समीरला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे आणि ऑफिस जॉईन करायला त्याला किमान चार दिवस तरी लागतील असा मेसेज पाठवला. घरचा आईचा फोन आला तर उगाच तिला काळजीत टाकायला नको म्हणून, “आम्ही बाहेर पिकनिकला आलोय आणि उद्या समीर तुम्हांला नक्की फोन करेल.” असे सांगितले. ती म्हणजे बॉर्न प्लानर होती. तिला फक्त टास्क सांगायचा. लगेच तिच्याकडे प्लान तयार असायचा, बॅकअप प्लानसह! हे निरोप आणि हॉस्पिटलमधली माझ्यासाठीची धावपळ करताना बिचारी थकून गेली होती. तरीही सार्‍या गोष्टी तिने व्यवस्थित हँडल केल्या होत्या.

ती पुन्हा माझ्या बेडवर बसत म्हणाली, “अजूनही तुझे अंग दुखतेय? आशिष, थोडावेळ बाहेर जातोस का प्लीज? मी जरा याच्याकडे पाहते!”

तिने आशिषला डोळा मारलेला माझ्या लक्षात आले. तिच्या तावडीत मला एकट्याला सोडून तो ही लेकाचा बाहेर जायला निघाला. आर्याचे लक्षण ठीक दिसत नव्हते म्हणून मीच त्याला म्हणालो, “आशिष, डॉक्टर किंवा कोणीतरी येतील त्यांच्यावर लक्ष ठेव, ही वेडी आहे. यू नो वॉट आय मीन.”

आशिष हाताने थम्सअप करून मला डोळा मारत बाहेर गेला. त्या दोघांनाही आम्ही कुठे आहे आणि काय करतोय याचा जरादेखील सिरीयसनेस नव्हता. तो बाहेर गेल्याची खात्री झाल्यावर आर्या माझ्याजवळ आली, “सम्या, आय एम गोईंग टू किल यू नाऊ! तुला काही विचार असतो की नाही मागे मी आहे याचा?”

“अगं, पण मला समजलेच नाही की ती झोपेच्या गोळ्यांची बॉटल आहे.”

“तुला काही झालं असतं तर?”

“काही नाही होणार मला.”

“माझी अवस्था तुला नाही कळणार! किती घाबरलेले मी. अक्षरश: थरथरत होते तू शुद्धीवर येईपर्यंत.”

“आणि तुला कुठे माहित आहे माझी अवस्था काय झालेली ते! माझ्या डोक्यात एक भयंकर पिक्चर चालू होता.”

“काय?”

“जाऊदे. विचार करायलाही नको वाटतेय यार.”

“सांग ना-”

“तुझा अॅक्सिडेंट झालाय असे पहात होतो मी.”

“अच्छा! म्हणजे अपघातात मला मारायचा विचार आहे का तुझा?”

“सांगताही येणार नाही काय काय पाहिले! सारेच हॉरिबल होते!”

“रिअली?”

“मग काय! मी तुझ्याशिवाय कसा जगू शकलो असतो माहित नाही!”

“ऐक ना, रेडी आहेस तू?”

“कशासाठी?”

मला काही समजायच्या आत तिचे ओठ माझ्या ओठांवर टेकले आणि तिने एक जोराचा चावा घेतला.

“अगं काय करतेयस तू?”

“तू मला खूप त्रास दिला आहेस. त्याचा हा छोटासा बदला.”

“पण इथे हॉस्पिटलमध्ये?”

“अचानक कोण येईल त्याची काळजी तू करू नकोस. आशिष इज ऑन द डोअर!”

तिच्या या आक्रमक पवित्र्याने हैराण होऊन मी बेडवर बसलो आणि माझे डोके आपल्या छातीशी कवटाळून माझ्यावर अश्रूंचा अभिषेक करता करता अचानक ती हळवी झाली. आयुष्यात एवढे उत्कटपणे प्रेम करणारे आपल्याला कुणीतरी मिळाले म्हणून मी ही भावूक झालो आणि डोळ्यांत पाणी तरळले.

“सम्या, आता तुला रडायला काय झालेय?”

“तुला गमवायची खूप भीती वाटलेली.”

“शोना, मलाही तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे आता. या दोन दिवसांत ते कळून चुकलेय मला.”

“मग आता काय करायचे?”

“सध्या तरी हे…” म्हणत तिने डोळे मिटले आणि अत्यंत आवेगाने पुन्हा माझे चुंबन घेतले. त्यावेळी मात्र कोणताही प्रतिकार न करता तिला कसलीही इजा होणार नाही याची काळजी घेत मी चुंबनाच्या बाबतीतला माझाही अनुभव किती विस्तारलाय हे दाखवून दिले. आम्हा दोघांनाही हवाहवासा तो क्षण कधीच संपू नये असे वाटत होते. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत धुंद होतो आणि बाजुलाच असलेल्या एका ट्रॉलीवर आर्याने माझ्यासाठी आणलेली एका नवोदित लेखकाची ‘तुझ्याविना’ ही कादंबरी आमच्याकडे चोरून पहात गालातल्या गालात हसत होती.

समाप्त.

मनोगत

हुश्श! झाले बाबा एकदाचे! आता सगळेजण खुश ना? अरे किती प्रेशर करायचे एखाद्यावर? तीन चार दिवस झोप नाही मला! असो, ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल! नऊ महिन्यानंतर प्रसवलेल्या आईची जी मनस्थिती असते, अगदी तशीच मनस्थिती या क्षणाला माझी आहे. जूनमध्ये मी ‘तुझ्याविना’ लिहायला सुरवात केली होती. त्यानंतरचे हे सात महिने खूप मंतरलेले होते. माझे बहुतांश लेखन विनोदी आहे. पण प्रतिलिपीवर लिहायला लागल्यापासून मी ती मर्यादा मनातून काढून टाकली. माझे लेखन वाचून वाचकाचे पहिले पत्र यायला मला बारा वर्षे वाट पहावी लागली होती. दिवाळी अंकातल्या एका व्यक्तिचित्राचा रिव्ह्यू त्या वाचकाने लिहीला होता. त्यांचे पत्र हातात आल्यावर मला आभाळ ठेंगणे झालेले. लिखाणावर एवढ्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया पूर्वी मिळायच्या नाहीत. पण प्रतिलिपीने हे सर्वव्यापी व्यासपीठ उघडून लेखक आणि त्याचबरोबर वाचकांवरही खूप उपकार केले आहेत.

इथे लिहून प्रकाशित करायचा अवकाश की लगेच प्रतिक्रिया येतात. कोणत्याही लेखकासाठी वाचकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात. म्हणून वाचकांना एक नम्र विनंती, तुम्ही एवढा वेळ काढून कुठल्याही लेखकाचे जे लेखन वाचता आहात, त्यावर थोडी तरी प्रतिक्रिया लिहा. तुमच्या प्रतिक्रिया वाचून लेखकाला खूप आनंद होतो. तुमचे रिव्ह्यूज खर्‍या अर्थाने लेखकांचे बुस्टर्स असतात. ते लेखकांना लिहीते ठेवतात. पण प्रतिक्रियाच येत नसतील तर बरेच नवोदित लेखक आपले लेखन कुणालाही आवडत नाही असा समज करून घेऊन लिहायचे कमी होतात. त्यांना लिहीते करण्याची जबाबदारी आपलीच आहे ना? त्याशिवाय ते चांगले साहित्य कसे लिहीतील?

तुम्ही समीर आणि आर्यावर किती प्रेम करता ते खर्‍या अर्थाने मला तेहतीसावा भाग लिहील्यावर समजले. कुणाला आर्याचे असे अचानक जाणे अजिबात पटले नाही, त्यांनी तसे स्पष्ट सांगितले. काही वाचक माझ्यावर रुसले. काही रागावले. पुढचा भाग वाचा म्हटल्यावर “आर्या गेल्यावर आता काय वाचायचे आहे?” अशी त्यांची चिडचिड झाली. बर्‍याच वाचकांनी पर्सनल मेसेज करून “आर्याला परत आणा नाहीतर यापुढे मी तुमची कथा वाचणार नाही.” अशा प्रेमळ धमक्याही दिल्या. तरीही काही चतूर वाचक खूप आशावादी आहेत. आर्याचे काय करायचे त्याबद्दल स्वत: मी कन्फर्म नव्हतो, पण तिला काहीही होणार नाही अशी त्यांची ठाम खात्री होती. खरोखर धन्य आहात तुम्ही!

या कथेत, विशेषत: तेहतीसाव्या भागात मी तुम्हांला खूप रडवले त्याबद्दल सॉरी! माझ्या लेखनाची ती एक कसोटी होती. आणि मला खरोखर ती टेस्ट द्यायची होती. त्यात मी कितपत यशस्वी झालोय हे तुम्हीच सांगू शकाल. आय होप, तुम्हांला ही कथा आवडली असेल. आवडली असेल तर वाचण्यासाठी मित्रांना नक्की रेकमंड करा. आणि शेवटी सांगायचे म्हणजे तुमचे माझ्यावरचे प्रेम असेच राहू द्या! प्रतिलिपीवर माझी ओळख बनवण्यात तुमचा व्यक्तिश: वाटा आहे, त्यामुळे प्रत्येक वाचकाचे मनापासून आभार! शेवटी सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे! तुटलेले नाते जोडताना जीवाचा आटापिटा करण्यापेक्षा ते नाते मुळातच तुटू नये याची काळजी घ्या. एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि पार्टनरच्या स्वभावातील वेगळेपणा एन्जॉय करायला शिका म्हणजे वेगळा ‘व्हॅलेंटाईन्स डे’ सेलिब्रेट करण्याची आवश्यकता वाटणार नाही.

तुमचाच,

विजय माने, ठाणे.

होली टेल्स

1

मुंबईत रंगपंचमीची चाहूल पंधरा दिवस आधीच लागते. घरात शोलेतल्या गब्बरसिंगसारखा “कब है होली?” हा बंड्याचा प्रश्न जेरीस आणतो. त्यानंतर सोसायटीच्या आवारात एकमेकांवर पाण्याने भरलेल्या पिशव्या फेकायला सज्ज असलेले बालसैनिक आणि त्यांच्या वेगवेगळ्या गटांवरील हल्ले पाहिल्यावर लवकरच होळी आहे याची जाणीव होते. त्यानंतर सोसायटीच्या आवारात प्लास्टिकच्या फुटलेल्या पिशव्यांचे अवशेष दिसायला लागतात. अगदीच दुर्भाग्य असेल तर एखादी पिशवी आपल्यावरही फुटते.

सोसायटीच्या आवारात कोण जाणता माणूस शिरला की एफबीआय किंवा सीआयएची टीम ज्याप्रमाणे वायरलेस कम्यूनिकेशनने बाकीच्या सेक्यूरिटी एजंटना सावध करते त्याप्रमाणे हे छोटे लोक एकमेकांना, “थांबा थांबा, पाटील काका आले आहेत. आता काही दंगा करू नका नाहीतर लोच्या होईल.” असा संदेश देत सावध करतात.

सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली असली तरी त्या नेमक्या कोणत्या दुकानात मिळतात याची गुप्त माहिती पालकांना नसली तरी छोट्या मुलांना असते. अतिउत्साहात हे लोक “काका, पिशव्या आहेत का संपल्या?” असे ओरडून विचारल्यावर दुकानदाराचे धाबे दणाणतात.
“जरा रस्त्यावर जाऊन ओरड, नाहीतर थोडे पुढे गेल्यावर पोलिस स्टेशन आहे तिथूनच ओरड!”
“सॉरी काका. आहेत ना?”
“पप्पांना घेऊन ये, मग देतो.”
या पिशव्या कुणालाही मिळत नाहीत. वातावरण गंभीर आणि कॉम्पिटीशन टफ असल्यामुळे दुकानात केवायसी झाल्यानंतरच पिशव्या मिळतात आणि मुलगा खुश होतो.

आदल्यादिवशी “रंग खेळायला उद्या सकाळी सातला खाली जाणार आहे!” म्हणून बंड्याने डोके उठवले होते. सातला मी सोडेन की नाही याबद्दल त्याला शंका होती म्हणून मित्राकडेच जाऊन राहू का म्हणून तो हिला गळ घालत होता. कारण दिवाळी आणि रंगपंचमीच्या आदल्या रात्री मित्र रात्रभर टीव्ही पहात बसतो आणि सकाळसकाळी लवकर खाली जातो हे कारण सांगितले जात होते. पण आता लवकर झोपलास तर उद्या सकाळी सातला खाली पाठवतो असे म्युच्यूअल अॅग्रीमेंट झाल्यावर तो शांतपणे झोपी गेला. बरोबर सात वाजता दरवाजावरची बेल वाजली. रंग खेळायला खाली चल म्हणून बंड्याला बोलवायला त्याचे दोन मित्र आले. त्या दोघांना पाहून ते बंड्याचे मित्र आहेत की चांद्रयानावरून आलेले अंतराळवीर आहे ते समजायला मार्ग नव्हता.

म्हणजे रंगीबेरंगी कपडे, पाठीवर पाण्याने भरलेला भलामोठा सिलेंडर, हातात अवघडून धरलेली त्याची पाईप आणि हे सारे कमी की काय म्हणून जंगलातील प्राण्यांना समजू नये म्हणून जसे चित्रविचित्र रंगाचे कपडे घातले जातात तसा रंग खेळण्याआधीच त्याने केलेला चेहर्‍याचा अवतार! दुसर्‍यावर नजर वळवली तर त्याचा चेहरा काहीतरी हरवल्यासारखा झाला होता. हातात रिकामा मग घेऊन तो पॅन्टच्या खिशात काहीतरी शोधत होता. “मग कशाला घेतलास?” म्हणून विचारल्यावर “मगातले पाणी हातातल्या पंपाने ओढून ते फुग्यात भरायचे आणि एकदा फुगा भरला की मग तो दुसर्‍यावर मारायचा!” अशी माहिती मिळाली. तोपर्यंत दुसरे लोक “भर बाबा तुझा फुगा, तोपर्यंत मी थांबतो!” म्हणत वाट पहात थांबेल ही भाबडी आशा त्याच्या मनात होती. त्यापेक्षा तू मगानेच रंगपंचमी खेळ म्हणून हिने त्याला सल्ला दिला.

एकतर घातलेल्या पॅन्टीच्या चार खिशापैकी नेमक्या कोणत्या खिशात रिकामे फुगे ठेवले आहेत याचा त्याला पत्ता नव्हता. केव्हापासून तेच तो शोधत होता. त्याची फुग्यात रंग भरून तो मारायची यंत्रणा एवढी किचकट होती की ती पूर्ण होईपर्यंत त्याला त्याचे फुगे आणि मगासकट कुणीही बॅरेलातून बुचकळून काढला असता.

माझ्या रंगपंचमीच्या तशा खूप आठवणी आहेत. मुंबईत होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमी असली तरी गावाकडे ती नसते. तिथे होळीच्या दुसर्‍यादिवशी धुलिवंदन असते. सोप्या शब्दांत धुलिवंदन म्हणजे धरतीमातेला वंदन करण्याचा दिवस! जास्ती झाल्यावर रस्त्यांवर साष्टांग नमस्कार घालत पडलेल्या लोकांवरुन ते समजायला वेळ लागायचा नाही. एरव्हीही हे लोक पिऊन पडायचे पण धुलिवंदन म्हणजे त्यांचा ऑफिशियल डे! गावी होळी झाल्यावर पाचव्या दिवशी रंगपंचमी यायची. त्यादिवशी हायस्कुलला सुट्टी असायची मात्र आमच्या गावातली मराठी शाळा चालूच असायची. आम्ही हायस्कुलला असल्याने रंगपंचमीदिवशी मराठी शाळा म्हणजे आमचे टार्गेट असायचे. अर्थातच मराठी शाळेचे गुरुजी! काहीही झाले तरी गुरुजींना भिजवायचे असा प्रत्येक रंगपंचमीला आमचा प्लान असायचा.

आमच्यावेळी आताप्रमाणे रंगीबेरंगी पिचकार्‍या वगैरे भानगडी नव्हत्या. काचेच्या बाटलीत रंग बनवायचो आणि ज्याच्यावर रंग मारायचा आहे त्याच्या अगदी जवळ जायचे आणि रंग खेळायचा. बर्फाचा गोळेवाला ज्याप्रमाणे गोळा बनवून झाल्यावर त्यावर लाल, हिरवा, केशरी वगैरे रंग मारतो आणि मग गोळ्याला गोळेपण येते अगदी तसा प्रकार असायचा.

एकंदरीतच रंगपंचमीचा उत्सव म्हणजे रामायण किंवा महाभारतात भाले आणि तलवारीने लढणार्‍या ज्या मास सैनिकांचा घोळका असतो, तसा प्रकार होता. जवळ जाऊन लढायचे. आताच्यासारखे जीपीएसने निशाणा सेट करून मिझाईल स्ट्राईक करतात तशातला प्रकार नव्हता. अगदीच अॅडव्हान्स म्हणजे, सायकलला तेल घालायला वापरात येणारी बुधली म्हणजे आम्हाला साक्षात ब्रम्हास्त्र वाटायचे. बुधलीने थोड्या दूरवरून पिचकारी मारता यायची. शत्रूपक्षाकडे काचेची बाटलीच असायची. त्यामुळे स्वत:कडे बुधली असल्यावर ब्रम्हास्त्र बाळगत असल्याचा इगो असायचा. ज्याच्या हातात बुधली आहे त्याच्यापासून सारेच लांब रहायचे.

त्यानंतर या क्षेत्रात अचाट क्रांती झाली. पिचकार्‍या वगैरे आल्या. त्यानंतर सिल्व्हर कलर! मुर्त्यांना लावायचा रंग कुठल्यातरी महाभागांनी लोकांच्या तोंडाला लावायाला उपलब्ध करून दिला. सगळे लोक तोंडाला सिल्व्हर कलर लावून गावात हिंडायला लागल्यावर साक्षात राक्षससेना गावात उतरल्याचा भास होत असे.

आपण चकाचक पांढरे कपडे घालून होळी खेळणार्‍या लोकांपासून बचून राहू असा बर्‍याच लोकांचा जसा गैरसमज असतो तसेच रंगात भिजलेले अशा कोरड्या माणसाला पाहून “जा, जा तुला काहीही करणार नाही.” म्हणून सांगणारेही काही कमी नसतात. ते काही करत नाहीत पण बोटाने खुणावून ‘गिर्‍हाईक आले आहे-’ अशी सुचना दिली गेलेली असते. आमच्या गावी तर चौकात रंगाचा एक बॅरेल ठेवलेला असायचा. बिनारंगाच्या माणसाकडे तो एलियन असल्यासारखे पहायले जायचे. तिथून कोणीही – अगदी कोणीही, भले तो पाहुणा का असेना – चालला की अतिशय अदबीने त्याच्यापुढे दोन पर्याय ठेवले जायचे – रंग लावून घेणार की बॅरेलमध्ये बुचकळून काढू? आणि मग तो माणूस रंगीबेरंगी होऊन पुढचा रस्ता धरायचा.

पण होळी हा रंगाचा सण आहे त्यात काही वादच नाही. अगदी कोरडे रंग खेळलेले चेहरेदेखील किती साजरे दिसतात! त्यावरचा तो आनंद पाहण्याची मजाच न्यारी आहे. खिडकीत उभा राहून खाली रंग खेळणार्‍या लोकांकडे पाहिले तरी किती छान वाटते! सगळेजण आपापल्या धुंदीत असतात. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत रंगात बुडालेले. त्यानंतर घरी आल्यावर ते ओळखत नाहीत हा भाग वेगळा पण होली इज – नो डाऊट – होली!

©विजय माने, ठाणे.

 

विधिलिखित 

2

मला आर्याच्या घरचा लॅन्डलाईन नंबर माहित नव्हता. तो माहित असण्याची कधी गरजच पडली नव्हती. आम्ही दोघे नेहमीच मोबाईलवर बोलायचो. मी तिला एकदा लॅन्डलाईन नंबर विचारला होता पण तिने सांगितलेल्या माहितीवरून मी पुन्हा विचारण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. हॉलमध्ये जिथे लॅन्डलाईन फोन ठेवलेला असायचा तिथेच अंकल नेहमी बसलेले असायचे. बसण्यासाठी हॉल ही त्यांची आवडती जागा होती. आर्याची आई खूप प्रेमळ असली तरीही अंकलची नको ती रिस्क घ्यायच्या भानगडीत मी पुन्हा पडलोच नाही.

इन्स्पेक्टर वागळेंच्या कॉलनंतर लगेचच तसल्या रात्री मी बाईक काढून तिच्या घरी निघालो. याआधी दोन तीनवेळा तिच्या घरी गेलो असल्यामुळे पत्ता शोधण्यासाठी मला खूप त्रास घ्यावा लागला नाही. अर्थातच बंगल्याचे मेन गेट बंद होते. बाईक पार्क करून मी गेटजवळ आलो आणि आर्याच्या नावाने खूप हाका मारल्या पण आत काहीही हालचाल झाली नाही की कुठली लाईट लागल्याचेही दिसले नाही. एकतर त्या धक्क्यात तिचे नाव उच्चारणेही मला जड जात होते. खूप सारे हुंदके गळ्याशी येऊन थांबले होते. डोळ्यांतून एवढे पाणी वाहून गेले होते की ते जवळजवळ आटून गेले होते. तरीही मी हाका मारणे चालूच ठेवले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी झोपेतून कोण उठत नाही म्हणून मी गेटवरून चढून आत जाण्याच्या विचारात होतो तेवढ्यात हॉलमधली लाईट लागल्याचे दिसले. हॉलचा दरवाजा उघडून अंकल गेटकडे बाहेर आले. एवढ्या रात्री मी का त्यांच्याकडे कुठल्या अर्जंसीने आलोय हे त्यांना समजले नसले तरीही एवढ्या ऑड वेळेमुळे ते हैराण झालेले त्यांच्या नजरेतून समजत होते. त्यांनी गेट उघडून मला आत घेतले.

“काय झाले समीर? सारे काही ठीक आहे ना? तू टूरवर गेला होतास ना?”
“हो. थोड्या वेळापूवीच परत आलो.”
“आर्या पुण्याला गेलीय. सकाळी येईल ती.”
“मला माहित आहे पण…” म्हणून मी थोडा अडखळलो.
“पण काय समीर?”
“ती आता कधीच नाही येणार …अंकल.”
“काय?”
“हो! आत्ताच मला लोणावळ्यावरून इन्स्पेेक्टर वागळेंचा कॉल आला होता.”
“तू काय म्हणतोयस मला काहीही समजत नाही समीर, मला जरा शांतपणे सांगतोस का प्लीज?”

मी आजुबाजूला आंटी नाहीयेत याची खात्री करून घेतली. अपघाताच्या बातमीपेक्षा आर्याबद्दल मी काय सांगू ते मला समजत नव्हते. तरीही मी अडखळत सुरवात केली, “आर्या आणि करिश्मा पुण्यावरून कारने परत येत होत्या. त्यांचा अॅक्सिडेंट झालाय असा कॉल होता इन्स्पेक्टर वागळेंचा.”
“आर्या कशी आहे मग?”

मी मान खाली घालून गप्प राहिलो.

“समीर गप्प का आहेस तू? काय आहे ते खरे सांग.”
“त्यांनी सांगितलेय, आर्या आपल्यात नाहीये. आपल्याला लगेच निघावे लागेल लोणावळ्याला.”

मी आर्याबद्दल एवढे स्पष्ट सांगितल्यावर अंकल धक्क्याने तिथेच पायर्‍यांवर खाली बसले. बराचवेळ ते काहीच बोलले नाहीत. मी त्यांच्या बाजूला जाऊन बसलो आणि एकाएकी माझाच बांध फुटला. डोळ्यांतून पुन्हा पाणी सुरु झाले. त्यांनीही मला घट्ट मिठी मारली आणि मग त्यांचा हुंदका अनावर झाला. ते खूप भावूक झाले होते. भावनांचा आवेग ओसरल्यावर ते शांत झाले आणि यातले काहीही आंटीला सांगू नकोस असे त्यांनी मला बजावले.

लोणावळ्याला पोहोचायला आम्हांला दोन तास लागले. वेळ वाचावा म्हणून मी अंकलना टॅक्सीनेच पोलिस स्टेशनला जायला सांगितले आणि मी रिक्षाने इन्स्पेक्टर वागळेंनी दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर निघालो. एकेक मिनीट मला युगासारखा वाटत होता. तरीही तिथे पोहोचायला मला पंधरा मिनीटे लागली. धावतच रिसेप्शनवर गेलो आणि करिश्मा नेमकी कुठे आहे ते विचारले.

“वॉर्ड नंबर पाच. ती झोपली असेल तर तिच्याशी जास्त बोलू नका.”
“ओके अॅन्ड थँक्यू.”
“बाय द वे कोण आहात तुम्ही?”
“तिचा मित्र.”
“आणि घरचे कोण आलेय का?”
“ऑन द वे आहेत ते.” करिश्माच्या घरचे नेमके कुठे होते ते मला माहित नव्हते. त्यांना ही बातमी तरी समजली आहे की नाही याचीही मला कल्पना नव्हती, “वॉर्ड नंबर पाच कुठे आहे नक्की?”
“लेफ्ट घेतला की सरळ जा. उजव्या हाताला पाच नंबर लिहीला आहे तो वॉर्ड.”

मी तिने दिलेल्या सुचनांचे पालन करून पाच नंबरच्या वार्डात घुसलो. माझी नजर करिश्माला शोधायला भिरभिरत होती. मला तिला भेटून खूप काही विचारायचे होते. माझ्याशी बोलण्याइतपत ती सुखरुप असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करत होतो. डोक्यात असंख्य विचारांचे वादळ घेऊन मी घाईघाईने एकामागून एक बेड चेक करत पुढे जात होतो. शेवटच्या बेडला लावलेला मोरपंखी रंगाचा पडदा बाजूला करून तिथल्या बेडवर झोपेत असलेल्या मुलीवर माझी नजर पडली आणि मला खरोखरची चक्कर आली. अपघातात वाचलेली करिश्मा नसून आर्या होती हे समजल्यावर डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागले. तिला वाचवल्याबद्दल देवाचे आभार कसे मानावेत ते मला कळेना.

मी धावत तिच्याजवळ जाऊन पुन्हा एकदा ती आर्याच असल्याची खात्री करून घेतली. डोळे मिटून ती शांत झोपेत असल्यासारखी वाटत होती. तिथे असलेले स्टूल ओढून मी तिच्या बेडच्या बाजूलाच बसलो आणि हळूच तिच्या हातावर हात ठेवला. तिला स्पर्शाची जाणीव झाली असावी कारण तिने खूप प्रयासाने डोळे उघडले. मला पाहताच तिच्या डोळ्यांतून घळकन अश्रू ओघळले. तिच्या डोळ्यांतले तेज कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. एका धक्क्याने ती खूपच थकलेली वाटत होती. मी तिच्या हातावर हात ठेऊन उबदार स्पर्शाची जाणीव करून देत तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्याबरोबर आहोत हे नजरेनेच सांगितले.

तिला बोलायला बहूतेक खूप त्रास होत असावा, “कधी आलास तू टूरवरून परत?”
“साडेबाराला.”
“कशी झाली तुझी टूर?”
“तू वेडी आहेस का? हॉस्पिटलच्या बेडवर आहेस आणि मला टूरबद्दल विचारते आहेस?”
“अरे तू किती डेडिकेशनने काम करतोस, म्हणून मी विचारले.”
“पण मला स्वत:ची काळजी घ्यायला लावून तू हे काय करून बसली आहेस?”
“नो क्राईंग.” माझे भरत असलेले डोळे तिला लगेच जाणवले.
“मला एक सांग, एवढ्या रात्री पुण्यावरून निघायची काय गरज होती? सकाळपर्यंत वाट पाहू शकत नव्हतीस?”
“नाही ना. मग कशाला? मी तुला खूप मिस करत होते.”

ती खरे बोलत होती त्याने मला खूप हेलावून आले. तिला एकदा भेटावेसे वाटले की काही जरी झाले तरी ती मला भेटायचीच. मग वेळ काळ याचे तिला भान नसायचे. तिच्या हाताच्या तळव्याचे मी चुंबन घेतले. बेधुंद करणारा तिच्या शरीराचा तोच सुगंध आला जो मला नेहमी वेडा करायचा. तिला घट्ट मिठीत घेऊन ती ठीक आहे याची मला खात्री करायची होती पण मला माहित होते, ती ठीक नव्हती.

“समीर, मला एक गाणे ऐकायचे आहे.”
“कोणते?”
“गाना अॅप उघड ना, मग सांगते.”
मी मोबाईलवर गाना अॅप उघडले आणि याक्षणाला ती नेमके कोणते गाणे सांगतेय याची वाट पाहू लागलो.
“लग जा गले…लाव ना.”
“आर्या नको ना प्लीज…तुला माहित आहे, मला या क्षणाला हे गाणे नाही ऐकायचेय.”
“अरे पण माझे खूप आवडते आहे ते. प्लीज ऐकू या ना एकत्र आपण. ते अगदी बरोबर आहे या वेळेसाठी.”

मी गाणेे प्ले केले. लताच्या आवाजातले ते गाणे खूप इमोशनल आहे ते मला ठाऊक होते आणि तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये असताना या क्षणाला तर ते ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती.

लग जा गले की फिर ये हसीं रात हो ना हो 
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…
हमको मिली हैं आज ये घडियाँ नसीब से
जी भर के देख लिजिए हमको करीब से
फिर आपके नसीब में ये बात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…

लता खूप आर्ततेने गात होती आणि मी खूप भावनिक झालोय हे तिच्या लक्षात आल्यावर तिने माझा हात हातात घेतला आणि माझ्या डोळ्यांत नजर रोखली. तिच्या बोटांत बोटे लॉक करत आमच्या दोघांचेही कान पुढच्या ओळी ऐकायला आतूर झाले. का कोण जाणे हे गाणे फक्त आता आम्ही ज्या प्रसंगातून जात होतो त्यासाठीच लिहीले गेले आहे असे मला वाटत होते पण त्याचा खरा अर्थ लक्षात आल्यावर तसे काही आमच्या आयुष्यात घडायला नको असे मनोमन वाटत होते.

पास आईये की हम नहीं आयेंगे बार बार 
बाहें गले मे डालके हम रो ले जार जार
आखों से फिर ये प्यार की बरसात हो ना हो
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो
लग जा गले…

गाणे संपल्यावर आम्ही बराच वेळ गप्प होतो. दोघांच्याही नजरा मात्र बोलत होत्या. सरळ आनंदी आयुष्य चाललेले असताना आम्हांला मध्येच या अशा वळणावर यावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. या विचारात असतानाच हळूच तिने विचारले, “मला एक प्रॉमिस करशील?”
“नो. हॉस्पिटलमध्ये नो प्रॉमिसेस. त्यासाठी सीसीडी, मॅक्डी, आणि तिथल्या तुझ्या फेवरेट फ्राईज असे खूप बहाणे आहेत.”
“मला नाही वाटत.”
“काय?”
“आता मी पुन्हा इथून बाहेर पडू शकेन.”
“वेड्यासारखे काहीही बोलू नकोस.”
“तूला माहित आहे, मी वेडी नाहीये.”
“हो. माहित आहे. तू खूप हुशार मुलगी आहेस पण तू इथून बाहेर पडल्यावर आपण खूप सारी प्रॉमिसेस करुयात.”
“नाही. मला आत्ताच हवे आहे.”
“नाही.”
“कदाचित ही माझी शेवटची इच्छा असेल.”

मला माझ्या डोळ्यांतून गळणारे पाणी टिपायला दुसर्‍या बाजूस वळावे लागले.

“आर्या प्लीज नको ना असे बोलूस यार.”
“मग ऐक ना माझे प्लीज.”
“सांग…”
“तू दुसरी मुलगी शोध.”
“चूप्प बस. मी तुला सोडणार नाहीये.”
“अजूनही जीव अडकलाय माझ्यात?”
“आयुष्याच्या शेवटपर्यंत अडकलेला असेल. आणि भर रस्त्यातल्या चौकात कुणीतरी अंगठी बोटात घालून मला आयुष्यभरासाठी बुक केलेय याची जाणीव आहे मला. ते कसा विसरेन मी?”
“पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती, आता मला खरोखर नाही वाटत माझ्याकडे जास्त वेळ आहे म्हणून.”
“काहीही बोलू नकोस.”
“पण मी खरे तेच बोलतीये.”
“आर्या तू स्वप्न आहेस माझे.”
“आणि तू माझे होतास.”

तिने माझ्या पकडलेल्या हातावरची पकड मजबूत झाली होती. कदाचित माझ्याशी बरेच बोलून ती थकली असावी. तिला ग्लानी आली आणि तिने डोळे मिटून घेतले. मी तिला आराम मिळावा म्हणून तिच्या कपाळावर थोपटत बसलो. डोळे बंद ठेवूनच ती बोलू लागली, “शोना, तुझ्याआधी मला मरण यावे अशी माझी खूप इच्छा होती.”
“आर्या चूप बस आणि आता काही बोलू नकोस. तू खूप थकली आहेस.”
“मला थोड्या गोष्टी बोलू देत. हल्ली तू माझ्या जगण्याचा एक भाग झाला होतास. मी तुझ्याशिवाय जगूच शकले नसते.”
“तू मला हे आता का सांगते आहेस? आधी का नाहीस सांगितलेस?”
“तुला माहित होते ते. पण मला वाटते आता मी सांगायला हवे. तुला ते माझ्याकडून ऐकायला हवे असायचे आणि मी दुष्टपणा करायचे. कधीही बोलायचे नाही. आय एम सॉरी समीर.”
“आर्या आय लव्ह यू. आता नकोस बोलू. मला सारे आयुष्य तुझ्याबरोबर जगायचेेय.”

बोलता बोलता माझ्या डोळ्यांतून गालांवर अश्रू ओघळले. तिने ते पुसायचा प्रयत्न केला आणि मी तिला पूसू दिले. माझ्या आयुष्यातले सगळे चढउतार तिला माहित होते. त्या सगळ्या परिस्थितीत ती मला समजून घेत होती. एक शब्द उच्चाराला की माझ्या मनात काय चाललेय याचा तिला अंदाज यायचा. अगदी मोबाईलवर बोलत असलो तरी दोन शब्दांच्या मध्ये घेतलेल्या पॉझवरून तिला माझा मूड कळायचा. तिच्याशिवाय माझे आयुष्य अधुरे होते. ती माझी सर्वात जवळची मैत्रीण, प्रेयसी आणि सर्व काही होती.

“समू, प्लीज रडू नकोस. तू रडताना अजिबात चांगला नाहीस दिसत.”

मी माझ्या इमोशन्स आवरल्या. ती रागावली की मला बरे वाटायचे. खरे म्हणजे ती रागवत नव्हती. तिच्या माझ्यावरच्या हक्काची वेळोवेळी जाणीव करून द्यायची. मी डोळे पुसत नॉर्मल असल्याचे नाटक केले.

“आता एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येकवेळी तुझी काळजी घ्यायला आता मी नसेन. डोके शांत ठेवत जा. बॅनर्जी तू समजतोयस तेवढा वाईट नाहीये. त्याने तुला प्रत्येक परिस्थितीशी सामना करण्याएवढा स्ट्राँग बनवले आहे. मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे.
“कोणती?”
“तुला आठवतं, मी तुला व्हॅलेंटाईन्स डे ला भेटायला आले होते. अॅक्च्युली मी तुला माझ्या बर्थडे दिवशी भेटू शकले असते. पण मला ‘व्हॅलेंटाईन डे’लाच भेटायचे होते. मला वाटत होते तू हा दिवस खूप स्पेशल बनवशील.”

आर्या म्हणजे खरोखर इंपॉसिबल होती. माझ्याशी एका शब्दाने या गोष्टीबद्दल बोलली नव्हती आणि आता एकेक सरप्राईज देत होती.

“पप्पा आणि मम्मा कुठे आहेत?”
“पप्पा ऑन द वे आहेत.” मी इन्स्पेक्टरच्या कॉलबद्दल तिला काहीही सांगितले नाही.
“मम्मा?”
“मम्मा नाही आली आपणच घरी जायचेय.”
“मला तिला पहायचे होते.”

माझ्या डोळ्यांना काय झाले होते कळत नव्हते. ते एकसारखे पाझरत होते. तिने माझा हात मागितला आणि मी तो दिला. हळुवारपणे तिने हाताचे चुंबन घेतले.

“मम्माला तू खूप आवडायचास. तुझे किती कौतूक करायची ती!”
“आणि मला तू हे कधी सांगितले नाहीस?”
“अगदी पप्पांनाही आवडायचास.”
“मग मला त्यांच्याबद्ल सांगितलेस ते खोटे होते?”
“काय?”
“ते मला काय म्हणालेले ते – कुत्र्याचे पिल्लू आणि रुबाबदार जावई वगैरे गोष्टी?”
तिने दुबळेपणाने हसण्याचा प्रयत्न केला आणि बोलली, “नाही, ते खरे होते पण नंतर त्यांचे तुझ्याबद्दलचे मत बदलले.”
“बदलले की तू बदलायला लावलेस?”

तिने तशाही परिस्थितीत डोळा मारला. ही पोरगी म्हणजे खरोखर सॅम्पल होती, “म्हणून काय झाले? कितीही केलं तरी मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. आणि माझ्या पहिल्या प्रेमाला ते कसा नकार देतील?”
“खरंच पहिले प्रेम?”
“तुला काय वाटतं?”
“थिएटरमध्ये पिक्चर पहाताना ज्या पद्धतीने माझा किस घेतलेलास त्यावरून तरी वाटले नाही मला.”
“मुलींना नेहमी प्रेमळ आणि हळुवार स्पर्श आवडतो.”
“आता गप्प बस, विषय बदलू नकोस. तू मला पप्पा काय म्हणाले ते सांगत होतीस.”
“मग काय, त्यांना केले तयार मी, पण आता त्याचा काही उपयोग नाही.”
“का?”
“माझा सिक्सथ सेन्स ते सांगतोय मला.”
“चूप्प बस तू आता.”
“पण मी तुला एका गोष्टीची शिक्षा देऊ शकले नाही.”
“कोणत्या?”
“मला तू लेखक आहेस ते सांगितले नव्हतेस त्या.”
“पण आता तर माहित झाले की तुला.”
“तुझे पहिले पत्र वाचतानाच मला शंका आली होती. माझी पर्स कुठाय? तू मला दिलेले पहिले पत्र माझे जीव की प्राण होते.”
मी बाजुच्या ट्रॉली ड्रॉवरमध्ये आणि बेडच्या आजुबाजूला तिची पर्स आहे का ते पाहिले, पण कुठेच नव्हती.
“तुझे ते पत्र नेहमीच माझ्याजवळ असायचे आणि कोणीतरी माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करतंय याची मला नेहमी जाणीव व्हायची.”
“खरोखर?”
“तू तीन आठवडे माझ्याशी बोलत नव्हतास तर ते पत्रच माझ्या आशेचा किरण होते. केवळ तुझ्यासाठी जगायला हवं असं वाटायचं. तुझी गर्लफ्रेंड असल्याचे मला खरोखर खूप समाधान होते. मी त्या पत्राची पारायणे केली होती. जेव्हा डोळ्यांतले पाणी थांबायचे नाही त्यावेळी मी तुझे पत्र वाचत बसायचे. तू माझे काही ऐकत नव्हतास त्यावेळी मी तुझ्या पत्राशी बोलत बसायचे. मग मला तुझ्याशी बोलल्याचे समाधान मिळायचे. तुझ्या त्या कागदावरच्या शब्दांनी मला अक्षरश: भुरळ पाडली होती. कदाचित ते पत्र मला दिले नसतेस तर माहित नाही मी तुला हो म्हणाले असते की नाही. जगात ती एकच गोष्ट अशी होती की त्याशिवाय मी जगू शकले नसते.”
“आर्या, तू थकली आहेस. शांत झोप आता.”
“मला बोलू दे समीर. माझ्याकडे जास्त वेळ नाही. माझ्या नजरेत तुला साठवून घेऊ दे. मला तुला घट्ट मिठीत घ्यायचे होते. पण आता ते शक्य नाही. आता मी तुला ना पंच मारू शकते ना पिंच करू शकते. माझ्या शेवटच्या काळात तू माझ्या बेडजवळ असावास असे मला वाटायचे पण ती वेळ एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. तरीही मी खुश आहे.”
“आर्या प्लीज…”
“थांब ना समू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुझे पहिले पत्र, टेडी, आपण पाहिलेले पिक्चर्स. एकत्र शेअर केलेल्या मोमेंट्स, तू खरोखर स्टूपिड आणि क्यूट आहेस. पण काय झालेय माहित नाही, हल्ली माझ्या मौल्यवान वस्तू हरवायला लागल्या आहेत.”
“काहीही हरवत नाहीये तुझे.”
“माझी डायरी हरवली आहे. खूप दिवस झाले ती मिळत नाहीये मला.”
“माझ्याकडे सुरक्षित आहे ती.”
तशाही परिस्थितीत तिचे डोळे चमकले, “तुला कुठे मिळाली ती?”
“मी तुझ्या पर्समधून पळवलेली.” मी एखाद्या गुन्हेगारासारखी कबूली दिली. ती हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या तिच्या हरवलेल्या खजिन्याबद्दल खंत व्यक्त करत होती. त्यावेळी गप्प बसणे शक्य नव्हते.
“चिटर! हृदय चोरलेस ते पुरेसे नव्हते का?”
“मला वाचायची होती तुझी डायरी.”
“पण डिसेन्सी नावाची काहीतरी गोष्ट असते म्हटलं.”
“मला माहित आहे शोना! पण तसाही मी कुठे डिसेंट आहे तुझ्याबरोबर?”

प्रेमाने तिने माझा हात दाबला. तेवढ्यात अचानक अंकल आले. आर्याला बेडवर पाहून त्याना आनंदाचा धक्काच बसला. मी त्यांना एवढे एक्सप्रेसिव्ह कधीही पाहिले नव्हते. ते धावत आले आणि त्यांनी आर्याच्या कपाळाचे चुंबन घेतले. आर्या खूप छान हसली.

“हे सारे कसे झाले बाळा?”
“माहित नाही पप्पा. मला फक्त आमच्या बाजूला येत असलेला कंटेनर दिसला. करिश्मा ड्राईव्ह करत होती. तिला मी सांगायच्या आतच…हे सारे झाले.”

बोलून तिला पुन्हा दम लागला.

“आम्हांला इथे कुणी आणले? आणि करिश्मा कुठाय?”
“ती ठीकाय.” मी अंकलना डोळ्यांनेच गप्प रहायला सांगितले.
“डॉक्टर काय म्हणाले?”
“डॉक्टर म्हणाले, यू वुईल बी फाईन पण तुला आराम करायचाय आता.”
“पप्पा तुम्ही खोटे बोलताय.”

अंकलनी त्यांचे डोळे पुसले.

“मला माहित आहे डॉक्टर काय म्हणाले असतील. मला मम्माला पहायचे होते.”
“आपण घरी जातोय मग भेटा आणि काय बोलायचेय ते बोला.”

तिने अंकलच्या हातात पर्स पाहिल्यावर ती कमालीची खुश झाली आणि म्हणाली, “माझी पर्स?”

अंकलनी तिच्याकडे पर्स दिली. तिने एक्साईट होऊन एका हाताने ती उघडायचा प्रयत्न केला. मी तिला चेन उघडायल मदत केली. तिने पर्समध्ये हात घातला आणि ते पत्र बाहेर काढले – तेच पत्र, जे मी तिला ‘व्हॅलेंटाईन्स डे’ ला लिहीलेले. तिने ते पत्र उघडायचा एक शेवटचा दुबळा प्रयत्न केला आणि अचानक दोन बोटांत पत्र पकडलेला तिचा हात अचेतन होऊन खाली पडला. आमची सर्वात मोठी भीती खरी ठरली. आर्या आमच्या डोळ्यांसमोर आमच्यातून निघून गेली आणि आम्ही तिच्या बाजूला असतानाही काहीच करू शकलो नाही.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.

ओढ

1

भोपाळवरून दिल्लीला पोहोचल्यावर फ्लाईटमधून उतरल्या उतरल्या मोबाईल ऑन करताच आर्याचा मेसेज आला होता.

मी आणि करिश्माने ऑफिसला दोन दिवसाची सुट्टी टाकली आहे. तिच्याबरोबर मी आज पुण्याला जातेय. आम्ही खूप धमाल करणार आहोत. ट्रेकिंगला जाणार आहोत तोरणाला. मला माहित आहे, चेन्नईवरून तू बुधवारी रात्री परत येशील. आम्ही परत आल्यावर गुरुवारी आपण भेटतोय. मला तुझ्या कुठल्याही एक्सक्युझेस चालणार नाहीत. तो पर्यंत मला खूप मिस करबाऽय शोना!!

आर्याच्या मेंदूत सतत काहीतरी चाललेले असायचे. बाहेरच्याला त्याचा थांगपत्ताही लागायचा नाही. मध्येच हे ट्रेकिंगचे खूळ तिच्या डोक्यात कोणी टाकले होते देव जाणे! ट्रेकिंगला सुरवात करायची आहे तर सिंहगडला वगैरे जायचे, डायरेक्ट तोरणा? पण तिला समजावण्यात काही अर्थ नव्हता.

दुसर्‍यादिवशी दिल्लीचे ट्रेनिंग संपवून चेन्नई फ्लाईट पकडायला टॅक्सीत बसलो आणि लक्षात आले सकाळपासून तिच्याशी बोललोच नव्हतो. मोबाईल ऑन केला तर अनेक स्पॅम आणि ओळखीचा म्हणजे तिचाच तेवढा एक मेसेज होता.

सम्या, तू मला अजिबात मिस करत नाहीस. कालपासून मला साधा एक कॉल केलेला नाहीयेस. माझ्याबरोबर नसतोस ना त्यावेळी फुल सुटलेला असतोस तू. मी या सगळ्याचा सव्याज बदला घेणार आहे. आणि आता टाईमपास म्हणून मला कॉल करू नकोस.

मी तिचा नंबर डायल केला आणि “अजिबात बोलणार नाही तुझ्याशी!” असे पहिले वाक्य बोलणारी आर्या अर्धा तास झाला तरी फोन ठेवायला तयार नव्हती. “अगं एअरपोर्टवर आलोय, रात्री झोपण्याआधी तुला नक्की कॉल करतो.” असे म्हणून कॉल डिस्कनेक्ट केला. बॅगेज स्कॅनिंग झाल्यावर चेन्नईच्या ज्या भल्यामोठ्या रांगेत उभा राहिलो त्या फ्लाईटमध्ये विंडो सीट मिळायचा चान्सच नव्हता. बोर्डिंपास घेऊन एकदाचा फ्लाईटमध्ये आलो. ओठांना भडक लाल रंगाची लिपस्टिक लावलेल्या एका भयंकर एअर होस्टेसने ‘सगळी फ्लाईट सोडून आला आमच्याच फ्लाईटमध्ये कडमडायला?’ अशा भावात आमचे स्वागत केले. एकतर तिच्या विचित्र लिपस्टीकमुळे ती व्हॅम्पायरसारखी नुकतेच कुणाचेतरी रक्त पिऊन आली आहे असे वाटत होते. एअरलाईन आणि येणार्‍या पॅसेंजर्सवर उपकार केल्याच्या अविर्भावात ती उभी होती, तशात तिला काही मदत मागितली असती तर तिने माझ्या नरडीचा घोट घ्यायला कमी केले नसते या भीतीने तिला कोणत्याही प्रकारची तसदी न देता मी गुपचूप माझ्या सीटवर गेलो.

दोन साऊथ इंडियन आण्णांमध्ये माझी सीट होती. सुरवातीला ते दोघे एकमेकांशी संबंध नसल्याप्रमाणे वाटले पण होते मात्र चांगले मित्र. एवढे जिगरी की, त्यांच्यामध्ये बसलेल्या मला दुर्लक्ष करून अगम्य भाषेत त्यांचे बोलणे चालले होते. लेकाचे नेमके भांडत होते की कुठल्या विनोदावर हसत होते याचा पत्ता लागून द्यायला तयार नव्हते. तरीही मी त्यातल्या एकाला मी आईल सीटवर बसतो, तुला तुझ्या दोस्ताच्या बाजूला बसायचे आहे का? वगैरे विचारून पाहिले, पण “इल्ला! हियर वोके!” म्हणजे त्यांना माझी जिरवायचीच होती. मी सरळ इयरफोन कानात टाकले आणि पुढच्या एलसीडीवर लागलेला टॉम अॅन्ड जेरीचा शो ऑन केला.

रात्री साडेदहाला चेन्नईला पोहोचून एअरपोर्टबाहेर आलो तर हातात माझ्या नावाचे प्लाकार्ड घेऊन आमचा चेन्नईचा इंजिनियर सुजेश मला रिसीव्ह करायला उभा होता. त्याचे वय साधारण माझ्याएवढेच असेल. त्याला “एवढ्या लेट कशाला आलास? हॉटेलचा पत्ता दिला असता तरी चालले असते.” म्हणालो तर “सर, साडेआठ तक तो ऑफिसमेही था. उधरसे ही आया टॅक्सी मे, और ऐसा भी इतनी रात को क्या काम था मुझे?” हे उत्तर आले. ब्रांचने माझ्या हॉटेल बुकिंग आणि टॅक्सीची आधीच व्यवस्था केली होती. सुजेश त्या टॅक्सीनेच इकडे आला होता. पाऊणतास प्रवासानंतर आम्ही हॉटेलवर पोहोचल्यावर सुजेश मला सोडल्या सोडल्या काहीही न जेवता तसाच घरी जायच्या मूडमध्ये दिसत होता पण मी त्याला तसा जाऊ दिला नाही. आमचे डिनर झाल्यावर तो त्याच्या बाईकने घरी गेला. जाता जाता सकाळी नऊ वाजता घ्यायला येतो असे सांगायला तो विसरला नाही. “पण कशाला येतोस? मी टॅक्सीने ब्रांचला पोहोचेन!” असे म्हटलो तर “नाही, तू इथला पाहुणा आहेस आणि तुझा इथला स्टे कम्फर्टेबल करायची जबाबदारी माझी आहे!” त्याच्या या उत्तरावर काय बोलावे ते मला समजेना.

हे अगदीच अनपेक्षित होते. सुजेशच्या रुपाने चेन्नईमध्ये एक चांगला मित्र भेटला. दुसर्‍यादिवशी सकाळी बरोबर नऊ वाजता तो हॉटेलवर हजर होता. त्याने ब्रांचजवळच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये नेऊन वडा सांबार, इडली आणखी काहीतरी दोन पदार्थ – साधारणपणे ज्यांची नावे लक्षात रहाणार नाहीत – मागवले आणि ते खायला सांगितले. कमालीचे स्वादिष्ट होते. ब्रेकफास्ट थोडा जास्तच झाला. मी बिल दिले पण गल्ल्यावर बसलेल्या हॅपीमॅनला त्याने तामिळ की मल्ल्याळममध्ये काहीतरी सांगितले आणि त्याने हसतहसत माझे पैसे परत केले आणि सुजेशकडून घेतले.

ब्रांचमध्ये पोहोचायला आम्हांला साडेदहा वाजले. ट्रेनिंगसाठी सुजेशसह सत्तावीसजण हजर होते. सगळेजण मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐकत होते. दिल्लीतल्या ट्रेनिंगसारखी अखंड बडबड इथे नव्हती की गोंगाट करणारा क्राऊडही वाटत नव्हता. हे साऊथ ईंडियन लोक कमालीचे नम्र असतात. कुठेही शो शा करायच्या भानगडीत पडत नाहीत. करोडपती असला तरीही त्याच्या वेषावरून अंदाज येणार नाही. भोपाळ आणि दिल्लीच्या किलबिलाटातील अनुभवानंतर एवढे शांत ट्रेनिंग योग्य दिशेने चालले आहे की नाही याची मला शंका येत होती. पण सुजेशने एव्हरीथिंग इज ओके, ट्रेनिंग चालू ठेव म्हणून सांगितले.

ग्रुपफोटोने ट्रेनिंगची सांगता झाली. सर्वांनी माझे आभार मानले. सकाळी ब्रांचमॅनेजर कुमारन आला नसल्याने सुजेशने ट्रेनिंग झाल्यावर त्यांच्याशी भेट घालून दिली. मी ऑल द वे मुंबईवरून चेन्नईला येऊन लोकांना ट्रेन केले म्हणून त्याने माझे खूप आभार मानले. मी त्याला भोपाळ आणि दिल्लीमार्गे चेन्नईला आलोय हे सांगायचे मुद्दाम टाळले नाहीतर ते समजल्यावर त्याने मला दंडवतच घातला असता. त्यानंतर सुजेशने मला चेन्नईत मिळणार्‍या शुद्ध देशी तुपातला म्हैसूरपाक मिळणार्‍या एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात नेले आणि इथून मिठाई घ्यायची असे सांगितले. मी दोन मिठाईचे बॉक्स घेऊन सुजेशला काही समजायच्या आत बिल सेटल केले. तो काही केल्या मी दिलेला बॉक्स घ्यायला तयार होईना. त्यासाठी मला “मी चेन्नईला पुन्हा कधीही येणार नाही.” अशी खोटी आणि प्रेमळ धमकी द्यावी लागली.

एअरपोर्टवर मला सोडायला तो पुन्हा आला. फ्लाईटला बराचवेळ होता म्हणून लगेच आत न जाता त्याच्याबरोबर गप्पा मारत बाहेरच थांबलो. नंतर गप्पांच्या ओघात तोही माझ्यासारखा भाड्याच्या फ्लॅटमध्ये रहातोय ते समजले. हॅपी बॅचलर्स लाईफ! बोलता बोलता दोघांच्या तारा एवढ्या जुळल्या की अगदी पर्सनल गप्पा कधी सुरू झाल्या ते ही समजले नाही. शेवटी थोडेसे दबकतच त्याने विचारले, “तुला गर्लफ्रेंड आहे का?”

त्याच्याशी खोटे बोलून मला काय मिळणार होते? मी हो म्हणून सांगितल्यावर तो ही थोडा रिलॅक्स होत माझ्याशी बोलू लागला. त्याची गर्लफ्रेंड वेळ देत नाही म्हणून त्याच्यावर दोन दिवसापासून चिडली हाती आणि माझ्या टूरचा प्लान अचानक झाल्यामुळे त्याचे शेड्यूल फिसकटले होते. दुसर्‍यादिवशी सुट्टी टाकून त्याने पिक्चर्सची दोन तिकीटे काढली होती. तो दिवस ते फुलटू एन्जॉय करणार होते. मला माझ्या गर्लफ्रेंडची आठवण झाली. काल रात्री तिला फोन करायचा राहून गेला होता. एकतर प्रवासाने खूप थकलो होतो. जेवणानंतर बेडवर अंग टाकल्या टाकल्या कधी झोप लागली ते समजलेच नाही. अगदी कपडे बदलायचेही भान नव्हते. सकाळी उठल्या उठल्या तिला कॉल केला होता पण तिचा फोन स्वीच ऑफ येत होता. ती जाम चिडली असणार यात शंकाच नव्हती. गर्लफ्रेंड्स वुईल बी गर्लफ्रेंड्स! आम्हांला कधीही समजून घेत नाहीत, नुसता वेळ हवा असतो त्यांना! मित्राबरोबर अर्धा तास घालवला तरी त्यावरून दोन तास चिडचिड करतील! “पुन्हा असे नाही होणार बोल काहीतरी माझ्याशी!” असे म्हटले तरी “जा ना तुझ्या मित्राबरोबर बोलायला!” असे वादविवाद चालतात. आमच्या दोघांचीही स्टोरी एकच होती. शेवटी फ्लाईटची वेळ झाल्यावर त्याचा निरोप घेऊन मी एअरपोर्टमध्ये गेलो.

यावेळी मात्र मला विंडोसीट मिळाली. जागेवर येऊन रंगीबेरंगी फ्लाईट मॅगेझिन चाळत बसलो होतो इतक्यात सेम आर्यासारखी दिसणारी एअर होस्टेस माझ्या अगदी कानात “बिझनेस क्लासमध्ये येऊन बसता का प्लीज?” म्हणून कुजबुजली. माझे तिकीट इकॉनॉमी क्लासचे आहे ते तिला सांगितल्यावर ती केवढी गोड हसली! मग तिने माझे इकॉनॉमी क्लासचे तिकीट अपग्रेड होऊन बिझनेस क्लासचे झाले असल्याचे सांगितले. हे असे अपग्रेडेशन ट्रेनमध्य होते याची मला कल्पना होती पण विमानात -आणि ते ही आगाऊ पैसे न भरता, असे अपग्रेडेशन होत असेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

मी ओव्हरहेड लॉकरमधून माझी लॅपटॉपची बॅग घेतली आणि तिच्यामागे गेलो. बिझनेस क्लासमध्ये गेल्यावर तिने माझ्या हातातली बॅग घेऊन एखाद्या नोकरासारखी वर सरकवली ते मला खटकले. एवढी सुंदर मुलगी अशी कामे करण्यासाठी शोभत नव्हती. तिने मला ब्रेकफास्टसाठी काय आणू म्हणून विचारल्यावर माझी पंचाईत झाली. बिझनेस क्लासवाले काय घेतात याची मला कल्पना नसल्याने, शिवाय आमचे दुपारचे लंचही अगदीच लेट झाले असल्याने तसेही काही खायची माझी इच्छा नव्हतीच. मी फक्त अॅपल ज्यूस आणायला सांगितला. त्याबरोबर खायला काय आणू का अशी पुन्हा विचारणा झाली आणि मी नको म्हणून सांगितल्यावर “सर, प्लीज काहीतरी घ्या ना! वी वोन्ट फील गूड इफ यू डोन्ट इट एनिथिंग ड्युरींग द जर्नी!” तिची मर्जी राखायला मला नको असतानाही सँडविच खावे लागले! मग मात्र खुश होऊन तिने एका पारदर्शक काचेच्या ग्लासात अॅपल ज्यूस दिला.

मी तिला दुसर्‍या पॅसेंजर्सना सर्व्ह करताना पहात होतो. अगदीच आर्यासारखी दिसत होती ही पोरगी. मी हातातल्या मॅगेझिनवर फोकस करायचा प्रयत्न करत होतो पण ती जवळून गेली की तिचा स्ट्रॉबेरी परफ्यूम हैराण करत होता. मी बर्‍याचदा तिच्या पांढर्‍या टॉपच्या सोनेरी नेमप्लेटवर काय नाव लिहीले आहे हे पहायचा प्रयत्न केला, पण तिच्या हालचाली एवढ्या चपळ होत्या की काही समजत नव्हते. मी जेव्हा वाचायचा प्रयत्न करत होतो तेव्हा नेमकी ती पटकन निघून जायची किंवा ती नेत असलेल्या तिच्या हातातल्या वस्तूमागे तिचे नाव दडलेले असायचे. मुंबईत फ्लाईट लॅन्ड झाल्यावर आम्ही खाली उतरताना पुन्हा तिच्यावर लक्ष गेले. दरवाजावर सर्वांना बाय बाय करत ती उभी होती. शेवटी नाव समजले, नेहा! खूपच सुंदर होती! अगदी दुसरी आर्याच.

“बाय बाय सऽर.” हे ऐकल्यावर काळजात चर्र झाले. काहीच्या काहीच प्रोफेशनल असतात हे लोक! जाऊदे, त्यांच्याबद्दल विचार करण्यात काही अर्थ नव्हता. दुसर्‍यादिवशी मला आर्याला भेटायचे होते. आर्या दुनियेशी सिविलाईज्ड असेल पण माझ्याशी नक्कीच नव्हती. अनेकवेळा भलतीसलती धाडसे करून मला शॉक द्यायची. माझी चूक असली की माझ्यावर खोटे खोटे ओरडणे, मस्करी केली की चिमटे काढणे, कानात बोलताना कान चावणे या गोष्टी ती कुठे शिकून आली होती देव जाणे! खरोखर ती माझी जिगरी शेरणी होती. आम्ही एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करायचो हे आम्हा दोघांनाही ठाऊक होते. मुंबईत फ्लाईट लॅन्ड झाल्या झाल्या मी मोबाईल स्वीच ऑन केला.

आता सापडलास ना माझ्या तावडीत? तुला चांगलाच पहाते. कुठे जाशील माझ्यापासून दूर? सारखा पळत होतास ना, भोपाळ, दिल्ली आणि चेन्नई? उद्या भेट, मग दाखवते तुला!

मेसेज वाचून खूप भारी वाटले. गेल्या काही दिवसात मी तिला खूप मिस केले होते. कधी एकदा तिला भेटून खूप सार्‍या गोष्टी तिच्याशी शेअर करतोय असे झाले होते. मी एक मेसेज टाईप करून पाठवून दिला-

लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू बार्बी! डाईंग टू सी यू अॅक्च्युली! बट कान्ट हेल्प नाऊ!!

माझा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचला नाही. कॉल करून पाहिले तर तिचा मोबाईल अजूनही बंदच होता. मला घरी पोहोचायला रात्रीचे साडेबारा वाजले. आल्याआल्या बॅग सोफ्यावर टाकली आणि पहिल्यांदा बाथरुममध्ये घुसलो. गरम पाण्याच्या शॉवरखाली बराचवेळ उभा राहिल्यावर सारा थकवा गेला. एअरपोर्टवरून परत येताना डिनरचे पार्सल आणले होते, एकदाचे ते आटपून घेतले आणि दोनतीन दिवसाच्या सततच्या प्रवासाने खूप अंग दुखत होते म्हणून कधी नव्हे ते स्टडी टेबलवर ठेवलेली गोळ्यांची छोटीशी बॉटल हातावर उपडी केली आणि गोळ्या खाऊन लगेच बेडवर जाऊन पडलो त्यावेळी घड्याळात रात्रीचे दीड वाजले होते.

उशाशी ठेवलेल्या मोबाईलच्या रिंगटोनने गाढ झोपेतून जागा झालो. एवढ्या रात्री माझ्या मोबाईलवर कुणाचा कॉल येत होता ते समजत नव्हते. झोपेतच मोबाईलचा स्क्रीन चेक केला तर अननोन नंबर होता. एवढ्या ऑड टायमिंगला कोण माझी आठवण काढतेय ते पहाणे मला आवश्यक वाटले म्हणून कॉल घेतला, “हॅलो?”
“इन्स्पेक्टर वागळे बोलतोय लोणावळ्यावरून.”
“कुठून?”
“लोणावळा पोलिस स्टेशन.” पोलिसस्टेशनचे नाव ऐकताच मी पटकन उठून बसलो.
“बोला-”
“तुम्ही आर्या देशमुख यांना ओळखता का?”
“हो. का?”
“कोण आहेत त्या तुमच्या?”
“माझी होणारी बायको.” पटकन माझ्या तोंडून गेले.
“आय एम सॉरी, पण मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला थोडे धीराने घ्यावे लागेल.”
काहीही न बोलता त्यांनी बराचवेळ जीवघेणा पॉझ घेतला. त्यांना नेमके काय सांगायचे होते ते मला कळत नव्हते.
“काय बोलताय तुम्ही? जरा नीट सांगाल का प्लीज?”
“आर्या देशमुख आता आपल्यात नाहीयेत.”
“काय?”
माझ्या हातातून मोबाईल पडला. पुन्हा उचलून मी तो कानाला लावला.
“हो. लोणावळ्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झालाय आणि अॅम्ब्युलन्स तिथे पोहोचण्याआधीच शी वॉज … यू नो वॉट आय मीन. त्यांच्याबरोबर असणार्‍या मैत्रिणीला आम्ही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करू शकलो. पण त्याही खूप सिरीयस आहेत.”
“माय गॉड! काय होऊन बसले हे! आम्ही पोहोचतोच तिकडे!”
“आय नो -एवढा मोठा धक्का पचवणे खूप अवघड आहे पण सावरा स्वत:ला.”
त्यांच्याकडून हॉस्पिटलचा पत्ता घेऊन मी कॉल डिस्कनेक्ट केला. इन्स्पेक्टर वागळे काय बोलले त्यावर विश्वास ठेवणे खूप अवघड होते. आता मी आर्याला यापुढे कधीही भेटू शकणार नाही या नुसत्या विचारानेच डोके सुन्न झाले आणि अचानक माझ्या सर्वांगातून शक्तीच गेली.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.

वाढलेली जबाबदारी

Aeroplane

इलावियामध्ये बर्‍याच बिझनेस लाईन्समध्ये मोठे फेरफार झाले आणि आम्हांला रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटबरोबर कस्टमर सर्व्हिस पहायची ही एक आगाऊ जबाबदारी देण्यात आली. एकतर आमचे प्रॉडक्ट्स भरमसाठ वाढले होते. त्यातले काहीही खराब झाले की भारतातल्या कुठल्याही ठिकाणावरून रिपेअर करायला थेट मुंबईला पाठवाला लागायचे. रिपेअरींगसाठी एक स्वतंत्र टीम होती पण हायटेक प्रॉडक्टमुळे त्यांना रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटची म्हणजे ज्यांनी प्रॉडक्ट तयार केले आहे त्यांची – म्हणजेच आमची गरज भासायची. हे काम अवघड असल्याने बॅनर्जीने अर्थातच ते माझ्यावर टाकले. पुढे जाऊन कसला घोटाळा झाला असता किंवा काही कमी जास्त झाले असते तर माझ्यामुळे झाले असे त्याला कुठल्याही फोरममध्ये बिनदिक्कत सांगता आले असते. मदत म्हणून त्याने मला फक्त दोन टेक्निशियन्स दिले आणि सर्व रिपेअरिंग तू सिंगल हॅन्डेडली पहायचेस असे सांगून टाकले. म्हणजे त्यात काही जरी कमी आधिक झाले तर मीच जबाबदार असा त्याचा स्वच्छ अर्थ!

माझ्या आधीच्या प्रोफाईलपेक्षा रिपेअरिंग हा एकदम वेगळा प्रोफाईल होता आणि तो मला एकट्याने पहायला मिळणार, कदाचित बॅनर्जीच्या तावडीतून आपली सुटका होणार म्हणून मी फार खुश होतो पण तो आनंद जास्त वेळ टिकला नाही. रिपेअरिंगचा हा सबप्रोफाईल बॅनर्जीच्याच अंडर असणार आहे या बातमीने माझ्या आनंदावर विरजण घातले. पण मी चॅलेंज म्हणून ती नवीन गोष्ट स्वीकारली आणि रिपेअरिंगच्या कामात लक्ष द्यायला सुरवात केली. इथलेही लोक आमच्या लॅबमधील लोकांप्रमाणेच चांगले होते. त्यांना रोज काम नेमून देणे, काही अडचण आली तर गाईड करणे आणि दिवसाअखेरीस एकदा रिव्हयू करून ब्रांचेसना रिपोर्ट पाठवणे असे माझे काम होते. बर्‍याच अडचणी आल्या तरीही रिपेअरिंगच्या कामावर त्याचा कमीतकमी फरक पडेल अशा बेताने मी तो प्रोफाईल हँडल करायला लागलो. त्याची बर्‍यापैकी सवय झाली होती.

या नवीन प्रोफाईलमध्ये एक गोष्ट मस्त होती, ती म्हणजे मला केवळ बॅनर्जीपुरतेच काम करून चालणार नव्हते. पूर्ण भारतातल्या वीस नव्या इंजिनिअर लोकांशी मला रोजच्या रोज बोलायला लागत होते. त्यांचे मेल येत होते आणि त्यावर मी काम करत होतो. हा खूप वेगळा अनूभव होता. याआधी मी बॅनर्जी आणि त्याची लॅब एवढ्याच वातावरणात काम करत होतो. बॅनर्जी जे काही सांगेल ते ऐकायला लागायचे. पण आता तसे नव्हते. कोणती गोष्ट आज करणे गरजेचे आहे आणि कोणती नंतर केली तर चालेल हे मी ठरवायचो आणि कामाला लागायचो. आपल्यामुळे गोष्टी पटापट हलतात ही फिलींगच वेगळी होती. ब्रांचच्या लोकांबरोबर काम करून माझी एक इमेज बनली होती. समीरला एखादी गोष्ट सांगितली तर ती पटकन होईल ही लोकांना खात्री होती आणि नेमकी तीच गोष्ट मला खूप समाधान देत होती.

एरव्ही माझ्या सगळ्या मेल्सची बॅनर्जीला कॉपी असायची. मी गुपचूप काम करतो हे त्याला अजिबात आवडायचे नाही. खूप बोंबाबोंब करून काम करायचे हा त्याचा सिंपल फंडा होता. म्हणजे काम सहज होत असेल तरीही ते करायचे नाही. ते काम कसे अवघड आहे हे पन्नास लोकांना सांगायचे, त्यात जमेल तेवढे अडथळे आणायचे आणि पुन्हा ते अवघड केलेले काम दहा लोकांनी फोन केल्यावर करायचे आणि मग गावभर त्याचा धिंडोरा पिटायचा ही त्याची काम करण्याची स्टॅन्डर्ड पद्धत होती. त्याला कामाचे काही का माहित नसेना, एकदा माझ्याकडून कन्फर्म झाले की तो अगदी व्हाईस प्रेसिडेंटलाही बिनधास्त मेल्स लिहायचा. म्हणजे त्यांच्या बुक्समध्ये आपले नाव चांगले असेल याची बरीच काळजी तो घ्यायचा.

रिपेअरिंगसाठी मी जबाबदार असलो तरी मला लागणार्‍या खूप सार्‍या गोष्टी बॅनर्जीवर अवलंबून होत्या. स्पेअरची बरीच सँक्शन्स तो वेळेवर अपु्रव्ह करायचा नाही. बर्‍याचदा एखादी गोष्ट हवी असेल तर तो इश्यू गरम झाल्याशिवाय त्यासाठी लागणार्‍या गोष्टी तो द्यायचाच नाही. अशावेळी तो इश्यू हाताबाहेर जायचा आणि इस्केलेशन्स यायची पण बॅनर्जीला त्याची काही पडलेली नसायची. मग या सगळ्या गोष्टी निस्तरून हवा असलेला स्पेअर ब्रांचला पाठवेपर्यंत नाकी नऊ यायचे. पण आम्ही सर्वजण ते मॅनेज करायचो आणि भाव मात्र बॅनर्जी खाऊन जायचा.

या नवीन प्रोफाईलमध्ये मी थोड्याच दिवसात चांगला सेट झालो. भारतातल्या जवळजवळ सर्व इंजिनिअरर्सशी माझे रेग्युलर बोलणे चालू झाले. मी त्यातल्या कुणालाही पर्सनली भेटलो नव्हतो पण रोज फोन आणि मेल्समधून आम्ही एकमेकांच्या टचमध्ये होतो. माझ्या कामाच्या पद्धतीमुळे आमचे सर्वांचे चांगले जुळत गेले आणि त्यामुळे बर्‍याच गोष्टी सोप्या होत गेल्या. बरेचजण माझ्याबरोबर काम करायचा आनंद घेत होते ते माझ्या फार लवकर लक्षात आले. एकदा कोणताही इश्यू बॅनर्जीकडे गेला की ते काम अडकलेच अशी सर्वांची पक्की धारणा झालेली. त्यामुळे माझ्याकडून थोडा लेट का होईना, पण लोक बॅनर्जीकडे जात नव्हते.

या सगळ्या धामधुमीत आम्ही रिटेल सेक्टरमध्ये ‘इलाविया’चे नाव कमवायला एक युपीएस बाजारात आणला. आधी आम्ही फक्त मोठमोठ्या कंपन्या आणि बँका यांनाच आमची प्रॉडक्ट्स द्यायचो पण बिझनेस वाढवायला रिटेल सेक्टरवर लक्ष देणे महत्वाचे होते आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. जाहिराती वगैरे बनल्या होत्या आणि भारतात होणार्‍या सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी – आयपीएलसाठी आम्ही स्पॉन्सरर म्हणून होतो. प्रॉडक्ट लॉन्च लगेचच होणार होते आणि आयपीएलमुळे त्याचा खप प्रचंड वाढणार यात शंकाच नव्हती. फक्त त्याआधी आम्हांला आमच्या ब्रांचमधल्या सेल्स आणि सर्व्हिस टीमला या प्रॉडक्टचे ट्रेनिंग द्यावे लागणार होते.

कस्टमरच्या कोणत्याही शंकेला त्यांनी तेवढ्याच तत्परनेने हँडल करायला पाहिजे हा मुळ उद्देश होता. सर्व्हिस टीमचे एकवेळ ठीक आहे पण सेल्स टीमचे ट्रेनिंग आमच्या स्कोपमध्ये येत नव्हते. पण अशा अवघड वेळेस बॅनर्जीने “सेल्स टीमला येत्या चार दिवसात मी ट्रेन करतो.” म्हणून विडा उचलला. वास्तविक मोठाल्या कॉन्फरन्समध्ये हायर मॅनेजमेंटबरोबर बसून तो आपल्या स्कोपमध्ये नाहीत अशा गोष्टी अंगावर घेण्यात भलताच पटाईत होता. अंगावर घ्यायलाही काही हरकत नाही. पण त्या गोष्टी निस्तरताना तो आमच्याबरोबर कधीच नसायचा.

वेळ कमी असल्याने भारतातून सर्व सेल्स आणि सर्व्हिसचे लोक मुंबईला बोलवण्यापेक्षा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग द्यायचे ठरले. मग त्याने डिपार्टमेंटमधल्या आम्हां चौघांबरोबर मिटींग घेतली आणि सर्व भारतातल्या लोकांना ट्रेनिंग देणे हे आमच्यासाठी कशी मोठी संधी आहे वगैरे लेक्चरबाजी केली. शेवटी मुळ मुद्दयाला हात घालून त्याने आम्हा चौघांना टूर प्लान करायला सांगितला. शेवटी हे नको, ते नको असे करता करता माझ्या वाट्याला भोपाळ, दिल्ली आणि चेन्नई ही तीन लोकेशन आली.

तिकीट एजंटबरोबर टूर प्लान करणे म्हणजे नुसता घोळ होता. मी फ्लाईट ऑप्शनस विचारल्यावर त्याने पंचवीसएक ऑप्शनस मेल केले. मी त्यातून काही सिलेक्ट करून बुकिंग करायला सांगितले. त्यात अशी खबरदारी घ्यायची होती की एका लोकेशनचे ट्रेनिंग आटोपल्यानंतर मला तिथे न थांबता लगेच दुसर्‍या लोकेशनचे फ्लाईट पकडायला त्याच दिवशी निघावे लागणार होते. साधारण वेळापत्रक असे होते – पहिल्या दिवशी भोपाळसाठीचे मॉर्निंग फ्लाईट, तिथले ट्रेनिंग संपल्या संपल्या रात्रीचे दिल्लीसाठीचे फ्लाईट, दुसर्‍या दिवशी दिल्लीचे ट्रेनिंग झाल्यावर लगेच चेन्नईला जायचे फ्लाईट आणि चेन्नईचे ट्रेनिंग झाल्यावर त्या रात्री पुन्हा मुंबईला परत यायचे फ्लाईट! एकदम टाईट शेड्युल होते. एवढ्या लांब जातोय, एखादी रात्रही त्या शहरात घालवावी म्हटले तरी नाही. फ्लाईटमध्ये बसून दुसरे लोकेशन गाठायचे हे टार्गेट!

आमची तिकीट बुकिंग झाल्यावर आम्ही चौघे ट्रेनर्स एकत्र बसलो आणि पहिल्यांदा प्रॉडक्टचे डिलेल्ड सर्व्हिस मॅन्युअल्स बनवायला घेतले. चौघांनी खूप मेहनत घेऊन मॅन्युअलसाठी आणि ट्रेनिंगचे बारीकसारीक एकूणएक मुद्दे नोट डाऊन केले. यावेळी सर्वांचाच अनुभव कामी आला. हे सगळे व्हायला ऑफिसमध्येच रात्रीचे पावणेअकरा वाजलेले. बॅनर्जी आम्हांला कामाला लावून सहालाच घरी पळून गेला. पण जे मटेरियल बनले होते ते खरोखर कामाचे आणि खूप सारी माहिती असणारे होते. त्यानंतर आम्ही सर्व इंजिनियर्सना त्यांच्या महत्वाच्या लोकांना ट्रेनिंगसाठी बोलवून घेण्याबद्दल मेल लिहीला. त्याआधी दुपारी आम्ही सर्वांना फोन करून त्याची कल्पना दिली होती पण फॉर्मली सर्वांना मेल टाकायचा होता. आम्ही बनवलेले मॅन्युअल, डूज अॅन्ड डोन्ट्स हे सारे मटेरियल मेल करून त्याच्या प्रिंट ट्रेनिंगसाठी तयार ठेवायला सांगितल्या. मेलच्या शेवटी बोल्डमध्ये असेही लिहीले होते – हे प्रॉडक्ट सर्व्हिस मॅन्युअल हाताशी असेल तर सेल्स आणि सर्व्हिससाठी दुसर्‍या कुणाचीही कसलीही मदत घ्यायची गरज नव्हती. आम्ही मॅन्युअलच तसे बनवले होते. एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह!

मला घरी पोहोचायला पावणेबारा वाजले. येताना हॉटेलमध्येच खाऊन आलो. रात्रीचा वेळ वाचवण्याचा तो एक चांगला ऑप्शन होता. मला भोपाळचे सकाळी सहाचे फ्लाईट पकडायचे होते. त्यासाठी पाचला एअरपोर्टला पोहोचावे लागणार होते, चारला घरातून निघावे लागणार होते आणि साधारण सव्वातीनला उठावे लागणार होते. मी रात्रीच कॅब बूक केली. तीन दिवस पुरतील एवढे कपडे, सॅन्डल आणि बॉडी स्प्रे पॅक केला. हे सारे सामान बॅगेजमध्ये टाकून मी फक्त लॅपटॉपची बॅग फ्लाईट केबिनमध्ये नेणार होतो.

या सार्‍या ट्रेनिंग प्रकरणाची मी आर्याला कल्पना दिली असल्याने मोबाईलचा आलार्म होण्याआधी मला सव्वातीनला कॉल करून तिने उठवले. गुडमॉर्निंग म्हणतानाचा तिचा आवाज कानाला खूप गोड वाटत होता. मला काळजी घे आणि वेळेवर जेवत जा हे सांगताना मात्र ती चांगली जागी झाली असावी कारण तू व्यवस्थित जेवत नाहीस ही तिची नेहमीची तक्रार असायची. मी तिला वेळेवर जेवेन असे प्रॉमिस केले आणि फोन ठेवला. आशिष नेहमीप्रमाणे आऊटडोअरलाच होता. पावणेचारला मी घराला लॉक लावून खाली उतरलो.

असे मध्यरात्री किंवा पहाटे पहाटे एअरपोर्टला जायला निघायचे म्हणजे थोडे धाडसाचेच काम आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांचे हे हॅपी अवर्स असतात त्यांची झोप कुणी डिस्टर्ब केली किंवा कुणी त्यांना उगाचच चोपत असेल तर हा त्यांचा वचपा काढायचा टाईम असतो. त्यात आपण चाललो की डायरेक्ट येऊन हल्ला करत नाहीत पहिल्यांदा शंका आल्यासारखे आपल्याकडे पहातात, त्यानंतर थोडा पाठलाग करतात मग बाजूच्या गल्लीतल्या त्यांच्या दोस्तांना बोलवून आपली फूल फजिती करायच्या मूडमध्ये असतात साले! त्यामुळे एक डोळा त्यांच्यावर तर दुसरा बूक केलेल्या कॅबवर ठेवत एकदाचा कॅबमध्ये बसलो आणि पहाटे काहीही ट्राफिक नसल्याने एअरपोर्टवर वेळेच्या आधी पोहोचलो.

एवढ्या सकाळसकाळी एअरपोर्ट मात्र कमालीचे बिझी होते. खूप गर्दी होती. मी पोहोचल्यावर मला एका मोठ्या रांगेत बॅगेज स्कॅनिंग करायला थांबावे लागले. बॅग स्कॅन झाल्यावर ऑफिसरने त्याला एअरलाईनचे स्टीकर लावून सील केले आणि बोर्डिंग पास घ्यायला जायला सांगितले. ती स्कॅन झालेली बॅग घेऊन बोर्डिंगपास घ्यायला भल्यामोठ्या रांगेत उभा राहिलो. बोर्डिंगपास काढणारी मुलगी हुशार असावी, पटकन नंबर आला. सुदैवाने मला विंडोसीट मिळाली पण ती शेवटच्या रांगेतली होती. बॅगेजच्या बेल्टवर माझी बॅग सरकवली आणि बोर्डिंगपास घेऊन मी आणखी एका लाईनमध्ये मी सेक्युरिटी चेकसाठी उभा राहिलो. तिथेही दहा मिनीटांत सारे आटोपले आणि फायनली मी बोर्डिंग एरियात जाऊन बसलो. फ्लाईट ऑन टाईम होते. बोर्डिंग अनाऊंसमेंट झाली आणि एरोब्रिजने फ्लाईटमध्ये जाऊन सीटवर झोपी गेलो. मध्यंतरी एअरहोस्टेसने ब्रेकफास्टसाठी जागे केले. ब्रेकफास्ट घेतला आणि भोपाळच्या प्रतिक्षेत पुन्हा झोपलो.

भोपाळमध्ये ज्यावेळी फ्लाईट लॅन्ड झाले, त्यावेळी पायलटने खूष होऊन फ्लाईट वेळेवर आणल्याचे आनंदाने जाहीर केले तरीही कोण विषेश खुश झाला नाही कारण सगळेजण जवळजवळ झोपेत होते. पहाटेच्या झोपेचे खोबरे करून सर्वांनी हे फ्लाईट पकडले होते. मी अरायव्हल सेक्शनमध्ये आलो आणि कन्व्हेयरवर आलेली माझी बॅग घेऊन तिथेच असलेल्या प्रीबूक कॅबच्या विंडोत घुसलो. तिथे आमच्या भोपाळ ब्रांचचा पत्ता देऊन टॅक्सी बूक केली आणि बाहेर येऊन टॅक्सीत बसलो.

बरोबर साडेआठ वाजता मी आमच्या भोपाळ ब्रांचला पोहोचलो. आमचा भोपाळचा इंजिनियर सुभाष मलहोत्रा माझी वाटच पहात होता. त्याने मला गुडमॉर्निंग ग्रीट करून जोशात शेकहँड केले. आम्ही फोनवर बर्‍याचदा बोललो होतो पण भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. भेटल्यावर त्याने मला ब्रांच मॅनेजरच्या केबिनमध्ये नेऊन त्यांची ओळख करून दिली. त्यांच्याशी कामाच्या गप्पा मारून झाल्यावर ट्रेनिंग सुरु करायची मी परवानगी घेतली.

सुभाषने ट्रेनिंगसाठी सारा मध्यप्रदेशच बोलवला होता. दहा मिनीटांत सर्वांचे इंट्रो झाले. लोक ग्वाल्हेर, इंदूर, जबलपूर, रेवा कुठून कुठून जमले होते. जास्तीजास्त दहा पंधरा लोक येतील असा माझा अंदाज होता पण सकाळी साडेआठच्या सुमारास तब्बल पन्नासपेक्षा जास्त लोक कॉन्फरन्सरूममध्ये माझी वाट पहात बसले होते याचे मला खरोखर आश्चर्य वाटले. सुभाष ब्रेकफास्टसाठी विचारत होता पण मी फ्लाईटमध्ये तो घेतला असल्याने त्याला नंतर पाहूया म्हणून मी ट्रेनिंगला सुरवात केली.

नेहमीप्रमाणे ट्रेनिंगच्या सुरवातीला मला भीती वाटत होती पण लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिल्याने हळुहळू ती कमी होत गेली. एकूण ट्रेनिंग खूपच छान झाले. एकतर लोकांना प्रॉडक्ट आवडले आणि त्याबद्दल ज्या शंका होत्या त्यांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यामुळे ते आणखी खुश झाले. सुभाषने तिथे अॅरेंज केलेल्या मॉडेल्सवर हँड्सऑन प्रॅक्टिकल्स ही करा म्हणून सांगितल्यामुळे सर्वांना खर्‍या प्रॉडक्टचा फील घेता आला. सर्वांनी पुन्हा काही मदत लागेल म्हणून माझा नंबर मागून घेतला. शेवटी सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊन ट्रेनिंग संपल्याचे सुभाषने जाहीर केले. नको म्हणत असतानाही मला एअरपोर्टवर ड्रॉप करायला सुभाष स्वत:हून आला. ट्रेनिंगची एवढी झकास व्यवस्था आणि एअरपोर्टवर सोडायला आल्याबद्दल मी त्याचे आभार मानले आणि दिल्लीला जाणारे फ्लाईट पकडायला मी भोपाळ एअरपोर्टमध्ये शिरलो.

क्रमश:

©विजय माने, ठाणे.