लोकांच्या शनिवारच्या रात्री कशा असतात? आहाहा…एकतर उद्या सुट्टी आहे या विचारानेच धुंदी चढलेली असते. त्या फिलींगची सुरवात ऑफिसमधून निघाल्या निघाल्याच होते. वास्तविक शनिवारचा सेकंड हाफदेखील तसा वाईट नसतो. काही सुखी लोकांना तर शनिवारीच सुट्टी असते. हे यांचे पूर्वजन्मीचे पुण्यच होय. त्यांना शनिवार रात्रीचा काही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी शुक्रवार वीकेंड.
मग कधी नव्हे तो एखादा पेग घेतला, टीव्ही बघत बसला, जेवण वगैरे आटोपल्यावर थंडगार एसीत …जाऊदे कशाला उगाच लोकांच्या खाजगी तपशिलात शिरा, पण एकंदरीत शनिवारची संध्याकाळ आणि रात्र मदहोश असते. आमचीही कधीकाळी असायची. पण एमएसईबीच्या कारनाम्यांनी हल्ली ती खराब व्हायला लागली आहे.
पोरांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने बायको माहेरी होती. खूप दिवसांनी एक चांगले पुस्तक हातात आले होते. एका कथेच्या महत्वाच्या वळणावर आलो होतो आणि अचानक लाईट गेली. मोबाईममध्ये पाहिले, रात्रीचे साडेबारा वाजले होते. शनिवारी रात्री साडेबाराचे टाईम म्हणजे मुंबईकरांसाठी नॉर्मल असते.
दरवाजा उघडून पाहिले तर जिन्यातली लाईट होती. आमच्याबरोबर बाजूचीही लाईट गेलेली म्हणून ते ही लोक बाहेर जमले होते. खालच्या मजल्यावरची लाईट जशीच्या तशी चालू होती. म्हणजे ऐनवेळी जाणार्या लाईटची अशी व्यवस्था आमच्याच वाट्याला आली होती. पहिल्यांदा वॉचमनला फोन केला आणि आमच्या मीटरच्या जागी दिवाळी वगैरे चालू आहे काय ते विचारले. गेल्या पंधरा दिवसांत तिथे तीनवेळा फटाके फुटले होते. फक्त आमच्याच मजल्यावरची लाईट जात होती. शेवटी थोड्याशा कारणावरून पेट घेणारा ज्वालाग्रही पार्ट बदलण्यात आला होता असे मला समजले होते.
वॉचमनने मीटरजवळ काहीही झालेले नसून सोसायटीच्या आवारात असलेल्या ट्रान्सफॉर्मरकडे केबल जळत असल्याचे सांगितले. तो भाग एमएसईबीच्या अखत्यारीत येत असल्याने तिथे अतिशहाणपणा करून उपयोग नव्हता. एमएसईबीला फोन केला. बिझी आला. सतत अर्धा तास व्यर्थ फोन करत होतो. तो लेकाचा वायरमन एवढ्या रात्री अर्धा तास कुणाशी बोलत होता कळायला मार्ग नव्हता. एकदाचा फोन लागला पण तो उचलला जाईना. लगेच उचलेल तर एमएसईबी कसली? रात्रपाळीत शटडाऊनवर काम करायला त्यांच्या ऑफिसमध्ये तिघेचौघे असतात, ही आगाऊ माहिती आमच्याकडे होती. चौथ्या मजल्यावरून खाली आलो तर शेवटच्या मजल्यावरची जी एक फेज गेली होती, त्या घरातले बहुतेकजण खाली उतरलेले. नुसता खाली उतरून उपयोग नव्हता तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन कुणालातरी घेऊन येऊया म्हणून मी आणि माझा एक मित्र गाडीवरून निघालो.
ऑफिसमध्ये गेलो तर ऑफिस बंद! बाजूलाच उभा असणार्या एका वॉचमनला विचारले तर, “ऑफिस इधरसे शिफ्ट हो गया है.” ही नवीन माहिती मिळाली.
“किधर?”
मग त्यानेही नवीन जागेच्या खाणाखुणा सांगितल्या आणि आम्ही कधीही न पाहिलेले नवीन ऑफिस आणि त्यात बसलेल्या वायरमनच्या शोधात निघालो. त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेलो, सुनसान जागा होती. भरपूर सगळी कुत्री मेल्यासारखी पडली होती. आम्ही पत्ता विचारायला कोण माणूस दिसतोय का ते शोधू लागलो. इतक्यात एक रिक्षा आली आणि त्यातून एकजण उतरला. त्याला पत्ता विचारल्यावर त्याने अजून थोड्या जास्त सुनसान जागेवर जा म्हणून सांगितले. तिथेही जाऊन पाहिले पण एमएसईबीचा काहीही मागमूस नव्हता. खाली उतरून कुठे बोर्ड वगैरे दिसतोय का ते पहात होतो. एकतर घरातून चित्रविचित्र बरमुड्यावरच बाहेर पडल्याने तिथल्या कुत्र्यांना आमच्यात हळुहळू इंटरेस्ट यायला लागला होता. मघापासून निपचित पडून असणारी कुत्री आळोखेपिळोखे देत अंगातला आळस झटकून आमच्याकडे सरकताहेत हे लक्षात आल्यावर आम्ही तिथून लागलीच काढता पाय घेतला.
परत येत असताना गेटच्या सावलीत काळ्या रंगाचा ड्रेस घालून बसलेला एक वॉचमन दिसला. त्याला विचारल्यावर हेच एमएसईबीचे ऑफिस म्हणून त्याने आम्हांला आनंदाचा धक्का दिला. विद्युत बोर्डाने कर्मचार्यांबरोबर ह्यालाही चांगलाच ट्रेन केला होता. कोण माणसे येतील म्हणून बाहेरचा मोठा बल्ब बंद करून काळ्या ड्रेसात लेकाचा सावलीत बसला होता!
“ऑफिस में अभी कोई है की नही?”
त्याने उत्तर देण्याऐवजी आम्हांला वरपासून खालीपर्यंत न्ह्याळले आणि जीवावर आल्यासारखे उत्तर दिले, “सबलोग साईट पे गया है.”
“कौनसे साईट पे?”
“पता नही.” फुल ट्रेनिंग झालेला हा माणूस असावा.
“नंबर है क्या उनका?”
मग त्याने अतिकष्टाने खिशातले एक व्हिजीटींग कार्ड काढले आणि “इसके उपर एक नंबर दिया है वो देखो.” म्हणून सांगितले. नंबर तोच होता ज्याला मी कॉल करून थकलो होतो आणि अर्धा तास तो उचलला गेला नव्हता.
“दुसरा कोई नंबर नही है?”
“पिछे एक लिखा है, वो रिक्षावाले का है.”
“रिक्षावाले का नंबर लेके क्या करें?”
“वो वायरमन लोग यही रिक्षा से घुमते है.”
मग तो वायरमन सोडून रिक्षावाल्याचा नंबर लावायच्या नादाला लागलो. लागल्यावर चुकून त्याने उचललाही. मग त्याला आमच्या सोसायटीचे नाव सांगून सगळीच्या सगळी लाईट बंद आहे आणि ताबडतोब तिथे या असे सांगितले. तो ही लगेचच निघतो म्हणाल्यावर आम्हांला शंका आली. शेवटी तुम्ही कुठे आहे, आम्ही तुम्हाला घ्यायला येतो इथपर्यंत सौदा झाला पण तो नेमका कुठे आहे ते सांगायला तयार नव्हता.
आजुबाजूच्या ओसाड ट्रान्सफॉर्मरच्या जागा पहात परत येतच होतो इतक्यात आमच्या वॉचमनचाच फोन आला. वायरमन इथे पोहोचलेत आणि तुम्ही अजून कुठाय याचा जाब तो विचारत होता. त्याकडे दुर्लक्ष करून वायरमन आमच्या सोसायटीत पोहोचलेत या आनंदात गाडी पळवत परत आलो.
वायरमननी येऊन एव्हाना काम सुरु केले होते. त्यांचा एक सुपरवायझर बाजूला निवांत बसून त्यांना सुचना देत होता आणि ते त्या पाळत होते. त्यांच्याबरोबर बरेच अनोळखी लोक दिसत होते म्हणून कोण आहेत याची चौकशी केल्यावर समजले की त्यांचे जिथे काम होते ते अर्धेच सोडून आल्याने तिथले लोकही यांच्या सोबतच आले होते. ते आमच्याशी राडा करायच्या मूडमध्ये दिसत होते पण आधीच लाईटने हैराण झाल्याने त्यांच्याशी वादावादी करण्यात आम्हांला रस नव्हता.
“ह्यांना आपल्या कामाची काही पडलेली नाही. आपले काम अर्धेच ठेऊन इथे येऊन काम करताहेत. चला त्यांच्या ऑफिससमोर जाऊन निदर्शने करुया.” असे म्हणून त्याने तिथेच “एमएसईबी हाय हाय.” अशी घोषणाबाजी सुरु केली. हातातले अर्धे काम टाकून माझ्या फोनवर हे लोक आमच्याकडे कसे काय आले याचे मला आश्चर्य! नंतर मला खरी बातमी समजली. आम्ही त्यांना आणायला गेल्यावर आमच्या सोसायटीतल्या एका चांगल्या हुद्दयावर असणार्या आधिकार्याने एमएसईबीच्या आधिकार्याना फोन केला होता आणि जे सुपरवायझर आणि वायरमन आले होते ते त्यांनी पाठवले होते.
त्यांच्या घोषणेबाजीने काम करत असलेले वायरमन काम बंद करून बाहेर येऊन बसले.
“आता तुम्हांला काय हवं?” त्यांची बडदाश्त ठेवावी लागते नाहीतर ते नाराज होतात. आणि ते नाराज झाले की लाईट येत नसते.
“थंड पाणी आणा जरा.”
लगेच वॉचमन थंड पाण्याच्या शोधात हरवला. सुपरवायझरने घोषणा देणार्यांना समजवले आणि हे काम आटपून लगेच तुमचाकडे येतो असे सांगितले पण लोकांचा विश्वास नसल्याने ते तिथून हटले नाहीत. थंड पाणी पिऊन झाले. मग कुठलेतरी कनेक्शन करायचे असल्याने त्यांनी सगळ्या सोसायटीची लाईट बंद केली. अर्धा तास कसलीतरी जोडाजोडी चालली होती. डासांच्या प्रदेशात आम्ही अतिक्रमण केल्यामुळे ते चवताळून उठले होते. हात, कान, नाक, तोंड दिसेल तिथे चावत सुटल्याने त्यांना हुसकवून लावायला अधुनमधून स्वत:ला मारून घ्यावे लागत होते.
या सगळ्या लवाजाम्यात दोन तास उलटून गेलेले. ज्यांच्या घरी इनव्हर्टर होते, त्याचीही लाईट संपून पंखे बंद पडल्याने ते ही लोक डोकी खायला खाली आले. त्यात नुकताच इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकलच्या इंजिनियरिंगला अॅडमिशन घेतलेला एक मुलगा येऊन “काय काका, ट्रान्सफॉर्मर जळालाय का?” असे म्हणाला.
हा लेकाचा त्या टॉन्सफॉर्मरच्या जीवावर का उठला होता देव जाणे, “नाही बाबा, साधा केबलचा तुकडा जळालाय ते जोडताहेत.”
“मग एवढा उशिर जोडायला?”
“आज लाईट नही आयेगा.”
डासांची झुंज देत बॅटरीच्या उजेडात काम करत असलेल्या वायरमनकडून असे उत्तर आल्यावर तिथे जमलेल्या सगळ्यांनी त्या भावी इंजिनियरला परस्पर घरीच पाठवले.
एकदाची सगळी व्यवस्था झाल्यावर वायरमन त्या खड्ड्यातून बाहेर येत म्हणाला, “आत्तापुरते कसेतरी चालू केले आहे. कुणीही एसी चालू करू नका. एसी चालू झाला की हे उडालेच म्हणून समजा. आणि पुन्हा हे उडाले की आम्ही काही करू शकत नाही. नवीन केबल सोमवारशिवाय मिळणार नाही.”
त्यांचे आभार मानून घरी गेलो. बेडवर जाऊन कलंडलो पण प्रचंड गरम होत होते. एसी लावू या असा विचार डोक्यात आल्यावर वायरमनने दिलेली वॉर्निंग आठवली. थोडावेळ एसी चालू करून नंतर बंद करुया म्हणून भीतभीतच एसीचे बटन चालू केले तसे खाली धडाऽम करून आवाज झाला. एसीच्या वार्याचे जाऊ द्या, गरम हवा फेकणारा बिचारा फॅनही बंद पडला. आता सोमवारपर्यंत काहीही उपयोग नाही हा विचार करून अंगाला ‘ओडोमॉस – मच्छर का बॉस’ लावून खिडक्या उघड्या ठेवून मी झोपी गेलो.
©विजय माने, ठाणे.